kanchan chabukswar

Others

4.0  

kanchan chabukswar

Others

वारी

वारी

11 mins
205


जाहीर केलं आईने की ती पायी वारीला जाणार, घरामध्ये एकदम गडबड उडाली.

"एकटीच का?"

"बरोबर कोण आहे?"

“खाण्यापिण्याचे काय?"

“आजारी पडलीस तर औषध उपचार कोण करेल?"

अनुराधाला कल्पना होतीच, गावामध्ये स्त्रियांचा भजनी मंडळ समूह होता, खूप सुरेख, सुंदर लईत, मंजुळ आवाजात सगळ्याजणी देवाची भजनं म्हणत. या समूहाची तर आई कितीतरी वर्षापासून सभासद होती.


सर्व मैत्रिणींनी ठरवलं होतं, त्याप्रमाणे रोज सकाळी पाच वाजता उठून कमीत कमी पाच किलोमीटर फिरायला जात. गेले वर्षभर पाच किलोमीटरचे हळूहळू 15 किलोमीटर झाले होते. सुरुवातीला आई दमायची, तिने हळूहळू सूर्यनमस्काराची सवय केली, स्वतःची ताकद वाढवली, घरामध्ये काही सांगितलं नाही पण भजनी मंडळाच्या सभासदांचे पंढरपूरला जाण्याचे निश्चित ठरले होते.


हळूहळू वाढवलेला स्टॅमिना सर्व स्त्रियांना फार उपयोगी पडत होता.

शोभा ताईंनी जाण्याची व्यवस्था केली, इतर मंडळांबरोबर संपर्क साधून पायी चालण्याचा रस्ता, रात्रीचा मुक्काम, वाटेमधल्या लागणाऱ्या आवश्यक सोयीसुविधा, याची सगळ्यांची माहिती घेतली. जोशी काकांनी देखील आपल्या ओळखीच्या मंडळांची संपर्क साधून सर्व स्त्रियांची व्यवस्था केली.

जरी पायी जायचं असलं तरी सामानासाठी त्यांच्याबरोबर एक छोटा टेम्पो चालणार होता, टेम्पो चालक देखील विठ्ठल भक्त होता त्याच्यामुळे सगळ्यांचा त्याच्यावरती अतिशय विश्वास होता.


हा हा म्हणता म्हणता पंचवीस जणींचा समूह आपल्या आपल्या सामानासकट देवळामध्ये जमल्या.

साध्या पटकन वाळणाऱ्या साड्या, चालण्यासाठी बूट, पाण्याची पिशवी, थोडा सुकामेवा, जरुरीचे औषधे, असे सगळ्यांनी आपल्याबरोबर घेतले. सुरुवातीला गावापासून पुण्यापर्यंत त्या बसने जाणार होत्या, त्यानंतर बाकीच्या मंडळांबरोबर मिसळून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणार होत्या.


गीता मावशी, शोभाताई, सुनंदा मावशी, ठाकरे मावशी, मंजिरी ताई, रुक्मिणी मावशी, गोदा मावशी, नर्मदा मावशी, शालिनीताई, अशा सगळ्यांनी काम वाटून घेतली. सगळ्यांच्या घरचे देवळामध्ये निरोप द्यायला आले होते.

सगळ्या जणींनी मिळून एक सुरेख भजन देवासमोर सादर केलं, सगळ्यांच्या शुभेच्छा आणि देवाचे आशीर्वाद घेऊन त्यांनी प्रवासाला सुरुवात केली.


अनुराधानी बळंच आईच्या पिशवीमध्ये मोबाईल फोन कोंबला, आई हसून म्हणाली,"कुठे करणार चार्ज, आम्ही तर तंबूमध्ये राहणार, आणि देवाकडे निघालोय ना, काळजी त्याच्यावर सोड, मला मोबाईल वगैरे काही नको."


