दिवस चौथा 28 / 03 / 2020
दिवस चौथा 28 / 03 / 2020


वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे मी आज सकाळपासून सौ. सरला मोते यांचा कृष्णमंजिरी हा काव्यसंग्रह वाचायला घेतला.
किती रंगविशी रंग
रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरीरंग
रंग खेये आभायात ||
श्रेष्ठ मराठी कवयित्री बहिणाबाई यांनी वरील कवितेच्या ओळीतून चितारलेले विलोभनीय वर्णन आहे भगवान श्रीकृष्णाचे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे प्रभावी आणि प्रवाही व्यक्तिमत्व. त्यात अनेक रंग भरल्याचे जाणवते. हजारो वर्षे उलटली तरी भगवान श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा तेजस्वी वाटते. भगवान श्रीकृष्णाची अनेक रूपे आपल्याला अनेक वेळा दिसत असतात. भगवान श्रीकृष्णाच्या विविध रूपाप्रमाणे कवितेतील विविध रूपे सौ. सरला मोते यांच्या कृष्णमंजिरी या काव्यसंग्रहात दिसून येतात.
कवयत्री सौ. सरला मोते यांचे शब्दांबरोबरचे नाते आणि त्यातून त्यांच्या भावना व्यक्त करणे असा एक सुरेख प्रवास म्हणजेच कृष्णमंजिरी हा संग्रह होय. या संग्रहातील प्रत्येक कविता आशयघन आहे. त्यांच्या मायबाप अभंगातून आई-वडिलांच्या सेवेची कळकळ जाणवते. भगवान श्रीकृष्णाचे विलोभनीय रूप त्यांनी आपल्या रक्षण या कवितेत रेखाटले आहे.
भारतातील आद्य स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याला सलाम त्यांनी शिक्षण या कवितेतून केला आहे. स्त्रीच्या जीवनात येणाऱ्या विविध बंधनांचा मागोवा त्यांनी बंधन कवितेतून रसिकांसमोर मांडला आहे. कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे जा असा संदेश बळीराजाला त्यांनी बळीराजा या कवितेतून दिला आहे. आरोळी या कवितेतून पर्यावरण वाचवा असा सामाजिक भान असणारा संदेशही कवयत्री कवितेतून देत आहे. त्यांच्या रंग या कवितेतून आपल्या सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे, तर माणूस व्यर्थ अनाठायी जातिभेद, धर्मभेद का करतो? असा परखड सवाल त्यांनी विचारला आहे.
खरोखर नवरसांनीयुक्त असणारा कृष्णमंजिरी हा काव्यसंग्रह एक अनमोल ठेवा आहे. ज्याप्रमाणे इंद्रधनुष्यात विविध रंग असतात, त्याप्रमाणे या काव्यसंग्रहात विविध काव्यरूपी रंगांची उधळण कवयत्री सौ सरला मोते यांनी केली आहे. काव्यातील विविध प्रकार हाताळण्याचे कसब या काव्यसंग्रहातून कवयत्री सौ सरला मोते यांनी अधोरेखित केले आहे. हे पुस्तक वाचत असताना कवयत्रीचा उत्साह, शब्दांवरील प्रभुत्व जागोजागी दिसून येते तेच या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.