STORYMIRROR

Rajiv Masrulkar

Others

4  

Rajiv Masrulkar

Others

तुम्हीच ईश्वर आहात, हो तुम्हीच

तुम्हीच ईश्वर आहात, हो तुम्हीच

2 mins
517

तुम्हीच ईश्वर आहात

हो, तुम्हीच


तुम्ही जन्माला आलात

आणि जन्माला घातलंत एक मोठं जग

मोह असो कि माया

तुम्ही वाढवलंत हे जग तनमनानं

मायबाप, नातीगोती, घरदार, पैसाअडका, कामधंदा, वगैरे वगैरे....

हे जग अनंत काळापर्यंत टिकून रहावं

म्हणून झटत आहात क्षणोक्षणी

तुमच्याकडेही आहे शिक्षणाचा तिसरा डोळा

किंबहुना माहितीतंत्रज्ञानाचा चौथा डोळाही 

आता तुमच्या मुठीत आला आहे लिलया

फक्त या सगळ्यावर तुमचीच वक्रदृष्टी पडू नये

आणि सुरू होऊ नये सर्वत्र मृत्यूचं तांडव...

उत्पत्ती, स्थिती, लय तुमच्यातच आहे

बघा, तुम्हीच ईश्वर आहात...!


तुम्ही जनताजनार्दन

तुम्हीच गण आणि तुम्हीच आहात गणपती

पृथ्वीप्रदक्षिणा म्हणून आईवडिलांभोवती फेरी मारणारेही तुम्हीच तर आहात

तुमच्याकडे आहेत रिद्धी, सिद्धी आणि प्रखर बुद्धीही

कला आणि ज्ञानाचे भंडार तुम्हीच खुले करू शकणार आहात

काही दिवस घरात राहून तप:साधनेतून

सुखकर्ता... दुखहर्ता तुम्हीच आहात

तुम्ही ईश्वर आहात


संपूर्ण पृथ्वीवर प्रेम करून

तिचे रक्षण करण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे

तुम्हीच तर आणू शकता सर्वत्र रामराज्य वगैेरे

अचानक अवतरलेल्या बहुरूपी बहुशक्तीशाली महाभयंकर करोनारावणाने

तुमची सुख, शांती, प्राणरूपी सीता पळवून नेलेली आहे

तुमच्याच आत आत आत

तिचा तिथेच शोध घेत

स्वत:शीच युद्ध पुकारून रावणदहन केल्याशिवाय

कुठलाही उत्सव साजरा करायचा नाहीय तुम्हाला तुमच्या प्रजेसोबत

आणि हो, खबरदार

सीता आली तरी 

तिच्या शालीनतेवर बोट ठेवणारे परीटही

असतीलच आजुबाजूला

म्हणून तिला द्यावी लागणार आहेच पुन्हा पुन्हा

अग्नीपरीक्षा

म्हणून आखून घ्या स्वत:भोवती लक्ष्मणरेषा

आणि स्वत:च्या कुटुंबासाठी शबरी व्हा काही दिवस

दिवाळी दूर नाहीच

फक्त विसरू नका, तुम्हीच ईश्वर आहात!


तुमच्यातच आहे भवतालाकडे दुर्लक्ष करणारा अंध धृतराष्ट्र

तुमच्यातच आहे दूरदृष्टी असलेला संजय

असंख्य जबाबदा-या पेलूनही प्रसंगी अब्रुहरण सहन करावं लागलेली

पांचालीही आहे तुमच्यातच

कधीही खोटं न बोलणारा खोटं न वागणारा

धर्मही तुम्हीच आहात

संभ्रमावस्थेतील अर्जूनही तुम्हीच

आणि करंगळीवर पर्वत उचलून

गोकुळाचं रक्षण करण्यापासून

जे घडतंय ते माझ्याच इशा-यावरून घडतंय

जे होईल तेही चांगलंच होईल

हे सांगणारा विराट कृष्णही तुमच्यातच आहे..


आता पुन्हा एकदा महाभारत घडू द्यायचं कि नाही

तुमचे हात तुमच्याच वंशवधाने मलीन होऊ द्यायचे की नाही

हे फक्त तुमच्याच हातात आहे...


तुम्हीच अल्लाह आहात

येशू, बुद्ध, महावीर, गुरू आणि गरूग्रंथसाहिब...

सर्व तुम्हीच तर आहात

तुम्हीच तुमचे तारणहार आहात

तुम्हीच

हो, तुम्हीच ईश्वर आहात!


Rate this content
Log in