आयुष्याची रेलगाडी
आयुष्याची रेलगाडी
आयुष्याची रेलगाडी
काळाच्या रुळावर
धावत सुटली
आशेच इंधन घेत
निराशेचा धूर सोडत सुटली
रेल सुरु होताच आयुष्याची
बालपणीच स्टेशन मागे सुटलं
आठवणींची पुंजी बांधायची राहूनच गेली,
तारुण्याचं स्टेशन जवळ येताच
मनाच्या खिडकीतून मनोहर दृश्य दिसू लागली
सुंदर नागमोडी वळणे कधी
सुखाने खळखळणारे झरे उभी जशी
जीवघेणी वळणे मागे सोडत
आयुष्याची रेल पळत सुटली
कधी अंधारी काळाकुट्ट बोगदा
प्रकाशाचा ठावठिकाना कुठेच नव्हता
तरीही प्रवास सुरु होता, कारण
वार्धक्याच्या येणाऱ्या स्टेशनची,
तीव्र जाणीव झाली
अखेरचं मग स्टेशन मृत्यू
चाहूल लागताच रेल हळूवार झाली
आयुष्याची गोळाबेरीज सुरु झाली
काय कमवलं ? काय गमवलं ?
याची आकडेमोड केली
शेवटचं स्टेशन येण्या आधीच
जगण्याची कला ती शिकवून गेली
पण जाता - जाता
आयुष्य तेवढं घेवून गेली
