Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

दिवाळी आजची आणि कालची

दिवाळी आजची आणि कालची

6 mins
321


 असं म्हणतात की प्रत्येक पिढी गणिक सणावारांचे रूप बदलते.सगळ्याच सणावारांचे रूप बदलले.त्यातून आपण आता सुपरफास्ट च्या जमान्यामध्ये वावरतो त्यामुळे माणसाकडे सगळे आहे ,पण वेळ नाही. त्यामुळे आताचे सणवार बऱ्यापैकी शॉर्टकट झालेले आहेत. दिवाळी कालची पूर्वीची किंवा आपल्या लहानपणाची खूप वेगळी होती. तेव्हा घरातल्या तीन किंवा चार लोकांना पुरताच सण नसायचा, तर तो सर्वसमावेशक असायचा. आणि एका लक्ष्मीपूजनलाच महत्व द्यायचे आणि नंतर आम्ही चाललो फिरायला, थंड हवेचे ठिकाण, परदेश प्रवास, हे सार दिवाळीच्या वेकेशन मध्ये, अशी टूम तेव्हा नव्हती.

नुकतीच कुठे थंडी पडू लागली की दिवाळीची चाहूल लागायची. साधारण आठ दिवस आधी घराघरातून भाजण्याचे, तळण्याचे, खमंग वास यायचे. गावाकडे नाही, पण शहरात चाळीमध्ये एकमेकाकडे फराळ बनवण्यासाठी मदतीला जाण्याची पद्धत होती. आज तुझ्या घरच्या चकल्या, उद्या माझ्या घरच्या चकल्या, आज तुझ्या घरच्या करंज्या उद्या तिसऱ्या एखाद्या मैत्रिणीच्या घरी जाऊन करंज्या हे माझं लग्न झाल्यावर ती चाळीमध्ये मी पाहिलेला आहे .त्या निमित्ताने सार्‍या जणी एकत्र जमायच्या, गप्पागोष्टी व्हायच्या, सुख-दुःख शेअर व्हायची. शिवाय एकमेकांच्या घरी करंज्या लाटायला जाणाऱ्या मुलींना, स्त्रियांना हळदी कुंकू काहीतरी खमंग खायला आणि त्यासोबत गरमागरम तळलेली एक करंजी नक्की मिळायची. शिवाय ज्यांच्याकडे काही दुखद घटना घडलेली आहे ज्या लोकांना दिवाळी करायची नाही त्या लोकांकडे पहिल्या आंघोळीला फराळाचा डबा पोहोचवायचा आता असले काही राहिलेले नाही सकाळी बॉडी गेली की संध्याकाळी त्या घरांमध्ये अन्न शिजते आणि आमच्यासाठी नाही तर मुलांसाठी असे म्हणत दिवाळीचे सगळे पदार्थ देखील केले जातात अर्थात आता पहिल्यासारखं कोणाला कोणाकडे डबे घेऊन जाणे जमण्यासारखे देखील नाही त्यामुळेच कदाचित हा बदल घडला असावा. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फराळाची ताटे सजायची आणि छान विणलेला रुमाल वगैरे त्याच्यावरती टाकून एकमेकांच्या घरी पोहोचवायची.आता रेडिमेट मिठाईचा बॉक्स वरती भर असतो.

खरी दिवाळी रमा एकादशी पासूनच सुरु होते. पण आता कोणाला रमा एकादशी वसुबारस या गोष्टी त्यांच्या गणतीत नसतात. किंवा आता नव्या पिढीला माहित देखील नसतील. गावाकडे माझी आई त्या दिवशी गाय-वासराची पूजा करायची, त्यांना चारा द्यायची त्यांना खाऊ नैवेद्य  या गोष्टी दिल्या जायच्या. रमा एकादशी पासूनच दिवे लावायला सुरुवात व्हायची. धनत्रयोदशी दिवशी धनाची पूजा, आणि त्यादिवशी स्त्रियांचे नहाणे असायचे. कारण पहिल्या आंघोळीला सगळ्या पुरुष मंडळींचे लाड करायचे ,लहान मुलांचे लाड करायचे, त्यांना अभ्यंगस्नान घालायचे. याच्यामध्ये बायकांना काहीच स्थान नव्हते. त्यामुळे धनत्रयोदशीचा दिवस हा स्त्रियांच्या अभ्यंगासाठी. नर्कचतुर्थी दिवशी ,सकाळी पहाटे भल्या पहाटे ऊठून सर्वांना स्नान करावे लागायचे.  थंडी मी म्हणत असायची, त्यामुळे कितीही गरमागरम उकळत पाणी मिळाल, तरी कमीच पडायचं. त्यादिवशी आमच्या गावाकडे असा रिवाज होता की गावातील परटीण पुरुष मंडळींना ओवाळायला यायची, आणि मग तिला योग्य ती ओवाळणी देखील दिली जायची.

