आईचे हळवे मन
आईचे हळवे मन
आ-आत्मा
ई-ईश्वर..
ईश्वराचा आत्मा जिथे निवास करतो ती आई.
नऊ महिने उदरात वाढवते ती आई.
अनेक यातनातून मूलं जन्माला घालते ती आई.
लहानपणात जपते ती आई.
सुसंस्कार लावते ती आई.
स्वतः कष्ट करून मुलांना सुखी करते ती आई.
जेवणापासून शाळेत जाईपर्यंत सारे शिकवते ती आई.
आजारपणात उशाशी बसून काळजी घेते ती आई.
चुकल्यावर हातात छडी घेवून शिस्त लावते ती आई.
काय आणि किती आठवणी हो आईच्या ...
आई ह्रदयातले मखर त्या मखरात तिचे अढळ स्थान ते कोणीही हिरावू शकत नाही.
मुलगा काय किंवा मुलगी काय यांच्या संस्काराचा उत्तम पाया ही माऊलीच तर आहे.
सुखदुःखात साथ देणारी माय आपण कितीही मोठे होऊ दे,पण घरी आल्यावर डोक्यावरून तिचा फिरणारा हात,तो स्पर्श काय कसा गेला आजचा दिवस?हा तिचा प्रश्न...क्षणात दिवसभराचा शिण घालवतो.
आपले लग्न होते .मुली संसारात रमतात.मुलांची जबाबदारी वाढते. माऊलीला जरा आता एकट वाटायला लागत.
मुलीच्या पाठी संसारात तिला काही अडचणी आल्या तर खंबीरपणे उभी राहते.
मुलाच्या संसारात रममाण होते. पण आलेली सूनबाई जर लेकीप्रमाणेच वागली तर प्रश्नच येत नाहीत.आणि सासू झालेल्या आईनेही आपले विचार जरा बदलावेत.
मग त्या आईच्या मुलाचा,मुलीचा संसार सुखाचा होईल.
आई ही आईच असते.
तिची सर कुणालाच नसते
सर्वांच्या सुखातच ती सुखी असते
लाडात वाढलेली ती पण एक कन्या तर असते...
आई हा विषय खूप मोठा आहे .
मी साधारणच लिहिलेय.
आता जरा मनातलं लिहिते.. आईचे मन हळवे कसे??
मुलगी सासरला गेली आहे. तिला काही त्रास तर होत नसेल ना! या विचाराने मन पोखरून जाते. पण मुलीच्या संसारात कधीही ढवळाढवळ करायची नसते. कारण ज्याच्या हाती आपण सोपवले आहे तो सक्षम आहे हेच बघून आपण मुलीचा हात त्याच्यात दिलेला असतो.
हा पण ज्या वेळी मुलीला आपली गरज आहे त्यावेळी मात्र तिच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभ राहिल पाहिजे.
मुलीला मुलं होतात. ती आपली नातवंड खेळवण्यासाठी जीव खूप धडपडतो. पण कितीही केलं तरी ती जावयाची मुलं असतात. आपल्या घरी थोडा वेळ येतील आणि जातील. पण अशावेळी आजीचं नातं खूप वेगळं असतं. म्हणतात ना दुधावरची साय खूप छान असते. तशी ही मुला मुलींची मुलं हे खूप प्रिय असतात.
आईचे हळवे मन नातवंडांकडे खूप ओढ घ्यायला लागते. भेटायला कोणी आलं नाही तर मन अस्वस्थ होते. मग पर्स उचलायची, खाऊ घ्यायचा आणि आपण तिच्या घरी जाऊन मुलांना भेटून यायचे. असे हे आपले हळवे मन.
मुलगा परदेशी शिकायला आहे. आता तिथे नोकरीलाही लागलेला आहे. अशावेळी त्याची रोज आठवण येते.
आता तर काय लग्न करून परत तिथेच स्थायिक झाला मुलगा.. यावेळी घरामध्ये काही अडचण आली, आजारपणं आली तर अशावेळी आवर्जून आठवण येते. कारण आता या हाताला बाकीची काम करायची सवय राहिलेली नसते. काम करण्याची क्षमता कमी झालेली असते. मग काय कोणावर तरी अवलंबून राहावे लागते. मग एकांतात या मुलांच्या आठवणी काढत हळूवार डोळ्यातून पाणी गालावर ओघळत असते.
आपल्या ह्या अश्रूंचा कोणालाही त्रास नको. न नवऱ्याला ना कुटुंबाला ना मुलांना... असे हे आईचे हळवे मन. जमले तर सर्व मुलांनी आईच्या या मनाला जपावे. तिची काळजी घ्यावी. जरी दूर देशी राहत असाल तरी रोज एक फोन करावा. मुलींनी सुद्धा आपल्या मायेसाठी आपण फोन करावा. आता तर व्हिडिओ कॉल उपलब्ध आहेत. माणूस समोरासमोर दिसत आहे. त्याचे हावभाव समजत आहेत. मग अशावेळी कॉल केला नाही तर आईच्या मनाला काय दुःख होत असेल याचा विचार मुलांनी करावा.
आणि जी मुलं जवळ आहेत. त्यांनी आपल्या आई-वडिलांना टाकून बोलू नये. त्यांनीच लहानपणापासून तुम्हाला सांभाळलेले असते. काही चुका होतात वृद्धांच्या हातून. ती चूक छान शब्दात समजून सांगावी. त्यांना अपशब्द वापरू नयेत. या अप शब्दांनी मनावर इतका घात होतो की त्यांचे पुढील आयुष्याची उभारी संपते. त्यासाठी देवाने दिलेल्या तोंडाचा आपण वापर योग्य तो करावा. अपशब्द कोणालाच वापरू नयेत.
काही कारणास्तव शब्द तोंडातून गेला तर सॉरी म्हणून तात्काळ तो विषय मिटवावा.
आई-वडिलांना काय हवे असते हो वेगळं! फक्त तुम्ही त्यांची रोज चौकशी करा. जेवलात का हे विचारा. बरे आहात ना हे विचारा. नातवंडांबरोबर खेळू द्यात. मग बघा हेच वृद्ध तुम्हालाही आवडतील आणि वृद्धांना तुम्ही आवडाल..... ते तुमचे परके नसून आपले आहेत हाच विचार मनात ठेवावा... आईचे हळवे मन जपलेत तर पुढे तुमचे मन जपणारे अनेक लोक समाजात मिळतील. कुटुंबात मिळतील. तुमची मुलं तुम्हाला छान सांभाळतील. हे सर्व अनुभवाचे बोल आहेत. जसे आपण वागतो तसे आपल्याकडे वाढून ठेवलेले असते. हे म्हण खोटी नाही खरी आहे.
एवढे एक वाक्य लिहिते आणि संपवते....
" लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते"