माणुस
माणुस
इजा जराशी झाली स्वत:ला
माजवतोस गावभर हाहाकार,
चामडी म्हणजे प्रतिष्ठा म्हणत
का करतोस मग तू शिकार,
खरचं जर का त्या प्राण्यांना
शस्त्र चालवता आलं असतं..
तर "माणुस" म्हणून माणसा तुला
कधीचं जगता आलं नसतं..!
घेतो स्वत: झेप आकाशी
मोकळे करून दोन्ही हस्त,
गगनभरारी घेणार्यांना
का करतोस मग तू बंदिस्त,
खरचं जर का त्या पक्षांना
पिंजरा बांधता आलं असतं..
तर "माणुस" म्हणून माणसा तुला
कधीचं जगता आलं नसतं..!
अन्न-पाण्यासाठी धावा करतोस
येईपर्यंत पायाला फोड
मुक्या-लंगड्या पर्यावरणातील
का करतोस मग जंगलतोड
खरचं जर का त्या झाडांना
स्थलांतर करता आलं असतं..
तर "माणुस" म्हणून माणसा तुला
कधीचं जगता आलं नसतं..!
प्राणी, पक्षी, झाड असो वा
पर्यावरणाचा असो घटक,
खरचं जर का या साऱ्यांना
प्रतिशोध घेता आलं असतं..
तर "माणुस" म्हणून माणसा तुला
कधीचं जगता आलं नसतं..!
तर "माणुस" म्हणून माणसा तुला
कधीचं जगता आलं नसतं..!
