आंब्याचे झाड
आंब्याचे झाड
आता पहिल्यासारखे मला
काठीने मारायला कोण येत नाही
गोड गोड आंबा खायला
गावात कोण उरलाच नाही
मोठ्या मोठ्या दगडाने मला
आंबा पाडण्यासाठी मारत असायचे
मी जखमी झालो तरी
आनंदाने मुलांना बघतच रहायचो
आता पहिल्यासारखा मुलांचा
घोळका दिसत नाही
माझ्या कानावरती आंबा भेटला
हा शब्द ऐकायला येत नाही
तो रम्या, सुऱ्या, मया
फांदीला धरून झोपाला करायचे
दोन दोन तास माझ्या सावलीत
गप्पा गोष्टी मारायचे
कोण पोलिस, डॉक्टर ,ऑफिसर
अशी स्वप्ने सांगायची एकमेकाला
कदाचित झाले असतील म्हणून
बहुतेक विसरले असणार मला
टप टप मी एकटाच पडत असतो
पिवळा होऊन खराब होतो
येतोय का जुना मित्र बघत असतो
संपूर्ण राण सुना सुना वाटतो
आता पहिल्यासारखा मी
थोडा कमीच बहरतो
जुन्या मित्रांच्या आठवणीत
कधी कधी हरवतो
कवी: स्वप्नील चंद्रकांत जांभळे
दापोली.
