STORYMIRROR

AkshRahi world विजयसुत

Others

2  

AkshRahi world विजयसुत

Others

आठ आण्याचे पेढे

आठ आण्याचे पेढे

1 min
106

मरणाच्या दारात पेढ्याचा पुढा घेऊन उभी होती

"हिंदुस्तान महा सरतंत्र झाला.! तोंड ग्वाड करा.."

"गांधी बाबा.. अन् मह्या बापा भीमरावा..

औक्षवंत व्हा रं.!"

तोंड भर भरून आशीर्वाद देत होती..

तानू आजी आठ आण्याचे पेढे वाटत होती.!


"ल्योक महा गोऱ्यांच्या गोळीनं गेला

पर नातू आता मोट्टा साह्येब व्हईल..

भगसिंहासारखा शूर, अन् नेताजी सारखा वीर व्हईल ."

स्वप्न सूर्याच्या साक्षीने, दिवसा जागल्या पाहत होती

तानू आजी आठ आण्याचे पेढे वाटत होती.!


तानू राहिली गावाबाहेर, जगली समाजाच्या चौकटीबाहेर

आली होती लग्न करून, भिवा भंग्याचा हात धरून

घाण काढली गावाची, हसत आत्म्याची कत्तल करून

हात घाणीने बरबटले, मनी स्वप्न तरी सुगंधित होते

स्वातंत्र्याच्या पहाटे आजीनं, शेणाने अंगण सारवले होते

कुणाच्या दशक्रियेला मिळालेलं धोतर,

भिवा घालून मिरवत होता

नातवाच्या हाती कागदाचा, तिरंगा आज फडकत होता

पाटलीन बाईनं दिलेलं, जरासं कुठंतरी फाटलेलं

लुगडं नेसून किती गोड दिसत होती..

तानू आजी आठ आण्याचे पेढे वाटत होती.!


तानू जाऊन बरीच वर्ष झाली..

भिवाच्या देहाची केव्हाच माती झाली..

त्याच काळ्या मातीत हिरवं सोनं उगवू लागलं,

नातू सरकारी कचेरीत अधिकारी झाला

आणि देश सुजलाम् सुफलाम् झाला.!


नातवाचं प्रेम जडलं, त्यालाही प्रेमाचा होकार आला

भंग्याची जात त्याला नडली, लग्नाचा डाव उधळून गेला

"जाता जात नाही ती जात.."

या विचाराने नातवाने वर आकाशाकडे पाहिलं,

डोळ्यातून टचकन वेदनेचा झरा फुटला

"तुझं आठ आणं वाया गेलं आजी

देश अजून पूर्ता सरतंत्र नाही झाला.!"


Rate this content
Log in