मातीतले प्रेम
मातीतले प्रेम


मातीतले प्रेम
वेड लागावं म्हणून
नाही कुणी प्रेम करत
खरेतर वेडं व्हावं लागतं प्रेमात
हा प्रेमाचा सिद्धांतच असतो
म्हणून मी सूर्याच्या आकारागत
विशाल भाकरीवर प्रेम करुन
लाथ मारुन पाणी काढीत
ओतत गेलो शेतात घाम
तेव्हा बैलाच्या हलणाऱ्या मानेची
सूचकता...
मला समजलीच नाही
मी टोचत गेलो तुतारी
निर्मळ भुकेच्या प्रेमास्तव
सालं किती प्रेम करावं
या शेतीवर नं मातीवर
तो सूर्य मुतला तेव्हा
रडवेला झालेला जीव
कारभारीन बघते ढगाकडे...
वादळ घोंघावते
...
प्रेमाची परिभाषा बदलली
हे कसे कळेल मला
घामाच्या रक्तधारा...
ती टिपून घेते पदराने
शेती पिकली नाही तरी चालेल
पाणी नसले तरी चालेल
कोपला निसर्ग तरी चालेल
भाव पडला तरी चालेल
पण धनी जपला पाहिजे
हे तिचं तत्त्वज्ञान...
स्वहत्या करणारे बघून
तिचं प्रेम असच
मुक्या बैलागत मान हलवून सांगणारं.
तेव्हापासून आम्ही करतो प्रेम
या मातीवर...
तुमची दुनिया बरी आहे हो!
कारण तुमचं प्रेम हे छातीवर...
एवढाच काय तो तुमच्या,आमच्या
सिद्धांतातील फरक...