न्हाला दवात गारवा
न्हाला दवात गारवा
1 min
151
सोनसळी किरणांनी
न्हाला दवात गारवा
आला रवी गगनात
रंग सृष्टी चा हिरवा
दवबिंदु पानातुनी
दिसे मोतियांची माळ
भासे विखुरले मोती
न्हाली दवात सकाळ
वाटे नभीचे चांदणे
वेलीवरी विसावले
कळ्या हासती फुलूनी
दव क्षणात विरले
शुभ्र पांढरी तलम
शाल पांघरुनी धरा
येता रवीने सकाळी
दूर केली क्षणभरा
बिंदू भासे ते दवांचे
घ्यावे तया उचलूनी
मनी करिता विचार
ओधळती पानातूनी
थंड झुळूक वा-याची
उठे अंगास शहारा
थाट मस्त निसर्गाचा
वाटे पहावा नजारा
