Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

श्याम्या ' द बेकुफ ! '

श्याम्या ' द बेकुफ ! '

7 mins
17.2K


" सुरश्या , उद्या तुझ्या कडे नगरला येतोय " एक दिवशी अचानक फोन आला .

" हॅलो ,पण कोण बोलतंय ?" असं बेधडक बोलणारा माझ्या माहितीत कोणी नाही .

" शरम नाही वाटत असं विचारायला ? अजून तसाच आहेस डॅम्बीस .! "

शंकाच नाही , बेकूफ शाम्याचं असणार !

" कोण , शाम्या तू ?किती दिवसांनी भेटतोयस ? पण तू कुठे आहेस ?कसा येणार आहेस ? बसने , रेल्वेने कि .....

"माझी गाडी घेऊन येतोय . बाकी सगळं भेटल्यावर , पैले तुझा पत्ता सांग . "

" प्रेमदान चौकात ये , तेथे सिग्नला थांब ,अन मला रिंग दे ,मी येतो न्यायला . "

"बाय " त्यानं फोन कट केला .

प्री -डिग्री ला शाम्या माझ्या सोबत होता . बी . एस सी . पर्यंत कॉलेजात हुंदडून एम .एस . सी साठी . औरंगाबाद ला गेला . त्यानंतर म्हणजे बारा पंधरा वर्षा नंतर भेटत आहे . माझा फोन नम्बर कसा मिळवला कोणास ठाऊक ? पण श्याम्या असले चमत्कार करू शकतो !

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ च्या सुमारास ' सिग्नल जवळ आलोय ' असा शाम्याचा फोन आला . मी लगबगीने चौकात गेलो . कोठेच दिसेना . मी फोन काढला .

" श्याम्या कुठयस ?"

" सिग्नल जवळ . " शाम्या कधीकधी वस्तुनिष्ठ उत्तर देतो .

" मी पण तिथेच आहे ,तू दिसत नाहीस !, कोणत्या सिग्नला आहेस ?"

"मला काय माहित ?'

"बेकूफ , गाडीची खिडकी उघड , समोर एखादी पाटी असेल तर वाच . "

" तोफखाना पोलीस "

श्याम्यान एकदम कन्डम माणूस . भलत्याच सिग्नलला थांबलाय !

"शाम्या तसेच उघड्या खिडकीतून मुंडक बाहेर काढ , समोर दिसेल त्याला प्रेमदान चौक विचार अन ये " मी आता वैतागलो होतो .

"सुरश्या समोर ना एक गाढव आहे ! अन त्याला बोलता येत नाही !"

"मग एखाद बोलणार गाढव बघ !,नीट पत्ता एकत नाहीस अन भलतीकडेच जातोस ".

वैताग साला ..... मी फोन कट केला . दहा -पंधरा -वीस मिनिट झाले . शाम्याचा पत्ता नाही ! पाच मिनिटाचा रस्ता आहे ,एव्हाना यायला पाहिजे होता . कुठं तडमडलंय कोणास ठाऊक ? पुन्हा फोन लावला .

" श्याम्या कुठयस ?"

"हे काय, तुझ्या डाव्या बाजूलाच आहे ! पांढऱ्या अल्टोत ! "शाम्याच्या मक्ख उत्तराने माझा पार उकळू लागला .

" बेकूफ , बाहेर ये " मी ओरडलो .

गाढवी रंगाच्या सफरीत पायात स्लीपर घातलेला श्याम्या तीन जागी चेमटलेल्या अल्टो तुन पाय उतार झाला .

" तू नको म्हणला अस्तास तर आलो नसतो ! फुकट ताटकळत ठेवलास !"तो मला म्हणाला .

"मी ? कस काय ?"

" तू माझ्या कड पाहिलंच नाहीस ! मी गाडीतून तुला किती हातवारे केले ! पण तुझं सगळं लक्ष 'रंगीत" स्कुटया कडेच !"

मी कपाळाला हात मारून घेतला . ह्या माकडाच्या गाडीच्या खिडक्यांना स्क्रीन लावलेत . याला बाहेरच दिसत पण मला बाहेरून आतलं दिसत नाही ! हे त्याच्या लक्षात आले नाही . ( आणि आले असते तरी त्याने ते मान्य केले नसते .) वर मलाच डाफरतोय ! श्याम्या न असाच आहे !

