STORYMIRROR

Madhuri Bagde Alai

Others

4  

Madhuri Bagde Alai

Others

आठवणीतल माहेरपण

आठवणीतल माहेरपण

1 min
28.6K


रिकाम्या झोक्याचा दोर पाहून

माय ढसाढसा रडायची

कोणे एके काळी म्हणे

अक्षयतृतीयेला लेक माहेरी यायची ।।धृ ।।


लेकीच्या हसण्याने 

माहेरही हसायचे..

झाडे , वेली ,आमराई

तिच्यासवे बहरायचे...

गौराईची गाणी गात

घरभर बागडायची..

कोणे एके काळी म्हणे...।।१।।


अक्षयतृतीयेचा झोका घेत

गुजगोष्टी सांगायची....

सासर माहेरच्या नात्यातील

धागा प्रेमाने गुंफायची.....

सखींच्या रुंजीतही 

सख्यासाठी बावरायची..

कोणे एके काळी म्हणे ...।।२।।


चार दिवस माहेर घराला

चैतन्याची बहर यायची...

साजूक तुपाच्या धारीसवे

पुरणपोळी चिंब न्हायची...

शिंपी,कासार ,सोनार मंडळी

लेकीच्याच कामात गुंग व्हायची..

कोणे एके काळी म्हणे ..।।३।।


झिम्मा,फुगडी खेळता खेळता

हास्यफुलें उधळायची ...

अंगणातली तुळसही

आनंद लहरीने फुलायची..

राघू , मैना , चिमन्यांच्याही

सुरात सूर व्हायची ..

कोणे एके काळी म्हणे..।।४।।


डिजिटल लेकीला आता

रजा नसते माहेरी यायची....

नोकरीच्या नादात म्हणे

सवड सुद्धा नसते खायची..

फोनवर रोज भेटली तरी

आठवणी दाटतात घराच्या उंबऱ्याशी

रिकाम्या झोक्याचा दोर पाहून

माय ढसाढसा रडायची

ढसाढसा रडायची....


Rate this content
Log in