क तिट धा
क तिट धा
1 min
207
गडगडा गर्जती मेघ हे अंबरी,
कडकते थाप जैसी मृदंगावरी.
चमकते वीज आकाशपृष्ठावरी,
चपळ नाचे जशी मानिनी शर्वरी.
सरसरा धावल्या तोयधारा अशा,
सहज ताना जशा घेतसे गायिका
सरसरी होतसे दाट पानांतुनी,
अलगुजाची जणू गोड नादावली
धबधबा कोसळोनी प्रपातापरी,
घन नभी दाटुनी रिक्त चित्ता करी.
हसत झेली तयासी, शहारे जरा,
भरभरोनी तया दाद देते धरा.
चहुकडे गाजते गीत हे ईश्वरी
रसिकता दाखवी मानवा, तू तरी !
जमविला हा कुणी, खेळ सारा कसा ?
क तिट धा वाजला वाद्यमेळा जसा.