शिक्षणातीलअनास्था
शिक्षणातीलअनास्था
पूर्वी छडीचे शिक्षण होते; पण त्यात शिस्त, संयम,संस्कार गुणवत्ता होती.संस्थाचालकांची तळमळ होती. शिक्षकही आत्मीयतेने शिकवत होते. शिक्षक जीव ओतून शिकवत होते. दगडाच्या मुर्तीसारखा संस्कारप्राप्त विद्यार्थी बाहेर पडत होते. विद्यार्थ्यांना दहावी नंतर रडू यायचे. शिक्षक सुद्धा आपला विद्यार्थी कधी भेटेल म्हणून दुःख व्हायचे. गुरु, शिष्य नाते अतूट होते. शिक्षकाना फार दिवसांनी पाहिल्यावर डोळे पाणवायचे.शिक्षकांच्या भरवशावर आपल्या पोटच्या मुलांना बिनधास्त शाळेत पाठवत होते.
शिक्षणासाठी पालक शिक्षकांना नियमाने आधार देत
होते.पालक वर्गाकडून पोटच्या मुलांना शिस्त लागावी म्हणून शिक्षकांना शिक्षा करण्याचे आदेश द्यायचे. मुलांची कोणतीही सबब पालक ऐकून घेत नव्हते कारण त्यांना माहित होते शिक्षक आपल्या मुलाच्या भवितव्यासाठीच ओरडणार. त्यामुळे शिक्षक सक्तीने विद्यार्थी घडवत होते. पालकाच्या घरी विद्यार्थी आणण्यासाठी शिक्षक सक्ती करत असत. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण पूर्वी प्रगत होते. त्याचा परिणाम म्हणून आदर्श पिढ्या निर्माण झाल्या. अभ्यासक्रम देखील मूल्यमापनात्मक असायचा. उत्तीर्ण, अनुतीर्ण विद्यार्थी असायचे.अभ्यासात मागे पडणारे विद्यार्थी नापास म्हणून घोषित असायचे. त्यामुळे गुणवत्तेला स्थान होते. सरसकट कुणालाही पास करत नव्हते. गुणगौरव होत असल्याने विद्यार्थ्यांत अभ्यासाची स्पर्धा असायची.
परंतु आता परिस्थिती
नेमकी याच्या उलट होत आहे. शिक्षणात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढत आहेत. अभ्यासक्रमाचा दर्जा खालावत आहेत. अनेक पिढ्या फक्त शिक्षण घेत आहेत ;पण संस्काररहीत. त्याचे मूळकारण म्हणजे पालकानी विद्यार्थ्यांचे पुरवलेले बिनकामाचे लाड. थोडे काही झाले की पालक शाळेत येऊन भांडू लागतात. त्याचे परिणाम असे झाले की शिक्षकांवर अनेक बंधने आली. नियमाच्या चाकोरीत शिक्षकाला अडकवून शिस्तीचे अधिकार काढून घेण्यात आले. त्याचे आर्थिक, मानसिक शोषण होऊ लागले. शिक्षक ह्या पेशाचे महत्त्व कमी केले.शिक्षकांच्या विरुद्ध कायदे तयार होऊ लागले.मालिका, चित्रपटातून शिक्षकाची टिंगलटवाळकी सुरु झाली. त्यातून शिक्षकां चा अनादर होऊ लागला. एकंदरीत शिक्षणाची चेष्टा सुरु केली. तेच समाज पाहतो व खरे मानतो. यामुळे विद्यार्थी व पालकांना शिक्षकांबद्दल आदर कमी झाला. त्याचे परिणाम शाळेत दिसू लागले आहेत. मुले वर्गात गोंधळ घालतात, शिव्या देतात, व्यसन करतात, चोरी करतात. शिक्षकांने कोणतीही शिक्षा करायची नाही. त्यामुळे हजारो पिढ्या उध्वस्त होत आहेत. हल्लीचे विद्यार्थी पालक, शिक्षकानाही घाबरत नाही याचे कारण ढीसाळ शिक्षण व्यवस्था. त्यामुळे ही मुले भविष्यात पालकांचे आधार न होता डोकेदुखी बनत आहेत. ही मुले संस्कार हीन होऊन आपल्या वृद्ध माता पित्याना वृद्धाश्रमात पाठवत आहेत. अशी मुले आळसी व निकामी बनतात.
शिक्षकांचे खच्चीकरण म्हणजे अनेक पिढ्यांचे नुकसान होय.