आता मात्र अनुराधाचा धीर खचला, तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले, तिची अशी वाईट अवस्था बघून शेवटी आईने मोबाईल आपल्या जवळ घेतला. अनुच्या, माझ्या गालावरून हात फिरवून तिने समजुतीच्या नजरेने अण्णांकडे बघितले, किंचित हसून आमचा निरोप घेतला.


मला वाटतं सगळ्यांच्या घरी हीच अवस्था असेल. सगळ्या पांढरपेशा बायका, चांगल्या सुखवस्तू, गाडी, टॅक्सी शिवाय कुठेही हिंडणाऱ्या नाहीत, त्या चक्क सव्वाशे किलोमीटर पाई पाई जाणार होत्या.

अण्णांनी आईला कोपर्‍यात नेऊन आपले एटीएम कार्ड तिच्या पर्समध्ये टाकले, आईकडे प्रेमाने बघत तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले,"अडीअडचणीला असू दे, तुला दानधर्म करायचा असेल तरी पण पैसे काढ आणि कर."


पुण्यापर्यंतचा प्रवास फारच सुखकर झाला, सगळ्याजणी आमच्या काकांकडे उतरल्या होत्या, दुसऱ्या दिवशी सकाळीच बाकीच्या मंडळांबरोबर त्यांची चालण्यास सुरुवात होणार होती. पुण्याला प्रथाच होती बाहेरील धर्मशाळेत गावोगाव जाऊन येणाऱ्या पालख्या किंवा भजनी मंडळ, किंवा वारी करणारे सर्वजण भेटत, माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडत, आपले आपले सामान टेम्पो मध्ये ठेवून भजनाच्या नादामध्ये पुढे चालण्यास सुरुवात करत.

तसेच झाले, सगळे भजनी मंडळामध्ये आई आणि शोभा ताई सुरेश भजन म्हणत मिसळून गात, ठाकरे मावशी तर अतिशय श्रीमंत घरच्या, त्यांच्या वडिलांचाही मोठा कारखाना होता तसंच सासरही श्रीमंत, उंच स्वरांमध्ये वरच्या लई मध्ये त्या फार सुरेख भजन म्हणत, संध्याकाळी सगळ्यांचे जेवण झाल्यावर जिथे मुक्काम असेल तिथे कीर्तन करायची परंपरा होती. कधी मंडळांची भजनं, कधी बुवांचे किर्तन, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, निवृत्ती महाराज यांच्या कथा ह्याच्या मध्ये मध्यरात्र सहज उलटून जाई. दमलेले वारकरी आपल्या आपल्या तंबूमध्ये येऊन गाढ झोपी जात.


आईच्या मंडळाबरोबर, एका गावापासून एक चौदा पंधरा वर्षाची मुलगी सगळ्यांच्या बरोबरीने चालू लागली, बहुतांश ती रुक्मिणी मावशी बरोबरच असे, चौकशीअंती समजले की चार-पाच वर्ष अगोदर तिचे आई-बाबा पंढरीच्या वारीला गेले होते तिथून ते परत आले नाहीत, त्यांना शोधण्यासाठी दरवर्षी रंजना वारी बरोबर पंढरीला जात असे. रंजना फार गोड होती, रात्री वृद्ध स्त्रियांचे पाय ती आपण होऊनच दाबून देत, कितीतरी वेळा सगळ्या स्त्रिया उठल्यावर ती, ती पटापट अंथरूण उचलून टाकत असे, जरी जेवणाची आणि चहाची व्यवस्था प्रत्येक गावांमध्ये असे तरीपण तिकडे लाईन मध्ये उभा राहून सगळ्या स्त्रियांसाठी ती स्वतःचा चहा घेऊन येत असे, तिची सेवाभावी वृत्ती बघून भजनी मंडळIतल्या सगळ्या स्त्रियांची ती फार प्रिय झाली.

रस्त्याने चालताना त्यांच्या बरोबरीने नाही तीन चार म्हातारे खेडूत देखील सोबत करू लागले, छोट्या पत्र्याच्या पेट्या, अंगावरचा एक धोतर कुडता आणि एक पेटीमधला, पाण्यासाठी तांब्या, बस बाकी काहीच नाही, त्यांची फार अपेक्षा पण नसायचे, कोणी दिले तर जेवायचे नाहीतर तसेच पुढे चालू लागायचे.


रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्यामोठ्या दानधर्म करणाऱ्या संस्थांनी जेवणाचे स्टॉल, किंवा चहाची सोय केलेली होती. पण ती म्हातारी माणसं तिथे कधीच उभी राहिली नाहीत, आई बरेच वेळेला तिला मिळालेला चहा किंवा जेवण हे त्यांच्या समोर नेऊन ठेवत असे,

गळ्यात तुळशीची माळ, डोक्याला टिळा, साधा वेष ती चौघं माणसं चेहऱ्यावरून अतिशय प्रेमळ, त्या रात्री बुवांच्या कीर्तनामध्ये याचा संदर्भ आला,"देव कधी कुठल्या रूपांमध्ये येऊन पुढे उभा राहील काय माहिती? वारीचे महत्त्व असं होतं की सगळ्यांनी साधेपणाने स्वत्व सोडून जमिनीशी घट्ट नाते जोडून विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघायचे."


साधे कपडे साधं जेवण पाई पाई वारी सगळं करत अहंकार खाली गळून पडायचा. तिसऱ्या रात्रीच्या मुक्कामामध्ये आईच्या भजनी मंडळाची रात्री किर्तन करण्याची पाळी होती. सगळ्याजणी कीर्तन म्हणत असताना त्यांच्या साथीला कुठून तरी एक 65 सत्तर वर्षाचा गृहस्थ मृदुंग घेऊन येऊन बसला. गृहस्थ भारतीय देखील वाटत नव्हता, उभा वैष्णव टिळा, राखलेली शेंडी, भगव्या रंगाचा कुडता आणि खाली धोतर. त्याला नीट मराठी देखील बोलता येत नव्हतं, पण भजन मात्र भरपूर येत होती, मृदुंगावरती बोटं लईत चालत की कोणाला त्याची बोट दिसत पण नसत. सकाळी उठून ते गृहस्थ बासरी पण वाजवत गोड आवाजातली बासरीने झोपलेल्या सगळे वारकऱ्यांची पहाट अतिशय प्रसन्न होत असे. मार्कस डेव्हिड नाव होतं त्यांचं आणि नवीन नाव होतं प्रभू श्याम दास.


कशाच्या बरं शोधात आले होते? आईच्या भजनी मंडळाचा आणि त्यांचा अतिशय उत्तम परिचय झाला, रंजना धावून त्यांची देखील सेवा करू लागली पण ते कुणाकडूनच काही घेत नसत, जिथे कुठे मुक्काम करायचा असेल तिथे ते स्वतःचा भात स्वतः शिजवत चहा कॉफी दूध काहीच पीत नसत. भातामध्ये बटाटे टाकून की माझी मिळेल ती भाजी टाकून ते एकच पदार्थ शिजवत. आधी त्यांच्या बरोबर चालत असलेल्या त्यांच्या प्रिय कृष्णाला नैवेद्य दाखवत आणि मग स्वतः ग्रहण करत. त्यांची भक्ती वेगळीच होती, आपला देश सोडून आपले कुटुंब सोडून श्रीकृष्णाच्या शोधार्थ निघाले होते, पाई वारी मध्ये त्यांना कुठे कृष्ण मिळतो का कृष्ण कुठेतरी साक्षात्कार देईल असा दृढ विश्वास घेऊन ते सर्व मंडळींबरोबर वारीला आले होते.


