डेटिंग गेम
डेटिंग गेम


"एकदम असा अंगावर काय येतोयस,जनावरासारखा.. बाजूला हो..."मोनिका एकांतात बेडवर भेटलेल्या अनोळखी पुरुषावर ओरडली.
"काय झालं? मला काहीच करू देत नाहीयेस. " तो म्हणाला.
"तू किती अती करतो आहेस याचं भान आहे का तुला? एकमेकांना समजून घ्यायच्या आधीच तू....." अपेक्षाभंग झालेली मोनिका बोलता बोलता थांबली.
"समजून घ्यायचं? बकवास आहे हा सगळा. समजून घ्यायला माझ्याकडे वेळ नाही. लेट्स एन्जॉय. दोघांचाही स्ट्रेस कमी होईल." तो पुन्हा मोनिकाकडे जाऊ लागला.
"थांब.. मला तू नाही आवडला. जा तू."
"व्हॉट इज धीस बुलशीट? मी एवढ्या लांबून कशाला आलो? आधी तुला सगळे लाईक्स विचारले तेव्हा तूच म्हणालीस ना 'ओके विथ किसिंग अँड रोमान्स, मग?" तो चिडला.
"मला काही बोलायचं नाही आता. मी तुझ्यासोबत ओके नाही. तू निघ."
"ईडियट. फुकट टाईमवेस्ट... दुसरी तरी कोणी मिळाली असती मला आज..." तो मोनिकाला अपशब्द बोलतच गेला.
आज सकाळपासून डेटिंग साईटवर जोडीदाराचा शोधाशोध करून मोनिकाच्या डोक्यातल्या शिरा दुखू लागल्या. खूप तासांनी साईटवर तिला आता येऊन गेलेला अनोळखी पुरुष भेटला. साईटवर दोघांनी एकमेकांचे फोटोज एकमेकांसोबत 'शेअर' केले. मोनिकाच्या घरी आज कोणी नसल्यामुळे त्यांनी तिथंच भेटायचं ठरवलं. तो येईपर्यंत मोनिकाच्या हृदयात अनेक भावनांची धडधड होत होती. तिने ओठांना लिपस्टिक लावली, संपूर्ण चेहऱ्याचा 'मेकअप' केला.... आता तो येऊन गेल्यावर तिला वाटलं, 'आपला वेळ यात असाच अनावश्यकपणे वाया जातो आणि हाती जे हवं ते तर लागतंच नाही. एक रेलशनशीप हवं, मनासारखा पार्टनर हवा हाच आपला सुरुवातीचा हेतू होता, पण या शोधात आपण डेटिंग साईटवर भरकटत गेलो. जो मला आवडतो तो एकतर माझ्या अपेक्षेत बसत नाही, नाहीतर त्याला मी आवडत नाही. ज्याच्याशी अपेक्षा जुळते, तो आपल्याला दिसायला आवडत नाही. यामुळे आपण मूळ हेतूपासून दुरावून तात्पुरता कोणी बरा वाटला तरी त्याला भेटू लागलो.कित्येकवेळा बेडवर. इतक्याजणांना भेटूनही नातं न जुळल्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं कित्येकदा. आता भेटलेलाही आधी बरा वाटला म्हणून आपण त्याला घरी बोलवलं, पण भेटल्यावर अपेक्षाभंग झाला. आपणही उगाच उतावळे झालो. डिटेलमध्ये बोलूनच त्याला भेटायला हवे होते. कित्येकदा आपण आधल्या रात्रीच दुसऱ्या दिवसाचं प्लांनिंग करतो, पण साईटवर शोध सुरु झाला की सगळंच फिस्कटतं. आजही व्यायाम, वाचन, गाण्याचा रियाज... संध्याकाळ होत आली तरी सगळं राहून गेलं.'
मोनिकाचे विचार संपत नव्हते. तिला आता गाण्याचा रियाज करायचा होता, पण तिच्याही नकळत ती पुन्हा डेटिंग साईटकडे वळली. तिला अचानक आठवलं, 'काही दिवसांपूर्वी भेटलेली एक व्यक्ती आपल्याला आवडली होती आणि त्यालाही आपण आवडलो होतो. आपले विचारही जुळले होते.... त्याच व्यक्तीसोबत आपण रेलशनशिपचा प्रयत्न का करू नये?'.. त्या व्यक्तीचा नंबर तिच्याकडे होता, तीने त्याला मेसेज केला,
"हे.. हॅलो.. तू फ्री आहे का? आज भेटायचं का?"
"नाही, आज नाही..." त्याचा रिप्लाय आला.
"ओह्, ओके. नंतर भेटू मग..."
"नंतर पण वेळ नाही..."
"मग कधी वेळ आहे?"
"आता कधीच नाही."
"अरे आपण दोघंही एकमेकांना आवडलो होतो ना? मागच्यावेळी भेटलो तेव्हा."
"ते तात्पुरतं होतं, विसर आता ते. बाय." तो.
