आनंदी आनंद गडे...!
आनंदी आनंद गडे...!
आज युवराजला सुट्टी नव्हती पण त्याचे मम्मी-पप्पा त्याच्या आजूबाजूला दिसत होते. आज गोष्ट जरा निराळी असावी असे त्याला जाणवले. मम्मी-पप्पाचा सहा वर्षाचा युवी आज खूप आनंदात होता... वयाच्या सहा महिन्यापासून दिवसभर युवराज पाळणाघरात राहत होता. संपूर्ण दिवस तिथे राहून आल्यावर थकलेल्या मम्मी-पप्पाजवळ खेळू म्हटले तर दोघांजवळ त्यांच्या फोन आणि लॅपटॉपपासून सवडच नव्हती.
परंतु, आजची सकाळ नेहमीपेक्षा वेगळी होती. सकाळी उठल्यावर त्याच्या मम्मीने त्याला गोड पापा दिला आणि तिच्या मिठीत घेतले होते. त्याला सांभाळण्यासाठी असलेली दीदी आज आजूबाजूला त्याला दिसली नाही. पण आज ती दिसत नाही म्हणून मम्मा अजिबात चिडचिड करीत नव्हती, हे त्याला आश्चर्य करुन गेले...
रोज सकाळी फक्त बाय बाय करताना दिसणारा पप्पा आज त्याच्या बाजूला झोपलेला बघून त्याला खूप आनंद झाला. झोपेतच तो त्याच्या पप्पाला मिठीत जाऊन अजून दडून झोपला. त्याच्याभोवती आपले हात गुंडाळत पप्पाने त्याला अजून कवेत घेतले होते...
रोज रोज जेवण बनवण्याऱ्या अम्माने बनवलेले खाऊन त्याला कंटाळा आला होता. त्याच्या मम्माकडेसुद्धा कधी त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने बनवून द्यायला वेळ नव्हता. मग त्याला जबरदस्ती दीदीच्या हाताने खाणे भाग होते. आज मात्र सगळं उलट होतं. आज त्याची मम्मा त्याच्यासाठी नाश्ता बनवत होती. गरमागरम पोहे त्याच्यासमोर आणत मम्माने दोन प्लेटमध्ये ते टाकले. आज दीदी नाही तर मला माझ्याच हाताने खावे लागणार म्हणून मान खाली घातली असता मागून त्याचा पप्पा आला आणि "हे युवी... प्लेट आण. आपण सोबत नाश्ता करु..." म्हणून त्याच्या पप्पाने त्याला त्याच्या हाताने घास भरवला होता...
दुपारच्या जेवणात मम्मीने पुरी भाजी बनवली होती.
"खूप टेस्टी झाली आहे मम्मा..." म्हणत युवी मम्माची तारीफ करीत होता. घरात कधी मावशीने सुट्टी घेतली तर मम्माला स्वयंपाकघरात युवीने कधीच बघितले नव्हते. याउलट स्विगीने जेवण किंवा डोमिनोजचा पिझ्झा घरी आलेला त्याने पाहिला होता. पण आज पहिल्यांदाच मम्माच्या हाताचे जेवण बघून तो खूप खुश होता.
जेवणानंतर युवीचा पप्पा आज त्याच्यासोबत मनसोक्तपणे मस्ती करीत होता. पकडा पकडी, बॅट बॉल, आंधळी कोशिंबीर असे अनेक खेळ खेळत त्याच्या लहानपणीच्या गमतीजमती सांगत होता. त्याला असे निवांत बघून युवीचा आनंद गगनात मावेनासा होता...
पप्पा जरा वामकुक्षीकडे वळल्यावर त्याची मम्मा त्याच्यासोबत क्रेऔन्स घेऊन बसली होती. स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईनची मज्जा सांगत घरात त्याचा खेळ सुरु झाला. थोड्यावेळाने मम्मा छान चित्र काढत होती तर युवी त्यात विविध रंग भरत होता. मग मम्मा आणि युवीने एबीसीडी लिहून काढली. खूप नवीन नवीन गोष्टी मम्माने त्याला आज वाचून दाखविल्या होत्या.
सापशिडी, कॅरम, यूएनओ क्रॉसवर्ड असे अनेक खेळ आज घरात खेळले जाऊ लागले. मम्मा त्याच्यासाठी 'साखरेची गोणी' झाली होती तर पप्पा 'छान घोडा' झाला होता. दिवसभर मम्मा-पप्पा सोबत खेळून, त्याला खूप आनंदी आनंद झाला होता. मस्ती करून तो खूप थकून गेला आणि मम्माच्या कुशीत आज तो झोपी गेला होता...
परत हे क्षण कधी येतील माहिती नाही, पण आज भेटलेल्या मम्मा-पप्पाकडून तो त्याचे लाड करून घेण्याची कोणतीही संधी तो गमवणार नव्हता...