हिंमत असेल तर...
हिंमत असेल तर...
डोळे
आपोआप
होत जातात
सुक्षदर्शक यंत्र
अहोरात्र
होत राहतं
काळाचं विच्छेदन
आनंदाचं अमृत
नि दु:खाचं हलाहल
सहज पचवून
स्थितप्रज्ञपणे
अवकाळी ऋतुंचा मारा सहन करत
वाढत जातो अनुभवगर्भ
आणि अचानक
नकळत
शब्दांतून कधी धुमसू लागतात ज्वाला
तर कधी शब्दांचे होत राहतात साप-विंचू-इंगळ्या वगैरे
कधी हळव्या मनाभोवती भिरभिरणारी फुलपाखरं होऊन अवतरतात शब्द
तर कधी निखळ निर्मळ माणूस होऊन
निनादत राहतात...
मग
एक रस्ता तयार होत जातो
निबीड...काटेरी... तिव्र चढउतारांचा
निसरडा
ज्यावरून ढळू शकतो
आपलाच तोल अनेकदा
लागू शकते ठेच
आपल्या आत्म्याला
रक्तबंबाळ होऊ शकतो
स्वाभिमान वगैरे
तरीही चालत जावं लागतं
शब्दांची मशाल धरून
विश्वकल्याणरूपी औषधाच्या शोधात....
शिघ्र विकसित असूनही
शिघ्रपतनाचा आजार बळावलेल्या युगासाठी...
हा केवळ शब्दांचा खेळ नाहीये
किंवा नाहीये कॉपीपेस्ट.. शेअर-फॉरवर्डचा फंडा
रक्त आटून आटून
जन्माला येत असतो
एकेक शब्द
हिंमत असेल
तरच लाग
कवितेच्या नादाला...