मोनिकाला त्याचा खूप राग आला. 'हाच मुलगा आपल्याला 'आय लव्ह यू' म्हणाला होता.. या शब्दांनाही आजकाल किंमत नाही राहिली.' ती स्वतःशीच म्हणाली. तिला उदास वाटू लागलं. आवरून ती 'वॉक' करायला गेली. जेवण बनवण्याची तिची ईच्छा नसल्यामुळे तिने हॉटेलमधूनच जेवण मागवले. रात्र झाल्यावर ती झोपण्यासाठी पलंगावर पडली पण तिला झोप येईना. अंधाराची तिला भीती वाटू लागली. एक नैराश्य तिला सतावू लागलं. ती पुन्हा उठून गॅलरीत गेली आणि गाण्याचा रियाज करू लागली...
हळूहळू तिचा बिघडलेला मूड बदलू लागला. गाण्यातला सूर सापडताना मनातला बिघडलेला सूरही जुळू लागला. ती रियाजात तल्लीन झाली. रियाजानंतर तिला शांत, समाधानी वाटू लागले. हळुवार वाऱ्याबरोबर अनेक विचारही तिला स्पर्शू लागले,
'स्वतःला कर्मात बुडवून घेण्यात किती खरा, अत्तराच्या दरवळीचा सुगंध आहे. योगीसारखी शांतता आहे. आपण ज्या गोष्टीच्या मागे धावतोय, त्यात वेळ व्यर्थ घालवणे तर आहेच, पण जो आनंद आणि समाधान त्यातून अपेक्षित आहे, ते दीर्घकालीन नाही. किंबहुना त्याबद्दल स्वप्नात केलेली अपेक्षा आणि प्रत्यक्षात उतरलेलं सत्य यात बरीचशी तफावत आहे. इतक्या जणांसोबत रोमान्स करूनही त्यात प्रेमाच्या हळुवार स्पर्शाचा खरेपणा कधी नव्हताच.. वयाच्या सोळाव्या वर्षी आपण पहिले प्रेम केले, तेव्हाच्या स्पर्शात किती मोहकता, आश्वासकता होती. ती आश्वासकता आता कुठल्याच स्पर्शात का नाही? वयपरत्वे असं घडतंच असतं म्हणून की मी नातं तयार व्हायच्या आधीच माझं शरीर कोणाच्यातरी स्वाधीन करते म्हणून? इतक्या जणांना एकांतात भेटूनही, आता तिशी गाठली तरी अजूनही मनानं कोणाशी नातं तयार होत नाही, हेच माझ्या फ्रूस्ट्रेशनचं कारण आहे... आणि त्याला मीच जबाबदार आहे का? एकीकडे आई-वडिलांनी आणलेली स्थळं मला पसंत पडत नाहीत आणि इकडे मानसिक नातं जोडलं जाण्याआधीच मी उतावळेपणानं वागते. सुखाचा शोध जरूर चालू ठेवायचा, पण आता डेस्परेटपणा नको. मनानं जवळ आलो, तरच नात्यात जायचं... शेवटी खरा आनंद, खरं समाधान हे आपल्या कर्मात आहे, याची आज पुन्हा प्रचिती आली आपल्याला.' विचारांचं चक्र घेऊनच मोनिका झोपायला गेली.
सकाळी उठल्यावर मोनिकाला मोबाईलवर डेटिंग साईटवरचे दोन नोटिफिकेशन्स दिसले. आजही ती घरी एकटीच असणार होती, पण तिने ते नोटिफिकेशन्स लगेच उघडले नाहीत. दिवसभर मनासारखी तिने सगळी कामं केली. व्यायाम केला, गाण्याचा रियाज केला आणि मग वेळ मिळाल्यानंतर ती नोटिफिकेशन्सकडे वळली. तिला दोघांपैकी एकजण बरा वाटला.
"हाय मोनिका... धिस इस अनिकेत...' तिला मेसेज आला होता. तिने संवाद सुरु केला.
"हाय अनिकेत, बोल." ती.
"इतका लेट रिप्लाय. आठ तास झाले तुला मेसेज करून. Anyways, आय लाईक यु.. अँड यु?" अनिकेत.
"तुझ्या लाईक्स सांग आधी.. मने जुळतायत का बघू." ती.
"हाहा, मने जुळणं.. ओके. आय लाईक रोमान्स अँड... किसिंग ऑल्सो.."अनिकेत.
"मी त्या लाईकबद्दल नाही, हॉबीजबद्दल विचारतेय." ती.
"भेटूयात आपण. काही जुळलं तर ठीक, नाहीतर रात गयी, बात गयी.. हॉबीज वगैरे जाणून घेऊन काय करायचंय?". अनिकेत.
"हो का? मग तू मला आवडला का नाही हे जाणून घेऊन तुला काय करायचंय?"
"म्हणजे?"
"म्हणजे तुला जर उतावळेपणाने डायरेक्ट बेडवरच भेटायचं असेल तर सॉरी. मी तुझ्या शोधातली योग्य व्यक्ती नाही.. आणि तुही याच दृष्टीने शोध चालू ठेवलास तर तुला
जे मिळेल ते कधीच टिकणार नाही. शेवटी उरेल फक्त डिप्रेशन... आणि 'लाईफ इज नॉट फेअर' म्हणून तूही आत्महत्याच्या मार्गावर जाशील. बघ पटतंय का. ऑल द बेस्ट फॉर सर्च ऑफ पार्टनर." असं बोलून मोनिकाने त्याच्याशी संवाद बंद केला आणि ती समाधानाने हसली..