लक्ष्मी पुजना दिवशी लक्ष्मी पूजेचे महत्व, आमच्या घरी विष्णू आणि लक्ष्मी अशी एक मोठी फ्रेम होती, वडील म्हणायचे नारायणा सहित लक्ष्मीला पूजले कि ती जास्त प्रसन्न होते. तेव्हा आत्ताच्या सारखा फटाक्यांचा धूमधडाका नव्हता. आता जसे लक्ष्मीपूजनाला धडामधूम आवाज येतात तसे नव्हते .फटाके म्हणजे टिकल्या ,लवंगी च्या माळा, अमृतांजन च्या बॉक्स सारखे दिसणारे ॲटम बॉम्ब, कधी कधीतरी एखादी लक्ष्मी फटाक्याची लड याच्यावर समाधान असायचे. फुलबाज्या आणि सापाची गोळी. खाली दगड त्याच्यावरती दोन-तीन टिकल्या त्याच्यावरती एक छोटा दगड ठेवून वरून घाव घातला की मोठा आवाज यायचा, टिकल्या उडवायला पिस्तुलं वगैरे प्रकार नव्हता. आता सारखे ते विविध आवाज करणारे, विविध रंगाचे फटाके तर मुळीच नव्हते. 

तेव्हा घरोघरी आकाश कंदील लावले जात नव्हते, आमच्या संपूर्ण आळी मध्ये फक्त एका घरामध्ये आकाश कंदील लावला जायचा. काय तर म्हणे नवस केला असेल तर आकाश कंदील लावायचा. त्यामुळे आम्ही मोठ्या कुतूहलाने रात्री किंवा पहाटे त्यांच्या आकाश कंदीलाकडे बघत बसायचो. 

अजून दिवाळी म्हटले की,दिवाळी आणि रांगोळी यांचं अतूट नातं. तेव्हा आत्ता सारख्या संस्कार भारतीच्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या आणि रंगांची रेलचेल नव्हती. त्यावर चकमक टाकणे, दिवे लावणे हे तर माहीतच नव्हते. अंगणामध्ये सडा सारवण करून त्या सारवलेल्या भागाला एक बॉर्डर आखायची आणि त्याच्यामध्ये पारंपारिक ठिपक्यांच्या रांगोळ्या काढल्या जायच्या. मग ती एकच रांगोळी नसून कधीकधी 5/6 रांगोळ्या देखील असायच्या. कोयरी, रामाचा पाळणा, कारल्याचा वेल, चेंडू फळी, अशा त्या रांगोळ्या काढायच्या. क्वचित कोणाकडे रांगोळीचे पुस्तक आणि ठिपक्याचा कागद असायचा, किंवा एक मोठा ब्राऊन पेपर घेऊन त्यावर 1 ते 100 आकडे टाकून जळत्या उदबत्तीने आम्ही त्याला भोक पाडत असायचे. आणि घरच्या घरी ठिपक्यांचा कागद तयार करायचा. या गोष्टी आता तर काळाच्या उदरात गडप झालेल्या आहेत. रंग देखील हळद, कुंकू, गुलाल ,बुक्का यामध्ये रांगोळी मिसळून रंग तयार करायचे. क्वचित एक-दोन विकत आणायचे, कधीकधी निळा रंगासाठी निळे ची पावडर देखील वापरायचो. त्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात रंग भरून रांगोळी मिसळून त्यातच फिका आणि गडद असे रंग तयार करायचे. शिवाय एखाद्या पराती मध्ये पाणी घेऊन त्यावर ती कोळशाची पूड टाकून त्यावर ती रांगोळी काढायची त्यानंतर शहरात चाळीमध्ये असे पाहिले एक चौकोन कावेने रंगवून घ्यायचा, आणि त्यावर रांगोळी काढायची. तरी ही तीस वर्षांपूर्वीची गोष्ट झाली

पहिल्याच दिवशी अभ्यंगस्नान झाल्यावर, सर्वांनी फराळाला एकत्र बसायचं हा एक दंडक असायचा, आणि पहिल्या दिवशी पर्यंत सगळे पदार्थ तयार झाले पाहिजे. म्हणजे तीन प्रकारचे लाडू रव्याचा बुंदीचा बेसनाचा चकल्या कडबोळी शेव करंज्या चिवडा अनारसे मग पुढे पंधरा दिवस संपेपर्यंत तोच नाष्टा आणि तेव्हा कुणी आतासारखे हेल्थ कॉन्शियस देखील नव्हते. त्यामुळे ते तळलेल आहे ,खायचं नाही ,बेकिंगच आणा ,असं का sssही नव्हतं. शिवाय आता कित्येक लोकांना पहिल्या अंघोळीला सुट्टी देखील नसते. 

आमच्या वेळी जर तुम्ही सूर्योदयाच्या आत आंघोळ केली नाही तर तुमच्या अंगावर घाण ,कचरा पडेल, नर्क पडेल असं सांगून सूर्याकडे एक डोळा ठेवून सगळ्यांच्या फटाफट आंघोळी व्हायच्या. आणि एक अंघोळीला गेला की बाकीच्यांनी फुलबाजे उडवायचे ,बाथरूम पाशी नेऊन त्या आंघोळ करणाऱ्या व्यक्तीला फुलबाजे दाखवायचे. आता लोक जास्त लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या दोन सणांना महत्त्व देतात बाकी पहिली अंघोळ दिवाळी पाडवा या गोष्टींना ड्युटीवर असतात. 

