देव माणुस
देव माणुस


रक्ताची नाती तर प्रत्येकाची असतातच पण काही नाती अशीच सहजच जुळलेली असतात. ती पण एवढी घट्ट विणलेली असतात ना की कितीही लांब असूद्यात पण कायम मनात रूजलेली असतात.
देव असतो, नसतो माहित नाही, आपण तो डोळ्यांनी पाहिलाही नाही पण काही माणसे अशी असतात ना की सदैव देत राहतात, कोणतीही अपेक्षा न करता. आणि सतत मी हे केलं तुझ्यासाठी, मी ते केलं तुझ्यासाठी, मी तुझ्यासाठी एवढं केलं आता तु माझ्या प्रमाणेच वाग, माझंच ऐक, मग भलेही मी तुला चुकीची वागणूक देत असेन तरीही मलाच आदर देत रहा इ. इ. गटात मोडणारी नसतातच. मला वाटतं हीच देव माणसं असावी. साधी, समंजस, कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांना समजुन घेणारी ,हेवेदावे न करणारी देव-माणसं.
अशाच एक काकू आहेत. त्यांच नाव साधना महेश ञिवेदी. काकू साध्या, सरळ, बाहेरून आणि मनातुनही तितक्याच सोज्वळ आणि गोड आहेत. आतुन एक आणि बाहेरून दुसरंच अश्या तर बिलकूल नाहीत. त्यांची स्तुती करावी तेवढी कमीच आहे.
त्यांच घर माझं दुसरं माहेरच जणू हक्काच. मला काकू गरमागरम भजी आणि चहा करून द्यायच्या, त्यांची केलेली भाजी आमच्या घरी आणि आमची त्यांच्या कडे त्यांच्या मुलांसाठी . माझा मोठा मुलगा ,लहान असताना त्यांनी जे आमच्या साठी केलंय ना, खरंच कोणिही नाही करू शकणार. आणि काकूंनी कधीच बोलुनही नाही दाखवलं, एवढंच नाही तर कधी मला जाणवूही नाही दिलं. उलट मलाच तू किती केलंस गं माझ्या मुलांसाठी असंच बोलत राहतात. साहजिकच त्यांच्या अश्या वागण्याने त्यांच्या बद्दलचा आदर द्विगुणीत होतो.
म्हणायला त्या आमच्या शेजारी होत्या. पण नातं रक्ताच्या नात्या पलिकडले. माझ्या मुलासाठी तर त्यांच घर म्हणजे त्याचच स्वताच घर होतं.
तिथेच खाणं, खेळणं, झोपणं सगळंच काकूंकडे. काकू त्याचं सगळंच आवडीने करायच्या, माझ्यावर कोणतेही उपकार केल्याची भावना न दाखवता. काकूंचा परिवारही फारच समंजस आणि मनमिळाऊ!अडचणी च्या प्रसंगी मी बिनधास्त काकूं कडे मुलाला सोपवून जायची,असा विश्वास होता माझा काकूंवर आणि आजही आहेच!
खरंच मी ना कधी विसरले ना विसरेन त्यांना, आज वेळे अभावी माझं जाणं येणं एवढं होत नाही पण कधीतरी खूप कमी गाठ-भेट होत राहते, आता आम्ही नाही आहोत शेजारी पण अजूनही फोनवर बोलणं होत अधुन मधुन.
खरंतर अजून खूप लिहीलं तरीही कमीच पडेल, पण एवढंच सांगावंस वाटतं, काकू (मी त्यांना aunty बोलते) तुम्ही जेव्हा कधिही हा माझा लेख वाचाल ,किंवा मला भेटत राहाल, मी कधीच तुम्हाला धन्यवाद नाही बोलणार कारण मी कधीच विसरणार नाही, हया माझ्या मनात तुमचं एक आदराचं स्थान आहे, जे कोणीही हलवू नाही शकत, ते असंच राहणार तुमच्याच नावाने,माझ्या मनातलं तुमचं आदरणीय उच्च स्थान एक देव माणुस म्हणुन!