आईचा श्याम
आईचा श्याम
लहानपणापासून साने गुरुजी लिखित श्यामची आई गोष्टी ऐकत व वाचत मोठा झालेला हा श्यामदेखील साने गुरुजीसारखाच सोज्वळ, मनमिळाऊ आणि इतरांना नेहमी मदत करणारा होता. त्या श्यामची ही गोष्ट आहे.
नवापूर गावात एक गरीब सखा आणि सुनंदा नावाचे जोडपे राहत होते. त्यांना श्याम नावाचा एकुलता एक मुलगा होता. लहान असताना तो फारच नटखट होता. वडिलांचा लाडका होता तर आईचा खूपच आवडता होता. मोलमजुरी करून ते जोडपे आपला उदरनिर्वाह चालवत असे. श्याम तीन वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. सुनंदावर तर या घटनेने डोक्यावर आभाळच कोसळले होते. " बाबा, बाबा " असे म्हणत श्याम रोज रडायचा. त्याच्यासोबत आईदेखील पदराआड अश्रू गाळायची. आता घरात फक्त दोघेच होते. दिवस कसेतरी निघून जात होते मात्र रात्र संपत नव्हती. श्याम देखील रात्रीला बाबांची आठवण काढून रडायचा. त्याला शांत करण्यासाठी आणि मन रिजवण्यासाठी ती रामायण-महाभारतातील तसेच इतर अनेक गोष्टी सांगायची. गोष्ट ऐकत ऐकत श्याम झोपी जायचा.
रोज रात्री श्यामला गोष्टी ऐकण्याचा एकप्रकारे नादच लागला होता. तेच ते गोष्ट ऐकून तो कंटाळून जात असे म्हणून श्याम आईला म्हणायचा, " आई, दुसरं गोष्ट सांग ना." यावर आई विचारात पडायची श्यामला कोणती गोष्ट सांगायची. सुनंदा चांगली दहावी पास झाली होती. तिला पुढे शिकण्याची इच्छा होती मात्र दहावी पास झालं की सखाचं स्थळ बोलून आलं आणि सुनंदाच्या आई-बाबांनी तिचं लग्न ठरवून टाकलं. सुनंदाचे आई-बाबा देखील गरीब होते नि मोलमजुरी करून गुजराण करीत होते. सुनंदा समजदार होती. आपल्या आई-बाबांना आपल्यामुळे त्रास होऊ नये म्हणून तिने काही आढेवेढे न घेता सखा सोबत लग्न केलं. सखा खूप चांगला होता. पण नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. चार-पाच वर्षांचा संसार सुरळीत चालला आणि सखा देवाघरी निघून गेला. शाळेत शिकताना सुनंदा एक हुशार मुलगी होती. तिचे वाचन चांगले होते म्हणून शाळेतील शिक्षक नेहमी तिलाच वाचण्यासाठी पुढे करायचे. शाळेत असतांना तिने पाठ्यपुस्तकासोबत इतर अवांतर पुस्तके वाचन केली होती. त्यात साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक देखील तिने वाचले होते. त्यातल्या काही गोष्टी तिला आठवत होत्या पण श्यामला ती गोष्ट सांगण्यासाठी तिला अजून एकदा ते पुस्तक वाचायचे होते. म्हणून तिने एके दिवशी गावातल्या शाळेत गेली आणि तेथील गुरुजीला श्यामची आई पुस्तक असेल तर द्या असे म्हणाली. गुरुजीने आश्चर्यकारक नजरेने पाहिले आणि कपाटात शोधाशोध करून तिच्या हातात ते पुस्तक दिले. महिनाभरात हे पुस्तक परत करतो असे ती सरांना म्हणाली. तेव्हा सरांनी हे पुस्तक आपणांस भेट म्हणून देत आहे. तुमच्याजवळच ठेवा. आजपर्यंत वाचण्यासाठी पुस्तक द्या म्हणून कोणीही आलं नाही. तुम्ही पाहिले व्यक्ती आहात जे की शाळेत वाचण्यासाठी पुस्तक मागायला आलात. माझ्याकडे या पुस्तकाचे अजून दोन प्रती आहेत म्हणून हे पुस्तक तुमच्याजवळ असू द्या. सरांना धन्यवाद देत ती आपल्या घरी गेली.
त्या दिवशी रात्री " श्याम मी तुला एका दुसऱ्या श्यामची गोष्ट सांगणार आहे, ऐकतोस ना ! श्याम देखील नवीन गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून आनंदित झाला. त्या दिवशीपासून श्याम रोज रात्री श्यामची आई ऐकू लागला. त्याची आई त्याला समजेल अशा भाषेत सांगत होती.
श्याम आपल्या आईला कशी मदत करत होता ? त्याचा स्वभाव कसा होता ? शिक्षण कसे पूर्ण केले ? त्या बालबोध वयात त्याच्यावर या गोष्टीने असे काही संस्कार केले की, तो जसा जसा मोठा होऊ लागला तसा तसा त्याच्या वर्तनात बदल होऊ लागला. श्यामची आई या गोष्टीमधल्या श्याम सारखे आपण ही वागावे असे त्याला वाटू लागले. शाळेत त्याला आईसारखेच प्रेमळ आणि कल्पक शिक्षक लाभले. श्याम हळूहळू मोठा होऊ लागला. आता तो आईला सर्व कामात मदत करू लागला. पहाटे लवकर उठायचा आणि विहिरीवरून पाणी आणून घरातील हौद भरून काढायचा, त्याच्यासाठी आणि आईसाठी चुलीवर पाणी गरम करायाचा, स्वयंपाक करण्यात मदत करायचा, त्याला जेवढी कामे जमतात तेवढी काम तो करायचा. यामुळे आईला खूपच मदत मिळायची. शाळेत देखील तो सर सांगेल ती कामे मन लावून करायचा त्यामुळे शाळेत देखील तो सर्वाना हवाहवासा वाटायचा. सायंकाळी शाळा सुटल्यावर शेण गोळा करून आणायचा, आई येईपर्यंत भात करायचा आणि डाळ शिजवून ठेवायचा. आईने एकदा समजावून सांगितले की ते काम पक्के लक्षात ठेवायचा व आई घरी येईपर्यंत पूर्ण करायचा. सुट्टीच्या दिवशी आईसोबत शेतात कामाला जायचा. एवढे सगळं करतांना अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचा नाही. पूर्वी आई त्याला गोष्टी सांगायची तर आता तो आपल्या आईला शाळेतील गमतीजमती सांगायचा. त्याचे बोल ऐकत ऐकत थकलेल्या आईला कधी झोप लागली हे कळायचे देखील नाही. आई झोपल्यावर तो अभ्यास करायचा आणि दिवा विझवून मध्यरात्री झोपी जायचा. असा कष्टाळू आईचा श्याम खूप अभ्यास केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तो एक शासकीय अधिकारी बनला. आता तो आपल्या आईसोबत इतर आया-मातेला सुखी ठेवण्यासाठी सेवा देऊ लागला.
बालमित्रांनो, कशी वाटली ही कथा. आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा.
