क्षितिज.
क्षितिज.
जमीन आणि आकाश
खरं तर कोठेच भेटत नाहीत
फक्त जगाला भास होत राहतो
ते क्षितिजावर भेटत असल्याचा.
आकाशाच्या कोरड्या डोळ्यात
ढग दाटून येताच
त्याला जमिनीची आठवण येते
पण तो तिला भेटत नाही
फक्त मोकळा होतो
आणि त्याचे प्रेमळ अश्रू
पावसाच्या रूपात
जमिनीवर कोसळतात.
मध्येच कधीतरी श्रावणात
जेव्हा इंद्रधनुष्य दिसतात
तेव्हा पाहणाऱ्यांना वाटत राहत
आकाश आणि जमीन
यांचे प्रेम फुलतेय सप्तरंगानी
पण ते फुलनेही क्षणिकच असते.
आकाशाने जमिनीकडे
भरल्या डोळ्यांनी पाहात राहणे
आणि जमिनीने त्याची आसवे
आपल्या अंगावर
झेलत राहणे फुलासारखी
हेच त्यांचे प्रारब्ध असावे कदाचित.
आकाश बाप होऊन राहतो
आणि जमीन आई असते
करोडो पोरांचं
पालन - पोषण करत राहतात
पण तरीही त्यांचे मिलन
कधीच होत नाही.
आज आकाशासारखं
जमिनीवर प्रेम
कोणीच करीत नाही
कारण आज प्रेमातही
त्यांच्यासारखं देणं कोणालाच
जमत नाही...
कित्येक प्रेमी
एकमेकांना सांगत असतात
आपण रोज
प्रेमाच्या क्षितिजावर भेटू
पण कधीच भेटत नाहीत
कारण क्षितिज
फक्त भास आहे
तरीही फक्त त्याच्यामुळेच
कल्पनेत का होईना
आभाळास
जमिनीला भेटण्याची
आस आहे.