आजचा दिवस रिंगणाचा होता, पालखीचा घोडा भले मोठे रिंगण घेणार होता, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर चालत आलेल्या बाकीच्या देवांच्या पालख्या देखील आदिती लयबद्ध नृत्याच्या तालावर ती रिंगणाच्या मैदानापर्यंत येऊन पोहोचल्या, विधिवत पूजन करून पालखी देवळाच्या दारापाशी ठेवण्यात आले, आणि सर्व मंडळी मैदानावरती जमली. गणाचा घोडा वंशपरंपरागत देशमुख यांच्याकडे असे अतिशय काळजीपूर्वक घोडा आणि त्याचे वंशज यांची निगा देखमुख स्वतः राखत, पांढराशुभ्र केदार घोडा, त्याच्या कपाळावर असलेला तपकिरी रंगाचा चांदवा, त्याची शुभ्र रेशमी आयाळ, रिंगण घेत असताना त्याची सुरेख दौलत आढळणारी रेशमी सारखी दिसणारी शेपटी, त्याच्या अंगावर ती चढवलेला साज एक दैवी अनुभूती त्याच्या रिंगण घालण्याच्या लई मधून होत असे.


ठिकठिकाणी येणारे सेवेकरी, ठिकाणी दिला जाणारा गरम वाफाळलेला चहा, छोटी छोटी दुधाचे पाकीट, वारकऱ्यांच्या भूक आणि तहानेसाठी केला जाणारा बंदोबस्त, बघून आई आणि तिच्या मैत्रिणींच्या डोळे पाणावत होते, कोण गरीब कोण श्रीमंत सगळी एकाच रस्त्याने पायी जाताना आपोआपच मनातला अहंकार भेदभाव श्रीमंत गरिबीची आणि सगळंच काही सगळंच काही स्वत्व जे आहे ते पांडुरंगाच्या चरणी विलीन होऊन जात होतं. खरा श्रीमंत कोण तर त्याला पांडुरंगाची अतिशय सुंदर भजनं गाता येतात, खरा श्रीमंत कोण जो केवळ एका वस्त्रानिशी दिंडी बरोबर पायी पायी वारी करतो, श्रीमंत कोण त्याला उद्याची फिकीर नाही ज्याच्याकडे एक कवडी देखील धन नाही पण फक्त तो विठ्ठलIवर श्रद्धा आणि त्यावर अवलंबून पुढे पुढे पुढे चालत जातो तो खरा श्रीमंत.


माळशिरसचा घाट लागला, आणि तुफान पावसाला सुरुवात झाली, वारकऱ्यांची संथ लय तशीच पुढे चालत राहिली, सामानाचे टेम्पो समोरच्या ओढ्याच्या काठी घेऊन थांबून राहिले. वारकऱ्यांमध्ये स्त्रिया मुली या जर भिजल्या तर त्यांना कपडे बदलण्यासाठी म्हणून फटाफट आडोसे करून सोय करण्यात आली. दुसऱ्या बाजूनी तुकाराम महाराजांची दिंडी हळूहळू पुढे येत होती. दोन्ही दिंड्यांचा संगम आता होणार होता. पाऊस जणू गंमत बघायला आला होता ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज कसे भेटतात बरं. दूर क्षितिजावर वीज कडाडली आणि कोसळली, क्षणार्धात सगळीकडे अंधार पसरू लागला, तरीपण दोन्हीकडच्या दिंड्या हळू लईमध्ये टाळ वाजवत ज्ञानदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई असं म्हणत पुढे पुढे सरकत राहिल्या.


