आठवणी
आठवणी
1 मे 1999 या दिवसाची एक खास आठवण आहे. 30 एप्रिल आणि 1 मे असे जोडून आम्ही दोघे, आमची दोन मुले, यांचे दोन मित्र, त्यांच्या बायका आणि एकाचा मुलगा असे एकूण मोठे सहा आणि छोटे तीन फिरण्यासाठी गेलो.
पालीचा गणपती बल्लाळेश्वर, इतिहासप्रसिद्ध महाडचे चवदार तळे आणि रायगड किल्ला असे बघण्याचा प्लान होता. त्यानुसार आम्ही गाडी केली होती. रस्त्याने जाताना प्रथम पालीच्या गणेशाचे दर्शन केले. त्यानंतर महाड येथे मुक्काम केला. महाडचे इतिहासप्रसिद्ध चवदार तळे बघितले.
दुसऱ्या दिवशी रायगडकडे कूच. रोप-वे सुरू होऊन साधारण दोन-तीन वर्षे झाली होती. आम्ही रोप-वेने गडावरती गेलो.
आयुष्यात पहिल्यांदा रायगड किल्ला पाहत होतो. तो इतका उंच आहे की मान वर करून बघितले तर डोक्यावरची टोपी नक्की खाली पडेल. त्याचे सुळके आकाशात शिरल्यासारखे वाटतात. रोप-वेने जाताना काळजाचा ठोका चुकतो, खालून बघताना तर असे वाटत होते की हा रोप-वेचा पाळणा वरती जाऊन एका दगडावर आपटतो की काय? जाताना थोडा वेळ रोप-वे, काही सेकंदाची विश्रांती घेतो. एवढ्यात वाऱ्याच्या वेगाचा अनुभव हलणारा पाळणा मनाचा ठोका चुकवत होता. आता जर या दरीमध्ये आपण पडलो? तर आपले हाडदेखील मिळणार नाही.
गडावर पोहोचल्यानंतर डोळे भरून गड पाहिला पण मन मात्र भरलं नाही. जगदीश्वराचे मंदिर पाहिले, राणी महाल, एकावर एक बांधलेली सात मजल्यांची मीटिंग घेण्याची जागा, टकमक टोक, हिरकणी बुरुज, दारूगोळ्याच्या कोठाराची जागा, महाराजांची समाधी, मेघडंबरी इत्यादी सर्व पाहिले. महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक झालो.
शिवराया! या "महाराष्ट्र भू"ला तुमची गरज आहे. पुन्हा जन्म घ्या अशी प्रार्थना केली आणि परतीच्या रस्त्याला लागलो.
हा 1 मे लक्षात राहण्याचे कारण म्हणजे कामगार दिनादिवशी यांच्या कंपनीने घाटकोपर ब्रांच बंद केली आणि कामगार दिनादिवशी कामगारांना बाहेर काढले. त्यानंतर जवळ जवळ दीड वर्ष मिस्टर घरात होते. पुन्हा ऑक्टोबर 2000ला यांची कंपनी सुरू झाली. तो काळ आम्ही अतिशय कठीण परिस्थितीत काढला.