अलक(भक्ती)
अलक(भक्ती)
एका छोट्या गावातील दत्ताच्या देवळात रघुनाथराव पुजारी होते. फार जागृत देवस्थान होते ते. गरीबीमुळे त्यांचे शिक्षण फार झाले नव्हते . पण वडिलांच्या आशीर्वादाने त्यांना अध्यात्मिक ज्ञान भरपूर होते. संस्कृत श्लोक पठण, पूजा, वैदिक ज्ञान यात ते अतिशय हुशार होते. त्यांच्या मनात कधी कधी विचार डोकावून जायचा की आपण पण खूप शिकलेलो असतो तर, आज गावात मोठे घर, गाड्या, नोकर चाकर असते. आज गावातील एक श्रीमंत व्यक्ती देवळात दर्शनाला आली. रघुनाथरावांनी त्यांच्या हातावर प्रसाद ठेवल्यावर ती व्यक्ती त्यांना म्हणाली "जगातले सगळ्यात भाग्यवान तुम्ही आहात, कारण तुम्ही साक्षात गुरुदत्तांच्या सहवासात दिवसभर असतां. फार नशीब घेऊन आला आहात."व तिथून ती व्यक्ती हळूच निघून गेली.
रघुनाथराव त्या व्यक्तीकडे बघून गुरु दत्तांच्या मूर्ती कडे बघत राहिले. ती मूर्ती हळुवारपणे हसताना त्यांना दिसली.