कुठे घाई नाही गडबड नाही पळापळ नाही पांगापांग नाही, चारी वृद्ध वारकऱ्यांचा हात प्रभुदास ने धरलेला, स्त्रियांमधील वृद्ध वारकरी एकमेकांच्या आधाराने पुढे चालू लागल्या, रंजनाची गडबड उडाली वारीमध्ये मागे पुढे धावून, त्याच्या डोक्यावरील तुळशीवृंदावन सांभाळत कोणाला काही हवंय का याची ती चौकशी करू लागली, वारीमधले तरुण सेवेकरी पुढे झाले त्यांनी मृदंग वाजवणारे यांच्या डोक्यावर छत्री धरली कालांतराने मृदुंग बंद झाला आणि नुसते टाळ वाजवत पुढे जायचं ठरलं, मृदंग वाजवणारे यांनी हात जोडून क्षमा मागितली आणि मृदुंग प्लास्टिकमध्ये लपेटून टाकला, पालखीची सुरक्षा करण्यात आली, विठ्ठलाची कृपा की सगळीकडे घननिळा बरसला होता. फलटणच्या कुलकर्णी देशमुख देशपांडे पाटील परिवारातर्फे दोन्ही पालखीचे स्वागत होणार होतं, बरसणाऱ्या पावसात देखील फलटणचे गावकरी उत्साहाने पुढे झाले, ओढ्याच्या अलीकडे आले, वृद्ध वारकऱ्यांच्या पायावरती माऊली माऊली म्हणत सगळ्यांनी लोटांगण घातले, पालखीला वंदन करून त्यांनी तात्पुरत्या उभारलेल्या शेडकडे सगळ्यांना येण्यास सांगितले. पालखीला वंदन करून त्यांनी तात्पुरत्या उभारलेल्या शेडकडे सगळ्यांना येण्यास सांगितले. स्त्री वारकरी आणि पुरुष वारकरी यांच्यासाठी टेम्पोमधले सामान काढून आडोसे निर्माण केलेच होते त्यांना कपडे बदलण्यास सांगून गरम-गरम वाफाळलेला चहा सगळ्यांच्या हातात देण्यात आला. पावसाने जणू अंतर्मन देखील स्वच्छ केले होते, सामाजिक जाणीव, एकमेकांना देणारे आणि मदतीचे पुढे येणारे हात, सामाजिक बंधुत्व, नितीन टाकलेला उच्चनीच भेद हे सगळे काही जणू पावसाच्या धारांसकट खाली येत होते.


गरीब खेडूत वारकरी दूर पावसातच बसले होते, पाटलांनी त्यांना नमस्कार करून खूप आदराने शेडमध्ये येण्यास सांगितले.

प्रत्येक वारकरी हा माऊली असतो असा समज सर्व जनमानसात पसरलेला आहे. विठ्ठलाच्या भक्तीने विठ्ठलाच्या ओढीने जर पंढरपूरला जातो तो काही वेगळाच असतो.

दूरवर फलटण जवळील ज्योतिर्लिंग दिसत होते, सर्वांनी त्याला भक्तीभावाने हात जोडले, थोड्याच वेळात काळे ढग पांगले आणि सूर्यप्रकाश परत चमकू लागला.

उत्साही वारकर्‍यांनी ज्योतिर्लिंगाच्या दिशेने प्रयाण केले, संध्याकाळी यथासांग पूजा करून परत सगळी मंडळी फलटणच्या ठरलेल्या रस्त्यावरून विश्रांतीच्या ठिकाणी आली.


फलटणच्या गावांमध्ये पद्धतच आहे वारी च्या आधी पंधरा-वीस घरातली स्त्री आपल्या घरच्यांबरोबर चार भाकरी अजून भाजते, आपल्या घरच्यांना बरोबर चार लोकांचा अन्न अजून शिजवते कोणीही काही बोलायची गरजच नसते, ज्यांच्याकडे अन्नाचा तुटवडा असतो त्यांच्याकडे देखील ते पंधरा-वीस दिवस माहीत नाही कुठून धान येऊन पडते, कोणाला कोणापाशी मागायची काही गरज असते, शाळकरी मुले सकाळ झाली नऊ वाजले की घराघरांमध्ये जाऊन भाकरीची दुरडी गोळा करत भाकरी भाजी भाकरी पिठलं भात करायची देखील काही काही कुटुंबाकडे जबाबदारी असायची भात आमटी दही भात हे सगळे जिन्नस न मागता न सांगता आपल्या आपल्या टोपल्यांमध्ये येऊन पडत असे. वारकऱ्यांची सेवा ही पांडुरंगाची सेवा, घरच्या कारभारणीला तिथपर्यंत जाता येत नाही तर निदान जे वारकरी जातात त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी घरची कारभारीण मनापासून स्वयंपाक रांधून टोपल्यांमध्ये भरून विश्रांतीच्या ठिकाणी पाठवत असे.