नवेच कपडे पाहिजेत ही संकल्पना आमच्या गावाकडे मुळीच नव्हती. ठेवणीतले कपडे काढून घातले तरी चालत असत. दिवाळी म्हणजे सुट्टी दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके इतकच डोक्यात होतं आणि नवे कपडे घालण्याची, घेण्याची सर्वांची ऐपत देखील नसायची. खरोखरी जुने वडीलधारे लोक म्हणायचे आमच्या काळात रुपया बैलगाडीच्या चाका एवढा वाटायचा. म्हणजे हातामध्ये अजिबात खेळता पैसा नसायचा, मात्र त्या निमित्ताने पाहुणेरावळे एकमेकाकडे येत असत. भेटीगाठी होत असत. आता हे सारे मी गावाकडचं माहोल सांगत होते. किल्ला मात्र बनवायचो. त्या काळात शहरात काय होतं मला माहित नाही. आता काळ एवढा बदलला आहे घराघरातून येणारे भाजणीचे वास आता क्वचित येतात. सारा काही रेडिमेट वर भर असतो. आणि त्यात त्या गृहिणींची देखील चूक नाही कारण दिवसाचे बारा तास त्या बाहेर असतात, शिवाय प्रायव्हेट सेक्शनमध्ये तर कामाच्या तासाला लिमीट नसते. अशावेळी थकून भागून आल्यावर घरात फराळ करणार तरी कधी? शिवाय त्यामुळे इतर महिलांना रोजगार देखील मिळतो. तसेच हेल्थ कॉन्शस झाल्यामुळे चार दिवसाच्या वर पाचव्या दिवशी कोणी तो फराळ खात नाही. बाकी फटाके नवीन कपडे याची रेलचेल असते, पण थोड्याशाच फटाक्याची मुलांमध्ये वाटणी करून देणे, भावंडांशी भांडून फटाके उडवणे, भावंडाचे फटाके पळवणे या गोष्टीत जी मजा होती, ती आता एकुलता एक प्रिन्स किंवा एकुलती एक प्रिन्सेस त्यामुळे फटाक्याची वाटणी करायलाच कोणी नसतं. जे काय आणलेला असतं ते सारं त्यानेच ऊडवायचं असतं. त्यामुळे भावंडांशी स्पर्धा करून फटाके उडवण्याची मजा राहिलेली नाही. फराळात देखील लाडू ,चिवडा ते तर घरामध्ये कायमचे स्थान, तहान लाडू, भूक लाडू म्हणून असतात शिवाय पार बारा महिने रेडिमेट मिळत असल्यामुळे चकल्या करंज्या कधीही मिळतात. त्यामुळे मुलांना त्या गोष्टीची अपूर्वाई वाटत नाही. शिवाय ऐन दिवाळीच्या दिवसात देखील फराळाचं न खाता हॉटेलमध्ये ऑर्डर करणारी मंडळी आहेत. पिज्जा बर्गर मागवणारी मंडळी आहेत. बिर्याणी मागवून खाणारी मंडळी आहेत. म्हणजे ते बासुंदी वगैरे आता त्याची जादू राहिलेली नाही. शिवाय फुलांचे तोरण आकाश कंदील लाईटच्या माळा फारच चकाचौंध असत. पण दुसऱ्या दुसऱ्या दिवशीच सोसायटी मधल्या घरावरील रोषणाई कमी कमी दिसू लागते, कारण मंडळी फिरायला गेलेली असतात. म्हणजे त्या चार दिवसाच्या सणाचा देखील पुरता आनंद घेता येत नाही. 

आता यामध्ये पण आनंदाची गोष्ट अशी आहे की आत्ता लोकं समाजासाठी देखील बर्‍यापैकी जागृत झालेले आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतल्या, किंवा शाळेतल्या किंवा आपल्याच घरातील कामवाली वगैरे, यांना फराळ देणे बोनस देणे हे करतात.काही ठिकाणी गरीब मुलांना फटाके वगैरे वाटप केले जाते.फराळाची पाकीटे करून देखील झोपड्यांमध्ये वाटली जातात. अनाथाश्रमातील मुलांना फटाके फराळ नवीन कपडे इत्यादी गोष्टी वाटल्या जातात. हा एक आताच्या दिवाळी मधील चांगला बदल आहे. शेवटी काळ धावत आहे, त्याच्या नुसार आपल्याला ही धावलं पाहिजे.आमच्या वेळी असं नव्हतं म्हणून चालत नाही. कारण तेव्हा तुमच्याकडे वेळ होता आता लोकांकडे सगळ आहे पण वेळ नाही.


Rate this content
Log in