छंद माणुसकीचा
छंद माणुसकीचा


प्रत्येकाला काही ना काही छंद असावा किंवा तो नसला तरी एखादा छंद जोपासावा.
ज्यावेळी तुमची मानसिक स्थिती खराब असते तेव्हा तो छंद तुम्हाला ताण तणावातून बाहेर काढतो माणसांचे छंद हे वयोमानानुसार बदलतात. माणसाला छंद असावा पण त्याच्या आहारी जाऊ नये.
"घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद" याप्रमाणे मग त्या कमल कोशातच अडकून भ्रमराला प्राण त्याग करावा लागतो .
नुकतीच अक्षरांची ओळख झाली होती वय असेल पाच ते सहा वर्ष तेव्हा रस्त्यात उभे राहून दुकानावर च्या पाट्या वाचण्याचा छंद होता. वयात आल्यानंतर आमचा काळ हा टीव्ही किंवा मोबाईलचा नसल्यामुळे , रेडिओवरची, ग्रामोफोन वरची गाणे ऐकण्याचा छंद लागला होता . आजही 80/ 90 च्या दशकातील गाणी अन् गाणी पाठ आहेत.
वयात आल्यावर छंद जडला प्रेमाचा, आवडत्या व्यक्तीकडे चोरून पाहण्याचा, त्याच काळात फिल्मी दुनियेने बॉलीवूडने वेड लावले व छंद जडला नट, नट्यांची चित्रे जमवण्याचा,यांची माहिती लिहून काढण्याचा शाळेच्या जुन्या वहीत त्याकाळातील जितेंद्र रेखा ,हेमा, जरीना वहाब ऋषी कपूर आणि
एव्हरग्रीन अभिताभ यांची मायापुरी तील चित्रे कापून ती वहीत चिटकवण्याचा.
शालेय वयामध्ये मला वेगवेगळ्या देशांची करन्सी आणि पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद होता माझा एक चुलत भाऊ मर्चंट नेव्ही मध्ये असल्याने तो मला वेगवेगळ्या देशातील नाणी आणि पोस्टाची तिकिटे पाठवत असे ती, मी एका वहीत चिटकवून ठेवत असे.
त्यानंतरच्या काळात शिक्षण नोकरी व लग्न या साऱ्या घडामोडीत छंद म्हणजे काय असतं हेच मी विसरून गेले होते.
खरेतर कविता करणे किंवा कथा लिहिणे हा माझा प्राण आहे माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे पण लग्नानंतरची दहा वर्ष मुले लहानाची मोठी करताना आयुष्यातले सारेच छंद सोडून द्यावे लागले आमचे एक साहित्य मंडळ आहे नील पुष्प साहित्य मंडळ त्यात मी गेले आणि जणू रिचार्ज झाले
मी पुन्हा एकदा जोमाने कथा कविता लिहू लागले. माझी तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत पण मी तो छंद मानता माझ्या आयुष्याचे अविभाज्य अंग मानते.
आयुष्याच्या 35 वर्षे वयाच्या या टप्प्यात आम्हाला पर्यटनाचं लागला. आम्ही नवरा-बायको वर्षातून दोन वेळा देशांतर्गत कुठेतरी एक लांब ट्रीप काढतो. जवळ जवळ 80 टक्के भारत आमचा बघून झाला आहे.
आता पन्नाशीनंतर एक नवा छंद लागलाय भूतदयेचा, माणुसकीचा घरामध्ये आम्ही एक कुत्रा पाळतो काय आणि प्राण्यांबद्दल सर्व कुटुंबाला प्रेम वाटू लागले आमचेच काय पण आमच्या एरियातील सर्वच कुत्रे आम्हाला ओळखतात त्यांना खाऊ घालतो त्यांच्यासाठी पाण्याची बादली खाली एका झाडाला बांधून ठेवलेले आहे. माझ्या घराच्या गॅलरीत चिमणी, कावळे साळुंख्या कबुतरे असे अनेक प्रकारचे पक्षी पाणी प्यायला व दाणे टिपायला येतात माणसांना कितीही खाऊ घातले , तरी माणूस एक वेळ उलटतो परंतु मुक्या प्राण्यांना एक वेळ खाऊ घातलेत तरी ते आयुष्यभर विसरत नाहीत
त्यामुळे रिटायरमेंट नंतर आम्ही दोघे नवरा-बायको याच छंदाला वाहून घेणार आहोत.