शिकवा ना मला अ, आ, ई
शिकवा ना मला अ, आ, ई
माय बाप अडाणी राहले
वाटले मी शहाणी होई
पण लाकडाऊन मुळे बाई
शाळेत जाता ना येई
मुलगी शिकली प्रगती झाली
हे सरकारचे धोरण
कोरोनाने बट्ट्याबोळ केला
खड्ड्यात गेला शिक्षण
पाटी पुस्तकी मधली शिकवणी
होती मज्जा ती न्यारी
महामारीने कहर केला
आता आणलाईन झाली प्यारी
बाप म्हणे मोबाईल घेण्यास
पैका आणू कुठून
तोंडून त्याच्या हे शब्द ऐकले की
काळीज येई दाटून
कधी कधी बापाच्या माझ्या
डोळ्यात येई पाणी
शिक्षणाची स्पर्धा ही
घेईल का जीवघेणी
शाळेची ती घंटा काही
आठवून ही आठवेना
बाईच्या हातातली खिचडी
विसरुनही विसरेना
आता कधी येई तो काळ
वाट पाहतो मी बाई
थोडी सवड काढून गुरुजी
शिकवा ना मला अ आ ई
