विस्मृती
विस्मृती
करोना मुळे वडिलांना भेटतांच आले नव्हते.दादा त्यांना व्यवस्थित सांभाळत होता. अमेरीकेहून मला भारतात येणे फारच अवघड झाले होते.
“तू एकदा येउन जा, सर्व काही विसरत चालले आहेत. मला, मंजुला आणि सौरभलाच ओळखतात.
परवा सुचंद्रा पांढरी साडी नेसून आली होती, तिला बघुन बाबा म्हणाले,” नर्स बाई जा घरी आता, मला का ही तुमची जरुरी नाही” अरे सुचंद्रा फार रडली. बाबांची चिमणी, लाडकी लेक, बाबा तिला पण विसरले रे” बोलतां बोलतां दादा रडू लागला.
ओफिस मधे रजा टाकली, शिरिनला व रवीला घरीच ठेउन मी विमानात बसलो.
घरी नेहमी प्रमाणेच स्वागत झाले.
मी आहे म्हणून दादा , वहिनी महत्त्वाच्या कामाला शहरात गेले.
मी बाबांजवळच बसलो होतो, मी माझ्या घराचा व्हिडिओ दाखवत होतो.
अचानक बाबा उठले, व्हिडिओ वर शिरिन बोलत होती.
बराच वेळ शोधाशोध करुन एक मळकी 100₹ ची नोट त्यांनी शिरिन समोर धरली. ”घे बाळ ice cream खा”
शिरिन समजली, तिने तशीच नोट बाबांना दाखवून “thanks” म्हणाली.
मला रडू फुटले.
“काय झालं, अरे माझी पेन्शन झाली नाही म्हणुन , मी बॅंकेतुन आणले ना कि तुला देईन हो” बाबा म्हणाले.
मी रडके डोळे दिसू नयेत म्हणून वळलो आणि बाबांची औषध पाहू लागलो.
मी पांढरा टि शर्ट घातला होता.
बाबा अंथरुणावरुन मला बघत होते.
“डॅाक्टर साहेब पेशंटच्या घरची कपाट पाहु नयेत, माझा मुलगा आला कि तुमची फी देईल, तुम्ही बाहेर हॅाल मधे बसा नाहीतर तुमच्या घरी जा” बाबा म्हणाले.
“बाबा मी तुमचा सुनिल” मी रडक्या आवाजात म्हणालो.
“खोट बोलू नका, सुनिल कश्याला येईल, तो अमेरिकेत असतो”. जा तुम्ही” बाबांनी कुस वळवून डोळे मिटले.
तासाभराने दादा वहिनी आले.
माझा चेहेरा काय ते सांगुन गेला.
संध्याकाळी सुचंद्रा आली. आम्ही सर्व गप्पा मारत असताना बाबा बाहेर आले. त्यांनी छान कपडे केले होते.
“सुभाष तुझी आई तयार झाली का? चला लग्नाचा मुहूर्त टळायला नको. चला सगळे गाडीत बसा.” बाबा उत्साहाने म्हणाले.
आम्ही तिघे पण तयार झालो.
मस्त फोटो काढले, जुन्या जुन्या लहानपणीच्या गप्पा मारल्या.
अचानक बाबांना धाप लागली.
दादा ने मायेने बाबांच्या पाठीवरुन हात फिरवला.
“दमलात तुम्ही बाबा, थोडावेळ आराम करा. मंजु दुध आणतेय, ते घ्या, आई बाहेर गेली आहे, ती आल्यावर लग्नाला जाऊ.”
बाबांनी लहान मुलासारखे ऐकले.
सुचंद्रा पण रात्री थांबली. ती अगदी आई सारखी दिसे. आई जाउन 10 वर्ष झाली होती.
त्या रात्री बाबा झोपले ते कायमचे.