पैसेवाले यात्रेकरू गावातल्या दुकानांमधून सामान विकत घेत, या देण्याघेण्याच्या व्यवहारामध्ये सगळ्यांचा फायदा होई.

आई आणि तिच्या मंडळाला बरोबर नेलेले जिन्नस एकट्याने खायचे देखील बरोबर वाटेना, शेवटी नेलेले डिंकाचे लाडू मेथी, आल्याच्या वड्या आणि बरच सामान जाता जाता सगळ्या यात्रे करून मधून वाटून त्यांनी संपवून टाकलं, ठिक ठिकाणच्या येणाऱ्या वाऱ्या त्यांच्यातले लोक त्यांनी पण आणलेले सामान एकमेकांना देऊन सगळे जण माऊलीमाऊली म्हणत एकमेकांचे आशीर्वाद घेत राहिले, कोण कुठल्या कोण! कोणातही भेदाभेद नाही सगळे विठ्ठलाचे वारकरी.


सहज म्हणून एका संध्याकाळी कीर्तनानंतर त्या चार वृद्ध वारकऱ्यांचे वय शोभा मावशींनी विचारले, त्यांचे उत्तर ऐकून सगळेजण थक्क झाले. 40 वर्षांपासून चालू असलेली त्यांची वारी अजूनही संपत नव्हती, काय वय असेल बरे? बिना दाताचं प्रेमळ बोळकं पसरून चौघ खळाखळा हसले," माऊली बोलवते तोपर्यंत जायचं, शेवटी तिच्याकडेच तर जायचं आहे ना." चौघेपण श्रीमंत शेतकरी कुटुंबातले, मुलेबाळे नातवंडे, घरदार भरलेले तरीपण वारी कधी चुकवली नाही.


अजून एक नवरा बायको आईच्या मंडळाला भेटले, त्यांनी सांगितलेलं तर अचंबितच करणारा होतं, आपली पिशवी आपल्याच खांद्यावर घेऊन दोघेजण चालू लागत, थोडासा शिधा आणि फक्त शंभर रुपये, तेवढ्याच जाऊन यायचं, होतील तेवढे कष्ट सोसायचे माऊली चे नामस्मरण करायचं आणि" सगळं तंरून जातं" हा त्यांचा दृढ विश्वासावरती त्यांची दर वर्षाची वारी साजरी व्हायची.

दोघेही मोठ्या कंपनीमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून काम करत होते, त्यांनी पण कधी वारी चुकवली नाही.

काय मिळते वारी मध्ये?


दोघेजण मंद हसले,"काय मिळते हे शब्दात सांगता आले असते तर मी जरूर एक पुस्तक लिहिले असते. एक नवचैतन्य एक नवीन ऊर्जा घेऊन आम्ही दोघेही परत जातो, प्रत्येक वेळेला विठ्ठलाचे दर्शन होईलच असे नाही, जेव्हा गर्दी उसळलेली असते तेव्हा आम्ही आमचा नंबर वृद्ध लोकांना देऊन टाकतो, विठ्ठल तिथेच उभा आहे, युगानुयुगं, कुठे जाणार नाही, दर्शन केव्हा संपूर्ण पंढरीमध्ये कोणाचाही रुपात तुम्हाला भेटेल, दर्शन केव्हाही घेता येईल पण हा दिवस महत्त्वाचा. देवळाच्या कळसाचे जरी दर्शन झाले तरी फार बरे."


