समिधा
समिधा
जा दूर त्या पल्याड विहंगा
इथे धगधगता अग्निकुंड पेटला आहे
तलावही वाफळला आता
वृक्षही रुक्ष झाला आहे..
सुवर्ण किरणांचा अश्वरथ घेऊन
आता या प्रदेशात भास्करही दौडत नाही
आसमंत सारा धुराने काजळला आहे..
तू इथे विहरू लागलास म्हणजे
चराचरामध्ये नवचैतन्य संचारायच
आता या भूमीत स्मशान दर्प दरवळला आहे
चिमुकल्या पांथस्ता इथून उड्डाण कर..
इवलेसे पंख तुझे वाऱ्यावर पसरवून
दूर त्या पल्याड जा..
या कुंडात सर्वकाही
अलगद आता जळते आहे
ज्वाळांच्या जिभल्यांना तृप्त करत
आम्ही उभे आहोत तुला निरोप देण्यासाठी
भाजलेल्या पाऊलखुणांना कवटाळण्यास
विहंगा मागे परतून येऊ नकोस
हा अग्निकुंड तुलाही भस्म करेल
समिधा समजून..!
