Yogesh Khalkar

Children Stories Inspirational

3  

Yogesh Khalkar

Children Stories Inspirational

ध्येयवेडा वाचनप्रेमी

ध्येयवेडा वाचनप्रेमी

2 mins
286


आजच्या आधुनिक काळात मोबाईलचे आगमन झाल्यामुळे वाचनाची आवड कमी कमी होत जात आहे. माझ्या लहानपणी मात्र असे चित्र नव्हतं. आमच्या घराच्या शेजारी जे आबा रहायचे त्या आबांमुळे आम्हाला पुस्तक वाचावं लागायचं. शंकर बाबाजी पवार म्हणजे आमचे आबा. 


गावातल्या राम मंदिराजवळ ते राहत होते. लहान मुलांची त्यांना भारी हौस होती. त्यांच्या घरी गेलो म्हणजे ते आम्हाला चॉकलेट किंवा बिस्कीट देत नसत, तर छोटी छोटी गोष्टींची पुस्तके वाचायला देत. त्यांच्या घरी मी बिरबलाच्या कथा, श्यामची आई, पंचतंत्र, हितोपदेश अशी कितीतरी गोष्टींची पुस्तके वाचलेली आहेत. कधीकधी ते मला काही गोष्टींची पुस्तके घरी वाचायला देत असत. घरी नेलेल्या पुस्तकांमधली कोणती गोष्ट मला आवडली आहे ते विचारत ? आवडलेली गोष्ट मला सांगायला लावत. त्यामुळे लहानपणापासूनच वाचनाची आवड माझ्यात निर्माण झाली. सुट्टीच्या दिवशी खेळून दमल्यावर मी आबांकडे जायचो. आबा कितीही कामात असले तरी मला त्यांच्या खोलीत घेऊन जात आणि कपाटातून एखादे तरी पुस्तक वाचायला देत. अशा या अवांतर वाचनाचा फायदा मला शाळेत निबंध लिहीत असताना झाला. निबंध लिहीत असताना मी वाचलेल्या पुस्तकातील कितीतरी वाक्य त्यात असायची. 


दहावीनंतर कॉलेजला गेल्यावर सुद्धा मी आबांकडे जाणे काही कमी केले नाही. आता मी पण कॉलेजच्या ग्रंथालयातून पुस्तक घेऊन आबांकडे जात असे. आबा आणि मी ती पुस्तके एकत्र वाचत असत. पुस्तकात आवडलेली वाक्य आणि परिच्छेद एका वहीत नोंद करून ठेवण्याची सवय लागली ती आबांमुळेच. कॉलेज जीवनात मी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यात भाग घेतला आणि बरीचशी बक्षिसेही मिळवली. याचं श्रेय जातं ते आबांनी लावलेल्या वाचनाच्या सवयीला. स्पर्धेत बक्षिस मिळालं की सर्वात जास्त आनंद आबांना व्हायचा. 


 खरोखर माझ्यामध्ये वाचनाची अशीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या ध्येयवेड्या वाचनप्रेमी आबांना मी काय म्हणावे बरं ? त्यांनी कोणत्याही नात्यागोत्याचा विचार न करता मला त्यांच्याकडे असणारी ग्रंथसंपदा लहानपणापासूनच वाचायला दिली आणि माझ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण केली.


Rate this content
Log in