दूर नको जाऊ ...बाबा...!!
दूर नको जाऊ ...बाबा...!!
राज आणि निता अगदी सुखात मस्त संसार करत होते...घरचेही सगळे अगदी दृष्ट लागण्या सारखेच होते...
परिस्थिती बेताचीच पण सगळ्यांचे एकमेकांवर असणारे प्रेम सुखाचा संसार करण्यासाठी पुरेसे होते...
आणि राज आणि निता आतुरतेने ज्याची वाट पाहत होते तो आनंदाचा क्षण आला...नीताला मातृत्वाची चाहूल लागली... सगळयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही...
" निता आज तू मला खरंच खूप सुखाची अनुभूती दिली आहेस...मला खूपच भरून येतंय...जगातला सगळ्यात मोठा आनंद आज माझ्या वाट्याला तुझ्यामुळे आला आहे ..आता मी खूप मेहेनत करेन...दिवसरात्र काम करून माझ्या लेकरासाठी , त्याच्या सुखासाठी पैसे मिळविण...तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करीन तुला काय हवे ते सांग... बंदा हाजिर आहे सेवेला..." राज या बातमीने खूप खुश झाला होता ...नीताला कुठे ठेवू आणि कुठे नको असे त्याला झाले होते ..
" मला फक्त तुम्ही माझ्या जवळ हवे आहात...देव नक्कीच तुम्हाला चागली संधी देईल आपल्या लेकराची मी सुध्दा अगदी छान काळजी घेईन...शिवाय आई बाबा सुद्धा आहेत... सगळं छानच होईल " नीताने राजच्या मिठीत त्याला आणि स्वतःला आश्वस्थ केलं...
निता ची तब्येत चांगली होती...आई बाबा तिची खुप काळजी घेत होते ...राज आता संध्याकाळी अजून एक पार्ट टाईम नोकरी करू लागला होता...त्याला त्याच्या बाळाला काहीच कमी पडू द्यायचे नव्हते...
आणि एक दिवस त्याची कंपनी बंद होणार अशी बातमी आली...राजच्या पायाखालची जमीनच सरकली...नीताला सातवा महिना लागणार होता...घरात तिच्या डोहाळजेवनाची चर्चा सुरू होती...
" काय होईल आता ....? देवा तू मला हा आनंद दिलास आणि आता तूच माझ्यावर ही परिस्थिती आणलीस...काय करू मी आता देवा...कसं सांगू हे सगळ्यांना...? " राजने अगतिक होऊन देवाचा धावा केला...घरी कोणत्या तोंडाने सांगायचं ? त्याची हिंमतच होत नव्हती...शेवटी त्याने सध्या घरी काहीच न सांगण्याचा निर्णय घेतला...
दुसऱ्या दिवशी रोजच्या सारखा तो कंपनीत गेला ...आज सगळ्यांना एक महिन्याची नोटीस आणि पगार देऊन कंपनी बंद होणार असल्याचं जाहीर केलं गेलं ...सगळेच हतबल झाले काय करावे काहीच कळत नव्हते...
राजने आता पडेल ते काम करायचा निर्णय घेतला...
राज जिथे पार्ट टाइम नोकरी करायचा तिथले मॅनेजर जरा काळजीत होते...राजने त्यांना आपली परिस्थिती सांगितली आणि त्यांच्या ओळखीने कुठे काही काम मिळते का ते बघायची विनंती केली...
" राज , मी गेले सहा महिने तुला ओळखतो... तुझं काम , प्रामाणिकपणा मला खूप आवडला आहे...खरतर आपल्या नाशिकच्या ब्रांच मध्ये मला एका विश्वासू माणसाची गरज आहे...तुझाच विचार मनात होता पण तू बाप होणार म्हणून तू जाशील की नाही असं मला वाटलं...बघ तुझी तयारी असेल तर सांग...मोठं ग्रेड आहे आणि पगारही चांगला आहे..." मॅनेजर साहेबांनी राजला चांगली संधी देऊ केली
त्याला खूप आनंद झाला...त्याने साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि लगेचच जाण्याची तयारी दाखवली...
घरी जाताना त्याने पेढे घेतले आणि तो मंदिरात गेला..." देवा खरंच तुझी लीला अगाध आहे...कुठल्या रूपाने मदतीला येशील कळतच नाही...खूप उपकार झाले...असेच यापुढेही आशीर्वाद राहू दे..." देवाचे आभार मानून तो घरी गेला...
राजने आता घरी येऊन सगळं सांगितलं...कोणी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता...फक्त नीताला या अवस्थेत सोडून जाण्याचं जीवावर आलं होतं... नीता ही दुःखी झाली होती पण पर्याय नव्हता..
आई बाबा असल्यामुळे तशी निताची काही काळजी नव्हती...सध्या या अवस्थेत तिला नाशिकला नेण शक्य नव्हतं...बाळ झालं की लवकरच सगळ्यांना तिकडे घेऊन जाण्याचं राजने ठरवलं होतं...
राजने निता च्या आई बाबांनासुद्धा काही दिवसांनी तिथे येऊन राहण्याची विनंती केली आणि तो जड पावलांनी निघाला...
निता ची तारीख जवळ आली होती...तिला कळा सुरू झाल्या तसे बाबांनी राजला लगेच निघून ये म्हणून कळवल आणि ते निता ला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेले...
राज लगेच निघाला .. पण सगळीकडे धुंवाधार पाऊस सुरू होता...सगळ्या गाड्या तात्पुरत्या बंद होता...फोन चे नेटवर्क सुद्धा नव्हते...राजची अवस्था खूपच वाईट झाली...नीताच्या काळजीने , बाळाच्या ओढीने त्याच मन भरून आलं...देवाचा धावा सगळेच करत होते...
आई बाबा तर खूपच काळजीत होते...बातम्या बघून त्याचा जीव घाबरला होता...इकडे निता ची ही अवस्था तर तिकडे राज अडकलेला...!.
थोड्याच वेळात नीताने एका गोंडस परीला जन्म दिला...दोघीही मायलेकी सुखरूप होत्या...निता राजची आतुरतेने वाट बघत होती...
देवाने तिचे गाऱ्हाणे ऐकले...पाऊस ओसरला आणि राज आपल्या लाडक्या परीला डोळे भरून बघायला हजर झाला...तिला हातात घेताच राज सगळं विसरला...त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले...
" अहो हे काय आपली छकुली बाबांच्या डोळ्यातले पावसाचे ढग बघून काय म्हणेल ? वरती आभाळ बरस्तय आणि इथे बाबांच्या डोळ्यातले ढग..." नीताच्या बोलण्याने सगळे मनसोक्त हसले...!
