स्मृती.!
स्मृती.!
1 min
210
मी जपल्या आहेत अनेक स्मृती
मोठ्या'च' कष्टाने...
त्या जीर्ण झालेल्या सपराचा चेहरा
हातपाय टेकलेली पांढऱ्या मातीची वृद्ध खोली..
बोराटीचा वाळलेला झाप..
वाळलेल्या खोडात राघू मैनेची इवलीशी ढोली..
हृदयात अजूनही हळुवार जपलाय
शेनाचा तो सुगंध..
पोचारलेल्या भिंतीचा सुवास..
तो अंगणात शिंपडलेला सडा..
आजही मनामध्ये तसाच दरवळतो आहे...
पाच रुपये देऊन मिळणाऱ्या
चहाचा चटका बसल्यावर
मला आजही आठवते
ती परिस्थिती..
चहा उकळणारा माझा बाप
आणि..
कपबशा विसळणारी माझी आई..
जपल्या आहेत अनेक स्मृती
मोठ्या'च' कष्टाने...
