आठवणी
आठवणी


ही गोष्ट आहे पंधरा-सोळा वर्षांपूर्वीची, तेव्हा माझा मोठा मुलगा चिन्मय दहाएक वर्षाचा होता.
त्याला सर्दी, पडसे, ताप आल्यामुळे डॉक्टरांकडे नेले होते. त्यांनी काही गोळ्या आणि एक Gatifloxacin नावाचे नवीन अँटिबायोटिक दिले.
नशीब, त्यादिवशी माझी सुट्टी होती आणि मुलाला पण शाळेत पाठवले नव्हते. त्याला सकाळी ब्रेकफास्ट दिला आणि गोळ्यांचा डोस दिला, त्यानंतर मी माझ्या घरकामात रमून गेले. तो आपल्या बेडरुममध्ये झोपलेला होता आणि मी बाहेर हॉलची लादी पुसत होते. अचानक तो आतून धडपडत बाहेर आला. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती. चालता येत नव्हते आणि नीट बोलतापण येत नव्हते.
"आई मला काय झालं!" हे मला तो बोबड्या स्वरात बोलला आणि मी स्वतः मेडिकल फिल्डमध्ये असल्यामुळे माझी पटकन ट्यूब पेटली की याला रीऍक्शन आलेली आहे. त्याबरोबर तशीच गाऊनवरती धावत-पळत ओळखीच्या मेडीकलवाल्याकडे गेले. त्याचवेळी छोटा शाळेसाठी तयार होऊन बसला होता, त्याची परीक्षा होती. त्याला एका हाताला धरून धावत धावत शाळेत सोडले. शाळा रस्त्यातच होती आणि ओळखीच्या मेडीकलवाल्याकडे जाऊन इंजेक्शन avil आणि dexa घेऊन आले. फटाफट फोडले आणि मुलाला टोचले. त्यानंतर कितीतरी वेळ त्याचे डोके मांडीवर घेऊन त्याची पल्स बघत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत मी बसले होते.
नशीब मी त्याच क्षेत्रांमधली असल्यामुळे काय केले पाहिजे, हे मला माहित होते पण जर इतर कोणी पालक असते तर त्यांची परिस्थिती खराब झाली असती. शिवाय मुलाला शाळेत पाठवले असते आणि मी पण कामावर असते तर काय झाले असते. शाळावाल्यांना त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले असते. शिवाय कधीकधी शिक्षक मूल नाटक करत आहे असे समजून दुर्लक्ष करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या डॉक्टरांना त्या गोळ्याबद्दल बोलले, या गोळ्या इतर कुणाला देऊ नका. मी याच फिल्डमध्ये असल्यामुळे माझा मुलगा वाचला, इतरांचे काय होईल?
तरी ती आठवण मी अजून विसरू शकलेली नाही.