आजीची गोष्ट
आजीची गोष्ट
आमच्यासमोर एक आजी राहायच्या. आम्ही जेवणाचे ताट वाढून घेऊन आजींच्या घरी जेवायला आणि झोपायला पण जायचो. आजी आम्हाला जुन्या ओव्या ऐकवायच्या, गोष्टी सांगायच्या. त्या काळातल्या गोष्टी राजा, राणी, आणि प्रधान यांच्याभोवती गुंफलेल्या असायच्या. एकदा आजींनी सांगितलेली गोष्ट आजदेखील स्मरणात आहे.
एक राजा होता. त्याला काही ना काही कारणाने प्रधानाची परीक्षा घ्यायची होती. त्याने दरबारामध्ये प्रधानाला सांगितलं की. मला तीन दिवसांमध्ये अर्धी पतिव्रता आणि अर्धी शिंदळकी करणारी बाई पाहिजे, नाहीतर तुला पदावरून काढून टाकतो. प्रधानाला मोठी चिंता पडली म्हणजे अशी अर्धी पतिव्रता आणि अर्धी शिंदळ बाई कुठून आणायची? त्याला रात्रीची झोप लागत नाही. त्याची बायको कारण विचारते, त्याबरोबर प्रधान तिला दरबारातल्या किस्सा सांगतो. त्यावर बायको म्हणते एवढंच ना? मी देते अशी बाई आणून! तुम्ही उद्या दरबारात जा व आठवड्याची मुदत मागून घ्या. त्याप्रमाणे प्रधान करतो.
मग त्याची बायको स्वतःच्या घरापासून ते राज्याच्या रंगमहालापर्यंत एक भुयार खणून घेते. तसेच राजाला अमुक एक दिवशी तू तयार राहा अशी बाई तुझ्या महालात येईल, असे सांगितले जाते. ती नवऱ्याला कातीणिची अंडी गोळा करायला सांगते. ती मोत्यासारखी दिसतात. नंतर त्या भुयारामध्ये एकाबाजूला तेलाच्या, मधाच्या घागरी तर दुसऱ्या बाजूला समया ठेवण्यास सांगते. त्या रात्री ती आपल्या एका सखीला घेऊन भुयारातून राजाच्या महालात पोहोचते. जाऊन राजाच्या मंचकावर बसते. राजा तिच्या चेहर्यावरचा पदर बाजूला काढणार एवढ्यात हातात लपवलेली कातीणीची अंडी राजाच्या तोंडावर फेकते. राजाला वाटतं मोती आहेत, तो खाली वाकून वेचत असताना ती भुयारातून पळत सुटते. भुयारात तिची सखी वाट बघत असतेच. राजा तिच्या मागे पळत येतो. ही समया विझवत पुढे पळते व सखी तेलाच्या व मधाच्या घागरी आडव्या पाडते. राजा त्या अंधारात घसरून पडतो व पुन्हा आपल्या महालात जाऊन गुपचूप मंचकावर निजतो.
दुसऱ्या दिवशी राजा दरबारात एक उखाणा घालतो,
"अंधारातून आली जाई देखली, पण चाखली नाही."
पुन्हा त्याचे उत्तर प्रधानाला शोधण्यात सांगतो. प्रधान घरी येऊन बायकोला सांगतो त्यावर ती उत्तर पाठवते ते असे,
"राजा गैबानी लागला मोत्या पोळ्याच्या ध्यानी,
अशी अस्तुरी माझी शानी शहाणी,
निघून आली बाणावाणी!
यावर राजा काय समजायचं ते समजतो आणि पुन्हा कधी प्रधानाला त्रास देत नाही.
ही गोष्ट मला लहानपणी ऐकताना तर आवडायची पण आता तिचा अर्थ समजल्यावर अधिक आवडते कारण मोठ्यामोठ्या शहाण्या पुरुषांमागेदेखील शेवटी एक बाईच उभी राहते. पतीला वाचवण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावते आणि त्यातून सहीसलामत बाहेर पण येते.