तुटता तारा...
तुटता तारा...
लहानपणी उन्हाळा आला म्हणजे शहरी मुलांना गच्चीवर झोपायची एक वेगळीच मज्जा.
बंदिस्त घरामध्ये राहून येणारा थकवा खुल्या हवेची झुळूक सहज दूर करून टाकायची.
सगळे जमले की आकाशात बघत गप्पा चालायच्या, त्यातच कोणी तरी म्हणायचं,
'तो बघा तुटता तारा,त्याच्याकडे जे मागितलं ते तो पूर्ण करतो,पटकन-नाहीतर तो निघून जाईल.
तोपर्यंत तो गेलेलाही असायचा,आमची इच्छा तशीच राहून जायची.
काल रात्री तोच तुटता तारा स्वप्नात आला आणि म्हणाला 'तुला एवढ्या वेळेस संधी देऊनही काहीच का मागितल नाही?
मी थोडा हसतच बोललो,'कसंय मित्रा! तूच तुझं सर्वस्व गमावताना मी तुझ्याकडे काय म्हणून हात पसरवू?
तुला काय वाटेल हा विचार करून तुझ्याकडे काही मागण्याची इच्छाच झाली नाही.एक विचारू?
आपलं सर्वस्व सोडून जाताना तुला काही त्रास नाही का होत?'
तो खुदकन हसला आणि म्हणाला,'जे सर्वस्व माझ नव्हतच कधी त्याबद्दल कसला विषाद?
उलट मला तीथ जे मिळालं त्यामुळेच तर मी सर्वांची इच्छा पूर्ण करू शकतो.'
'हो का रे? असं काय भेटल तुला?'
"कर्माची ताकत"- जी लिहिलेल नशीब बदलू शकते, नवीन स्वर्गही निर्माण करू शकते.
सगळ्यांना वाटतं मी तूटलोय,खचलोय पण मुळीच नाही.
मी तर निघालोय माझ्या प्रवासाला माझ्या कर्तृत्वाला आजमावण्यासाठी!
तू खासच भेटला मन मोकळं झालं, तुला गरज पडली तर आठवण कर..."
एव्हाना जाग आली होती मलाही आणि माझ्या
निजलेल्या कर्तृत्व शक्तीलाही....
