मला अद्यापही वाचन करत येत नाही
मला अद्यापही वाचन करत येत नाही
माझ्याकडे पदवी आहे
मी पदव्युत्तर पदव्या संपादन केलेल्या आहेत औपचारिकपणे...
पण, मला वाचन करता येत नाही.
मला वाचन करता येत नाही माझ्या दारिद्र्याचे
माझ्यातल्या कर्मदारिद्र्याचे
माझ्या नियोजनशुन्य दिनचर्येचे
माझा भवतालही माझ्यासारखाच कर्मदरिद्री होत चाललाय का
याचं वाचन मला करता येत नाही
सोशल मिडियावर रात्रंदिवस बरंच काहीबाही वाचत असतो मी
सुविचार, विनोद, गोष्टी, बातम्या, वगैरे
पण वर्तमान वास्तव माझ्या वाचनात येत नाही
मला वाचताच येत नाही
शिक्षित-अशिक्षितांच्या डोक्यातला आप्पलपोटा अंधार
निरागस ओठांवरचं निखळ हसू
भुकेल्या पोटाची असह्य अडवणूक
पात्रतेच्या कसोटीचे सगुणसाकार मापदंड
वाचताच येत नाहीत मला
आणि मुख्य म्हणजे
या वेगवान युगाची गती
केवळ लकाकी आणते माझ्या डोळ्यांत
पण काही केल्या ती वाचताच येत नाही मला अद्यापही....
फक्त साक्षात्कार होत राहतो मला
मी साक्षात निरक्षर असल्याचा
आणि आऊटडेटेड होत असल्याची भीती
घोर घाम फोडत राहते....
मी अक्षरं चाचपडत फिरतो आहे
21 व्या शतकाच्या दिग्मुढ वाचनपाठाची....!
