असाही एक व्हॅलेंटाईन
असाही एक व्हॅलेंटाईन




आजकाल सगळीकडे चौकोनी कुटुंब आणि प्रत्येक जण आपल्या कामाच्या व्यापात धावतोय ,धावतोय कोणाला कोणाकडे बघायची फुरसत नाही. कोणाकडे जायला वेळ नाही. एकमेकांच्या नात्याबद्दल एक प्रकारचा कोरडेपणा!
मरणाला आणि तोरणाला उगाच आपलं पाटी टाकून यायचं असो.
त्यादिवशी माझ्या पतीचे ऑपरेशन होते. डॉक्टरांनी पण नेमके 14 फेब्रुवारी धरले, आधी लक्षात आले नाही आणि तेव्हा एवढे व्हॅलेंटाईन डे चे प्रस्त नव्हते, असलेच तर, अगदी आठवडा वगैरे साजरा होत नसे. क्वचित एखादे चॉकलेट, एखादा बुके, एखादे ग्रीटिंग म्हणजे झाला व्हॅलेंटाइन.
मुले अनुक्रमे सहा आणि नऊ वर्षाची होती त्यामुळे हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी किंवा कशासाठी त्यांचा काही उपयोग नव्हता.
घरची आणि दारची दोन्हीकडची आघाडी मीच सांभाळत होते. सकाळी नवऱ्याचे एक ऑपरेशन झाले दुसऱ्या ऑपरेशन साठी दुसऱ्या हॉस्पिटल ला न्यायचे होते. ऑपरेशन छोटेसेच होते, पण शेवटी ऑपरेशनच ! त्या एका क्षणी ऑपरेशन थेटर मध्ये नेताना माझा धीर सुटला मी स्वतः मेडिकल प्रोफेशन मधली मला माहित होतं. ऑपरेशन छोटेखानी आहे पण जेव्हा प्रत्यक्ष नवऱ्यावर वेळ आली तेव्हा जवळ वडीलधारे कोणी नव्हते आई-वडील गावी, सासुबाई आजारी, तेव्हा त्यांच्याच गळ्यात पडून मी रडत होते आणि उलट ते माझी समजूत घालत होते.
सकाळी घाईगडबडीने डबा वगैरे करून मुलांना शाळेत पाठवले आणि मी हॉस्पिटलला आले. त्यांना बाहेर आणल्यावरती मी थोडा वेळ बसले मग हॉस्पिटलच्या स्टाफनी सांगितले की तुम्ही घरी जाऊ शकता.. आम्ही त्यांना बघू.
घरी आले मुलांना घेतले गाडीवर ट्रिपल सिट हॉस्पिटल ला आले.
त्यावेळी माझ्या बरोबर एक पाच मिनिट आधी धाकटा दीर आलेला होता .
तो पाहुण्यासारखा दोन मिनिटे उभा राहीला आणि वहिनी मी जाऊ का? असं विचारलं खरंतर त्यांच्या जवळ राहण्यासाठी पुरुष माणसाची गरज होती ते अजून बऱ्यापैकी बेशुद्ध होते त्यांना टॉयलेटला वगैरे नेण्यासाठी एका पुरुष माणसाची गरज होती पण दीर तर पाहुण्यासारखा निघून गेला .पाठचा भाऊ असून तो थांबला नाही. आम्ही त्याच्यासाठी खूप काही केले होते... असो प्रत्येकाचे आपले कर्म आपल्यापाशी.
मुले खूप लहान होती त्यांना घरी एकटं सोडता येत नव्हतं मग मुलांना रिक्षाने घरी पुढे पाठवलं आणि मी थांबले.
खाली जाऊन गुलाबाचा गुच्छ आणि एक चॉकलेट घेऊन आले.
भले नवरा हॉस्पिटलला का असेना पण आपण त्याला देऊया.. ते काही अजून शुद्धीवर नव्हते. माझ्याशी बोलत होते, पण अगदी एखादा शब्द तो पण बोबडा बोबडा.
अशा परिस्थितीत पण त्यांनी मला घरी जायला सांगितले मी एकटा मॅनेज करीन तु मुलांजवळ घरी थांब.
मी त्यांना हळूच कानात सांगितले तुमच्या उशाला चॉकलेट ठेवले आणि समोरच पायथ्याशी स्टुल वरती बुके ठेवलाय. त्यांनी मान डोलावली आणि मी त्यांच्या गालावर हलकेच ओठ टेकवून जड मनानेच घरी आले.
दुसऱ्या दिवशी ते छान शुद्धीवर होते तेव्हा त्यांना मी कालच्या वेलेंटाइन बद्दल विश केले आणि मी तुमच्या उशाला चॉकलेट ठेवलय आणि समोरच बुके ठेवलाय सांगितलं.. ते म्हणाले मला काही माहीत नाही. मला काही आठवत नाही.. त्यातली फुले तर सुकून गेली होती.. पण आमचं प्रेम मात्र अजून घट्ट झालं होतं. अजून दृढ झालं होतं. आज त्यांना सर्व काही खायचे-प्यायचे होते. मग ते कालचे चॉकलेट तुकडा काढला, त्यांच्या तोंडात भरवला आणि एक तुकडा मी खाल्ला आमच्या दोघांच्या डोळ्यातून देखील अश्रुधारा चालल्या होत्या