आठवणी
आठवणी


आज आमच्या लग्नाला तारखेनुसार 28 वर्षे पूर्ण झाली .अशी तिथीनुसार अक्षय तृतीयेलाच 28 वर्षे पूर्ण झाली होती.
लग्नाचा अल्बम बाहेर काढून बघितला, कितीतरी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या फोटोत माझे आई-वडील आहेत सासूबाई आहेत.. माझे काका काकू यांचे काका काकू अशी किती तरी ओळखीची परंतु आज काळाच्या पडद्याआड गेलेली मंडळी त्यात आहेत.
मुळात आमचे लग्न हे जरी अरेंज मॅरेज असले तरी माझे आई-वडील गावी असल्यामुळे आणि यांच्या घरामध्ये हेच मोठे असल्यामुळे आमच्या लग्नाची बरीचशी कामे आम्ही दोघांनी एकत्र केलेली आहेत. अगदी छापायला टाकलेल्या पत्रिका देखील आम्ही दोघांनी एकत्र जाऊन आणलेल्या आहेत.
आदल्या दिवशी हे त्यांच्या मामेबहीण इकडे डोंबिवली मुक्कामी आले होते. लग्न डोंबिवलीत होते आणि रात्रभर लाईट गेलेली. यांना रात्रभर मच्छरने फोडले. त्यातच जुनी एक तोळ्याची म्हणजे बारा ग्रामची यांची चेन घरांमध्ये कुठेतरी हरवली. स्वतःच्या लग्नाचे सामान जीप मधून हे स्वतः डोक्यावरून कार्यालयात आणत होते.
आता कार्यालयात कोणी हळदीचा कार्यक्रम ठेवत नाही परंतु आमच्याकडे होता. सकाळीच घाणा भरणे, हळद, आंघोळी यातच अकरा कधी वाजले कळलं नाही. बारा वीस चा मुहूर्त होता.
मात्र त्या काळात पण मी माझी स्वतःची हाऊस करून घेतली ब्युटीशियन सांगितली. त्या काळात व्हिडिओ शूटिंग हा प्रकार नवीन होता पण त्यांच्याकडून फोटो आणि माझ्याकडून व्हिडिओ शूटिंग असे ठरले. हाॅल वाल्याची मोनोपॉली असल्यामुळे व्हिडिओ शूटिंग, जेवण, वाजंत्री सर्वच काही कंपल्सरी त्याच्याकडे होते.
त्याकाळात माझ्या लग्नाचा खर्च 35000 झालेला आहे आणि मला सांगण्यास अभिमान वाटतो यातील एकही पैसा मी वडिलांचा घेतलेला नाही.
मी लग्नाआधी पाच वर्ष नोकरीला लागले होते त्यातून माझे पैसे साठवून रिंगा ,चेन, आणि अंगठी केलेली होती
बेंगलोर मध्ये ट्रेनिंग ला असताना माझ्या आवडीप्रमाणे मी माझा शालु खरेदी करून ठेवला होता. तिथून खड्याचा सेट देखील विकत घेतलेला. आणि परमेश्र्वराची माझ्यावर एवढी कृपा होती माझा काही ऍरीयस अडकलेला होता त्याचे 18000 मला लग्नाच्या बरोबर एक दीड महिना आधी मिळाले ते तसेच उचलून जाऊन मी हॉल साठी भरले.
बाकी लग्न छान, व्यवस्थित झाले लग्न झाल्यानंतर हाॅलवाल्याचा हिशोब मलाच बघायचा होता. त्याने लायटिंग चे, अमक्याचे, तमक्याचे करत पाच हजार रुपये डिपॉझिट परत दिले नाही आणि गंमत म्हणजे नवरा-नवरीच्या वेशात मी आणि हे दोघे पण त्या हाॅलवाल्याशी वाद घालत होतो
त्यानंतर जीपने डोंबिवली ते भांडुप आम्ही गेलो. तेव्हा बुफे नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता रीतसर पंगत वाढण्याची प्रथा होती आणि उरलेले अन्न दोन्हीकडची मंडळी बांधून नेत असत. त्याप्रमाणे आम्ही देखील कार्यालयातील उरलेले मसाला भात जिलेबी साधा भात आमटी काय काय पदार्थ घरी घेऊन आलो. घरात गेल्या गेल्या शालू सोडून साधी साडी नेसून मलाच घरच्या मंडळींची पंगत वाढावी लागली.
मनात खुप राग आला होता, पण सांगणार कोणाला सासुबाई थकलेल्या बाकी दिर भाचा नवरा नणंद सारे होते, पण मलाच नवी नवरी असून देखील वाढायला लागले.
एक दिवस हाथीवरी मिरवतसे नवर्या परी एक दिवस तोही कसा पायी चालतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो
हे गाणे नेहमी वडील म्हणायचे ते आठवले.