होय मी महाराष्ट्र बोलतोय....
होय मी महाराष्ट्र बोलतोय....
लेकरांनो कसे आहात ?
आवाज घुमलाय मनी
कंठ दाटला त्याच्याही
मायेनं बोलला कानी
होय मी महाराष्ट्र बोलतोय.....
महाराष्ट्र दिनी आठवतोय का
इतिहास सुवर्णकाळाच्या पानामधील
रक्ताच्या शाईने लिहिलेल्या त्या
मराठी मातीच्या प्रत्येक कणामधील
होय मी महाराष्ट्र बोलतोय.....
आज पाहातोय गर्जा महाराष्ट्र करीत
कित्येक वर्षे तरुण भोगतोय बेरोजगारी
आणि माझा महाराष्ट्र करीत वागतोय
स्वार्थीपणाने माणुसपण विकतोय बाजारी
होय मी महाराष्ट्र बोलतोय.......
शेतकरी बापाची आत्महत्या
अतिरेकी क्रूर घातकी हल्ले
भ्रष्ट्राचाराचा वाढता भस्मासुर
दलालांचे भरतात फक्त गल्ले
होय मी महाराष्ट्र बोलतोय......
कडे-कपारीत शोधतेय
माझी मायबहिण जिवंत झरा
अनवाणी पाण्यासाठी वणवण फिरते
हे पाहून रडतो समुद्र माझा सारा
होय मी महाराष्ट्र बोलतोय......
कित्येक सत्ता आल्या नि गेल्या
पाहिली इथली बदललेली माणसं
हव्यासापोटी विकली आपली जमिन
मग सांग कशी बोलतील इथली कणसं
होय मी महाराष्ट्र बोलतोय......
आठवा शिवबाने स्वराज्य घडवले
फुले-शाहु-आ़ंबेडकरांनी समृद्ध केले
क्रांतीकारक , सुधारकांनी विचार पेरले
साहित्यिकांनी शब्दांचे अमृत पाजले
होय मी महाराष्ट्र बोलतोय........
झटकून द्या ही पटकूर स्वार्थीपणाची
पुन्हा मशाल पेटवा स्वाभिमानाची
परदेशात नाव कमविण्यापैक्षा
वेळ आलीय मातीचे ऋण फेडण्याची
होय मी महाराष्ट्र बोलतोय.......
दुबळे नाहीत तुम्ही सगळे
संस्कार इथल्या मातांचे
कित्येक संकटांना रोखण्यासाठी
बळ देई जाणा उपकार दुधाचे
होय मी महाराष्ट्र बोलतोय.......
लेकरांनो हे ही संकट जाईन
निकराने लढा द्या रे
महाराष्ट्रभूमीच्या रक्षणा
माणुसकीचा धर्म जपा रे
होय मी महाराष्ट्र बोलतोय........
