देश माझा सांभाळा
देश माझा सांभाळा
स्वतंत्रता आज तुमच्या
हवाली करतोय बाळा
तळहाताच्या फोडासम
हा देश माझा सांभाळा ॥धृ॥
लाखमोलाचा ऐवज हा
त्याग शौर्याचा इतिहास
या स्वातंत्र्य लढ्यातला
हरेक प्रसंग आहे खास
ध्यानीमनी नित्य ठेवून
गुलामीच्या मरण कळा...॥१॥
तळहाताच्या फोडासम
हा देश माझा सांभाळा...
भांडू नका आपापसात
जपा एकोपा अंतर्मनात
विविधतेत एकता अशी
जणू रंग मिळे पाण्यात
समानतेचा गंध उधळून
भेदाभेद पाळणे टाळा...॥२॥
तळहाताच्या फोडासम
हा देश माझा सांभाळा...
आपलं ते अस्सल सोनं
नकोय परदेशी तुणतुणं
स्वबळावर झेप अपुली
पुर्वजांचंही हेच सांगणं
मातीशी एकनिष्ठ राहून
उद्योगांचा फुलवा मळा...॥३॥
तळहाताच्या फोडासम
हा देश माझा सांभाळा...
थोर संस्कृती,परंपरांचा
सामोरी ठेवा आदर्श
अतुल कलाकौशल्यानी
साधा भारताचा उत्कर्ष
शिक्षणाची कास धरून
पर्यावरण नियम पाळा...॥४॥
तळहाताच्या फोडासम
हा देश माझा सांभाळा...
