Gauri Kulkarni

Others

4.5  

Gauri Kulkarni

Others

सुगंधित हेतू

सुगंधित हेतू

3 mins
234


'नीता' जोशींची धाकटी सून तिचं आणि वैभवचं म्हटलं तर लव्ह मॅरेज म्हटलं तर अरेंज. कारण दोघांची जात एकच आणि दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांना ओळखत होते. पण तिच्या थोरल्या जावेला मात्र हे लग्न मान्य नव्हतं. तरीही हसत खेळत एकदाचा नीता आणि वैभवाचा संसार सुरू झाला. मनात कसलीच अढी बाळगण्याची सवय नीताला नव्हती त्यामुळे कुणी काही बोललं तरी ती ते विसरून हसतमुखाने वावरत असे. हळूहळू मात्र सासू, सासरे, दिर, जाऊ, नणंद , नणंदेचा नवरा यांच्यामधली छुपी भांडणं हेवेदावे सतत तिला समजू लागले. घरातल्या घरातच सगळ्यांना एकमेकांशी स्पर्धा करायची होती कुणाला कमवत असलेल्या पैशाच्या जोरावर तर कुणाला घरातील महत्वाचं स्थान हवं म्हणून. वैभव निताचा नवरा मात्र तिच्यासारखाच होता ४ क्षण एकत्र आहोत तर आनंदाने जगू असा विचार करणारा. त्यामुळे आधी कधीच त्याला हे जाणवलं नाही आणि जरी जाणवलं तरी वयाने लहान म्हणून तो मध्ये पडला नाही. नीताला मात्र इतकी चांगली लोकं नको त्या गोष्टीत आयुष्य का वाया घालवत आहेत हेच कळत नव्हतं.  ही सतत चालणारी धुसफूस एकदाची संपवून टाकू म्हणून नीताने सगळ्यांना कुलदेवतेच्या दर्शनासोबतच छोटीशी ट्रिप करू असा प्लॅन सांगितला. अनायसे सगळ्यांना सुटी मिळत असल्याने सगळे तयार झाले. होकार मिळताच तिने प्रत्येकाने ठराविक शेअर वाटून घेऊ म्हणजे वाद नको असं म्हणत एक अंदाजपत्रक मांडले ज्यात सगळा खर्च समाविष्ट केला होता. तिची ही कल्पनाही मान्य झाली. 

           आणि आज माहूरला दर्शन आटोपून मंडळी शेगावला निघाली होती. नेहमीच्या पेक्षा रागरंग जरा वेगळेच दिसत होते जे नीताच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. आताशा तिला लक्षात आलं होतं की या भांडणाच  मूळ कारण काय आहे. या पैकी कुणीच कधी दुसर्यासोबत छान असा वेळच नव्हता घालवला त्यामुळे सतत फक्त नात्यातील ताणच वाढत गेला. 

रात्री मुलं झोपल्यावर सगळे मोठे एकत्र गप्पा मारत बसले. मग हळूच छोटासा गेम खेळू असं सांगत नीताने सगळ्यांना तयार केले. गेम होती बॉटल स्पिन करण्याची ज्याच्याकडे बाटलीचं तोंड येईल त्याने आपल्या सोबतच्या व्यक्तीबाबत ४  अशा आठवणी सांगायच्या ज्या कुणालाच माहीत नाहीत त्या दोघांशिवाय. टीम अर्थातच नीताने चिट्ठी टाकून केल्या ज्या अगदी तिला हव्या तशा झाल्या ती आणि सासरे, दिर आणि नणंदेचा नवरा, नणंद आणि जाऊ, वैभव आणि त्याची आई. निताचा हेतू लक्षात आल्याने तिचे सासू सासरे मनातून सुखावले होते. गेम जशीजशी पुढे सरकत होती तसतशी सगळ्यांनाच इतकी वर्षे धरून ठेवलेल्या गोष्टींमधून मोकळं करत होती. सुरुवात नणंद आणि जाऊ यांच्यापासून झाली आधी छोटे छोटे प्रसंग दोघीनीही सांगीतले पण नकळतच आपण एकमेकींबद्दल चांगलं कसं काय बोलू शकतो हे प्रश्नही त्यांना पडला होता. मग असच काही त्या दोघींच्या नवरयांबाबतही झालं. हळूहळू मनातल्या सगळ्या शंका फिटत गेल्या आणि एका क्षणी सगळ्यांना जाणवलं की आत्ता जो जगत आहोत ती सुद्धा तर एक महत्वाची आठवण होतेय भविष्यासाठी. समाधानाने नजरेतील पाणी टिपत सगळेच झोपले.

            दुसऱ्या दिवशीची सकाळ सगळ्यांसाठीच एक नवीन सुरुवात करणारी ठरली. नेहमी छोट्याछोट्या गोष्टींवरून भांडणारे आज समोरच्याची काळजी घेण्यासाठी भांडताना बघून नीता आणि वैभव खुश झाले. शेगावला दर्शन,फिरणं सगळं आटोपून मंडळी गाडीत बसली. येताना वाटेवर सगळे फ्रेश होण्यासाठी उतरले नीता आणि तिच्या सासूबाई मात्र गाडीतच होत्या.  नीता उतरू लागली तशा त्या तिला थांब म्हणाल्या. ती थांबली आणि त्यांना रडूच  कोसळले. नीताला समजेना काय झालं ती काही बोलणार इतक्यात तिचे सासरे मागून म्हणाले, "तिलाही मोकळं होउदे पोरी, इतकी वर्ष तिने सगळ्यांना सांभाळून घेत खूप क्षण एकटीने साठवले. पण तू आलीस आणि इतक्या कमी वेळात ती ज्या गोष्टीसाठी तळमळत होती ती तिला मिळाली. खरं तर आम्ही दोघेही तुझे आभारी आहोत तुझ्यामुळे आमचं गोकुळ पुन्हा फुललं आहे." तेवढ्यात वैभव तिथे आला आणि परिस्थितीची कल्पना येताच तो म्हणाला, "मग बाबा आता तुम्हाला तयारी करावी लागेल या गोकुळात येणाऱ्या नव्या सदस्यासाठी" त्याचं मिस्कील हसू लक्षात येताच सगळे आनंदले. आणि जल्लोषात पुढचा प्रवास सुरु झाला. 

        मावळतीला जाणारा सूर्य आसमंतात रंगाची उधळण करत होता. पण एक नवाच रंग नीता आणि वैभवसकट सर्वांच्या चेहऱ्यावर होता रंग समाधानाचा. आणि त्या रंगाची उधळण सोबत विश्वास आणि प्रेमाचा सुगंधही घेऊन आली होती. 

निताचा सुगंधित हेतू सफल होऊन तिला कधीही न संपणारे समाधान देऊन गेला होता.


Rate this content
Log in