निरपेक्ष वृत्तीने चाललेल्या वारकऱ्यांचे शेवटी भाग्य फळाला आले, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी सर्वजण पंढरीच्या आजूबाजूला येऊन पोहोचले. कोणीही कसलाही आग्रह करायचा नाही हा निग्रह सगळ्यांनी आपल्या मनामध्ये खूणगाठीसारखा बांधून ठेवला होता. ना दर्शनाचा आग्रह न चंद्रभागेमध्ये स्नान असा आग्रह जिथून जसं दर्शन मिळेल तसं करायचं आणि परत जायचं. कोणालाही त्रास द्यायचा नाही की कुठले नियम मोडायचे नाहीत. पंढरीच्या बाहेर असलेल्या छोट्या विठ्ठलाच्या देवळाचे सगळ्यांनी दर्शन घेतले तिथल्या देवाची आराध्य मूर्तीची मनोभावे पूजा केली विठ्ठल चराचरामध्ये आहे सर्वव्यापी सर्व रुपी तो आहे मग अट्टाहास कशाला हे कीर्तनकार बुवांच्या कथनातले वचन सगळ्यांनी आपल्या डोक्यामध्ये घट्ट ठेवले.


भजनी मंडळ आतल्या सगळ्या स्त्रियांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी म्हणून भरजरी रेशमी साडी बरोबर ठेवली होती पण आता त्यांना त्याचा मोह वाटेना, तरी पण देवाच्या दर्शनाला जायचे ते साध्या कपड्यात का बरं म्हणून सगळ्याजणी नटून-थटून तयार झाल्या, पूजेचा तबक देवाला आवडणारा प्रसाद मंदिरा बाजूच्या दुकानांमधून खरेदी करून सगळ्या जणी लाईन मध्ये शिस्तशीर उभ्या राहिल्या. किती का वेळ लागेना आता एकदा दर्शन घ्यायचं पायावर डोकं ठेवायचं रखुमाईची ओटी भरायची सगळ्यांना सुखी ठेव म्हणून म्हणायचं आणि मगच परत फिरायचं या निर्धाराने सगळ्याजणी आपला नंबर केव्हा येईल याची वाट बघत उभ्या राहिल्या. बरोबरचे वारकरी पांगले होते तरीपण त्यांनी सगळ्यांनी दर्शन झाल्यानंतर एका जागी जमायचं ठरवलं होतं शेवटचे किर्तन तिथेच होणार होतं आणि मग ज्यांनी त्यांनी आपल्या घराची वाट धरायची होती. शासकीय महापूजा विठ्ठलाला फारच लवकर उठवायची, तीन वाजता विठ्ठलाला उठवून त्याची शासकीय महापूजा झाल्यानंतर दर्शनासाठी देऊळ उघड झालं. सगळीकडे आनंद उत्साह नवीन चैतन्य तुळशीमाळ यांचा सुगंध फुलं पानं रेशमी वस्त्रे नारळ खोबर्‍याच्या वाट्या चणे फुटाणे गोड शेव मिश्र सुगंध आसमंतात दरवळत होता, सगळं चैतन्य, चंद्रभागा नेहमीप्रमाणे संथपणे दुथडी भरून पण संथपणे वाहत होती सगळ्या भक्तांना आनंदाने आपल्या खांद्यावर कडेवर घेत होती, कुठल्याही स्त्रियांना मुलींना पाय घसरू देत नव्हती सगळ्यांना सांभाळून ती वाहत होती पुंडलिक देखील वाट बघत होता , विठ्ठलाचा सर्वात लाडका तो देखील वाट बघत होता, "थांब बा विठ्ठला माझे आई-वडील हेच माझे दैवत, त्यांची सेवा हेच माझे व्रत, तू या विटेवरी उभा राहा आणि थांब, तोपर्यंत मी माझी सेवा पूर्ण करतो."

वृद्ध आई-वडिलांना वृद्धआश्रमात पाठवणाऱ्या मुलांच्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारा पुंडलिक, ज्यांनी प्रत्यक्ष परमेश्वराला थांबण्याची सूचना केली कारण त्याच्या वृद्ध आई वडिलांची तो सेवा करत होता.

किती प्रकारची विविध शिकवण एका वारीतून सर्व जनसामान्यांना आपोआपच मिळते.


वारीहुन परतलेले भजनी मंडळ आणि आमची आई वेगळीच होती.


Rate this content
Log in