मी संपलेली नाही
मी संपलेली नाही
आसमंत भेदणारी महत्वकांक्षा,
दृढ आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती,
धैर्य , नीतिमत्ता यांचा समूह घेऊन
स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणारी
माझी मी शिल्पकार आहे,
तरीही कैक दिवसापासून
यातनेच्या अन वेदनेच्या अग्नीत
मी रोज रोज पूर्णतः जळत आहे
मात्र अजूनही मी संपलेली नाही,
मी कधी माझ्या व्यथेची
कथा मांडली नाही,
ना मी कधी माझ्या यातनेची
कविता लिहिली,
त्यामुळेच बहुतेक मला कधी कोणी
ओळखूच शकले नाही,
उलट नेहमीच माझ्या
स्त्री अतित्वाला हिणवले गेले,
कैक शूरवीरांना जन्म देत
मी माझ्या छातीतले अमृत पाजले
तरी माझ्या अस्तित्वाला धिक्कारून
कायम माझी उपेक्षाच केली गेली...
माहीत आहे विध्वंस चांगला नाही
तरी रक्ताच्या नात्यासाठी
अन पोटच्या गोळ्यासाठी
रक्तचंदन कपाळी लावावं लागतं,
उजेड असूनही
अंधारात जगावं लागतं,
सुखाला लथाडून
दुःखाची साथ निभावावी लागते,
जगण्यासाठी
हवा तो संघर्ष करावा लागतो
आलीच वेळ तर मरावं लागतं
नाही तर मारावही लागतं...
माझ्या आयुष्यात नेहमीच
अनपेक्षित वादळं आलेली,
आणि प्रत्येक वेळेस
आयुष्याला उध्वस्त केलेले
तरीही या उध्वस्त अवस्थेनंतर
जीर्ण झालेल्या विचारांच्या चिंध्या
मी जपत माझा देह सावरत
मोठ्या हिम्मतीने मातृत्व जपलेले,
स्वतःसाठी नाहीच मी सुखे भोगली
इतरांच्या सुखासाठीच
मी पूर्णतः उद्धवस्त झालेली,
तरी कैक वर्षांपासून माझ्या अस्तित्वाच्या,
माझ्या आयुष्याच्या अनुत्तीर्ण असलेल्या
अंगभूत व्यक्तिमत्त्वाचा
कधी कोणी आढावा घेतलाय का..?
खरंच मला ना जाणताच
माझ्या स्त्री अस्तित्वाला काळिमा फासणाऱ्या
या समाजाची मला कीव जेवढी येते ना
त्याहून जास्त मला त्यांची किळस येतेय...