शाम्या नगरला आला आणि येथेच रमलाय . घर -बीर घेतलय . चार दिवसाखाली त्याचा घरी गेलो होतो .

" कशाला आलास ? फोन करायचा . मुडक्याच्या टपरीवर धडकलो असतो . पण तू कसला चेंगट ? फोनचा रुपया वाचवलास !, घरापर्यंत तंगडतोड केली असशील !, " दार उघडत शाम्या बरळला .

" अरे तस नाही , या बाजूला आलो होतो , म्हणलं तुला भेटून जावं , अन हे काय ? थोबाडाला पांढरी माती का लावलीस ?"

"अडाणी तो अडाणीच राहिलास !, अरे याला मुलतानी मातीचा फेस पॅक म्हणतात ! सुभ्याच्या पोरीचं लग्न आहेना दोन दिवसांनी ,त्याचीच तयारी चालू आहे ! कपडे तयार आहेत ,उद्या फक्त कलप केला कि झाले !"

लग्न म्हणलं कि आमच्या शाम्याच्या अंगात सनसरते ! आता या वयात म्हणजे बासष्टीत काय करायचंय याला फेस पॅक अन कलप ! पण गडी ऐकत नाही .! कलप केल्यावर ना शाम्या विचित्र दिसतो . जुन्या देवद्वारच्या लाकडी पाटाला चकचकीत नवा सन्मायका लावल्यावर तो जसा देखणा दिसण्या ऐवजी दीनवाणा दिसतो तसा शाम्या दिसतो ! पण हौस !

"काय सुरश्या, माणसांनी कस अपटुडेट रहावं ."

" पण श्याम्या तुला नाय बर दिसत ".

" तुला बर दिसत नाही ना ? मग मला ते छानच दिसत असणार ! तुला कुठे माझं ' चांगलं 'बघवत!"

श्याम्या न असाच आहे . आडमुठ .

कॉलेज मध्ये असल्या पासून शाम्याला लग्नच आकर्षण आहे . त्याच कारण त्यातले बँड वाले .! श्यामला जुन्या गाण्याचे प्रचंड वेड आहे . आम्ही शाम्याच्या खोलीवर एकत्र अभ्यास करायचो . साधारण रात्री अकराच्या सुमारास हा डुकल्या घ्यायला लागायचा . ' सुरश्या झापड येतीय चहा कर ना ' म्हणायचा . मग आम्ही फरफऱ्या स्टोव्ह वर चहा करायचो . चहा पिल्यावर हा फडताळातून बुलबुल तरंग काढायचा . ( हल्ली हे वाद्य दुर्मिळ झालंय ) गच्चीवरच्या मुंडेरीवर बसून श्याम्या त्या बुलबुलतरंगावर झकास गाणी वाजवायचा . त्यावर त्याने वाजवलेले 'रमया वस्तावया ' मूळ गाण्या पेक्ष्या गोड वाटायचे . ती निवांत वेळ ,निरव शांतता , लख्ख चांदणं , आणि बुलबुलतरंगावर तरंगणारे सूर ! तेव्हा पेक्षा हि आज त्या आठवणींची नशा औरच वाटते . पण शाम्याने कधी चार - चौघात आपले 'हुन्नर ' दाखवले नाही . असो .

भडक निळ्या रंगाचा ,बटबटीत जरीकाम असलेला , बंद गळ्याचा गुढग्या पर्यंत पोहंचणारा कोट , खाली चुडीदार विजार /पायजमा घालून हा सुभ्याच्या पोरीच्या लग्नाला ,कार्यालयाच्या कर्मचाऱ्याच्याहि आधी हजर होता . मी नवाच्या सुमारास गेलो तर हा गुलाबदाणी घेऊन मुख्य दारात स्वागताला उभा !

" शाम्या अरे लग्न दहाचे तू इतक्या लवकर का उभा आहेस ?"

" आत्ता पाहुणे येतील . आपण आपलं तयारीत असावं . सुभ्या कुठं कुठं पहाणार ? तसे हि त्याच्या कडे माणूस बळ कमीच आहे . बर ते जाऊदे माझा ड्रेस कसा आहे ?"

