वाट सुगंधी
वाट सुगंधी


आयुष्य चालतं अनेक वाटांनी
कधी असते सुगंधी
तर कधी वादळी
वादळांना या घाबरायचं नसतं
त्यांना दुभंगत पुढे जायचं असतं
कधी अडकतो या वावटळीत
मग भेदायच तिला
आपली वाट शोधीत
वाटेवर भेटतात अनेक चेहरे
काही अनोळखी
तर काही ओळखीचे
सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालायचं
कारण आपली वाट अडवण्यासाठी
कोणालाच मागे नाही ठेवायचं
फार सोपं असतं
स्वप्न पायदळी तुडवणं
नाही वळून बघायचं
संकटावर प्रहार करत राहायचं
कधी कधी या भाऊगर्दीत
घुसमटतो आपला श्वास
पण नाही विसरायचा
आपण घेतलेला ध्यास
आयुष्यातल्या सुखदुःखांना
कर्माच्या तराजूत नाही तोलायच
आपल्या सुखाला नजर लागू नये म्हणून
दुःखाला काळी तीट समजायचं
लढत राहायचं,
पण जपायचं आपलं निरागस मन
जपायची सगळी स्वप्ने
येऊ न देता डोळ्यात आसवे
करायचा वादळावर प्रहार
कारण तुझ्यासारख्या रणरागिणीला
माहीत नाही माघार
तुझ्या आकांक्षांचे आकाश
तुला खुणावते आहे
स्वप्नपूर्ती च्या क्षितिजावर
तुझे कर्तृत्व उभे आहे
वादळाची वाट आता म्हणते
घेते मी माघार
कारण माझ्यावर घालण्या घाव
सदैव आहे स्त्री शक्ती तयार
असते आस हीच मनी
होईल आता वादळी वाटही सुगंधी
वादळी वाट सुगंधी