पहाटेचे वर्णन करणारी रचना
पहाटेचे वर्णन करणारी रचना
1 min
400
प्राचीवरती, रंग घेउनी, उषा लाजरी, आली
शुभ शकुनांची, रांगोळी ही, अवनीवरती, दिसली
क्षितिजावरती, रथ घेऊनी, रविराज हळू, येई
येताना मग, हात धरोनी, ऊषेलाही, घेई
लाज लाजुनी, अता उषेची, लाली दिसून, आली
नटली सजली, खुलली हसली, अरुणावर, भुलली
मंद मंद तो, पहाटवारा, शीळ नवीनच, घेई
त्याच शीळेने,परिसर सारा , भारावूनी, जाई
चाऱ्यासाठी, सारे पक्षी, दूर रानी, जाई
पान्हा अपुला, पिलास देण्या, धेनू करती, घाई
मंदिरातला, घंटारव तो, मुग्ध करुनी, जाई
त्याच रवाने, सुवासिनींची लगबग सूरू, होई
भूपाळीच्या मधुर स्वराने झुंजूमुंजू होई
पहा माधवा, पूर्व दिशेला, अरुणोदय होई