"शाम्या ,तुझे कपडे ना एकदम भारी असतात !" शाम्याची कळी खुलली . हे मात्र एकदम खरे आहे . याचे कपडे खरच भारी -म्हणजे किमतीला -असतात पण याला ते शोभत नाहीत . आमच्या काळी एक ततंगडा हिरो भलताच फार्मात होता . त्याला मारे राजकुमाराचे , पोलीस इंस्पेक्टरचे तगडे रोल मिळायचे .

पण भिकार पर्सनॅलिटी मुळे राजकुमाराच्या कपड्यात तो बँडवाल्या सारखा अन पोलिसांच्या कपड्यात गुरख्या सारखा दिसायचा ! तस काहीस आमच्या शाम्याच आहे . पाच फुटी उंची अधिक जम्बो ढेरी त्यावर हे 'हेवी ' ड्रेस ! शाम्या एकदम ' कार्टून ' दिसतो . त्यावर कहर पायात दोन पट्ट्याची स्लीपर ! मी त्याला बरेचदा सांगून पहिले . पण हा ऐकत नाही . वर मलाच 'तुला माझे बरे बघवत नाही ' म्हणतो .

लग्नाचा दिवसभर शाम्या मांडवभर नाचला . भटजीची 'डिमांड ', पूजेत बसलेल्या सुभ्यास काय हवे नको ते पहाणे , व्याही , पै-पाहुणा ,सगळं जातीने पहात होता . त्याला जेवणाची सुद्धा शुद्ध नव्हती . सर्व कार्य उरकले . मुलगी सासरी जायला निघाली . सारेजण तिला निरोप देण्यासाठी सजवलेल्या गाडी जवळ जमले होते . तेथे नव्हता तो फक्त शाम्या ! मी रिकाम्या मांडवात आलो . शाम्या एका खांबाआड पाठमोरा बसून हुंदकेदेत रडत होता !

"शाम्या सावर स्वतःला . वेड्या सारखा रडतोयस काय ? आत्ता लोक परत येतील . 'का रडतोस ?' विचारलंतर काय सांगणार आहेस ?" मी हलकेच त्याचा पाठीवर हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला .

" आज माझी अलकी असती तर याच वयाची असती रे ... " त्याला पुन्हा हुंदका आला . मी फक्त त्याच्या पाठीवर हात ठेऊन होतो . बेकूफ खूप हळवं आहे ! पण आत्ताचे त्याचे वागणे सहाजिकच होते .

शाम्याला एक मुलगी होती . तशी ती उशिराच झाली होती . श्याम्याचा तिच्यावर खूप जीव होता . वयाच्या तिसऱ्या वर्षी तिला पोलिओ झाला ! ती फार दिवस जगणार नाही हि वस्तुस्थिती डॉक्टरांनी आधीच सांगितली होती ! गोबऱ्या गालाची गोड अलकी मी खूपदा पहिली होती . (म्हणजे जेव्हा श्याम्या कडे जायचो तेव्हा ) तिला खरडून इकडे तिकडे सरकताना पाहून मला सुद्धा काळजात चर्रर्र करायचे ! तीच बोलणं ,टीव्हीतल्या नकला ,तिचा रुसवा , तिची तडफड , ------ तीच फुलणाऱ्या वयाचा ,आणि कमी होणाऱ्या आयुष्यचा प्रत्यक्ष क्षण श्याम्याने तिच्या सोबत घालवलाय ! त्यासाठी त्याने आठ -दहा वर्षाच्या सर्व्हिस वर पाणी सोडले होते ! श्याम्या खरच 'बाप ' माणूस ! आज त्याची अलकी जिवन्त असती तर सुभ्याच्या पोरी इतकी झाली असती . तीही उपवर झाली असती ! श्याम्याच्या मनाची अवस्था मला जाणवत होती .

शाम्या शांत झाला . बेसिनवर तोंड धून आला .

"चल शाम्या चहा घेऊन येऊ ,सोबत बन नायतर खरी ." बेकूफ सकाळ पासून उपाशी आहे .

" सुरश्या तुला न माझं ' चांगलं ' बघवत नाही तस ' वाईट ' पण बघवत नाही . " घोगऱ्या आवाजात शाम्या पुटपुटला .

श्याम्या न असाच आहे !


Rate this content
Log in