तृणपाती
तृणपाती
1 min
77
श्रावणात बरसल्या
रिमझिम घन धारा
तृणपाती उगवल्या
झोके देई मंद वारा.
सृष्टी न्हाली पावसाने
गंध पसरे फुलांचा
झाला प्रसन्न निसर्ग
हर्ष पाहुनी धराचा.
रंग हिरवा तृणाचा
भासे हिरवा गालीचा
जणू धराने ओढला
शालू नव युवतीचा.
मनोहारी निसर्गाचे
रूप पहावे धराचे
भान हरपे बघता
तृणपात सौदर्याचे.
नभांगणी चित्रकार
काढी कमान रंगाची
इंद्रधनु म्हणे तया
तृप्ती होई नयनांची.
ऋतू सुंदर पहावा
फक्त एक श्रावणात
घन वर्षाव मेघांचा
देई आनंद मनात.