आई-कविता
आई-कविता
आई नाव दोन अक्षरी
त्याची विश्वात भरारी
गाजते नाव जगभर
आहे निर्भर करारी
आई संघर्षाचे वादळ
तिचे कष्टाचे जीवन
ती प्रेमाची साऊली
सुंदर आयुष्याची खाण
आईच्या सुखद स्पर्शाने
वाहे ममतेचा झरा
तिच्या अंगाई गीताने
मिळतो कुशित निवारा
आई इवल्या जीवास
पाजिते दूध अमृताचे
देई शक्ती जगण्याची
विश्व सामर्थ्य जीवनाचे
आई निर्मळ मनाची
महती थोर गुणाची
आहे संस्काराची शिदोरी
भरल्या भव्य अनुभवाची
आई असे कामात
जीव तिचा बाळापाशी
लागे रडण्याची चाहूल
घेई उचलून अंगाशी
राही पोटाला उपाशी
भूक भागवी बाळाची
त्याच्या तृप्त पोटाने
भूक पळते आईची
आईचा महिमा जगात
लिहिला थोर ज्ञानीयानी
असो कसेही मूल
गोडवे गाते मुखातूनी