शिक्षण यंत्र कारखाना नाही
शिक्षण यंत्र कारखाना नाही
शिक्षण ही देशाची संपत्ती आहे. महासत्ता देणारी यंत्रणा आहे. आदर्श पिढ्या घडविण्याची ताकद आहे. तिचे महत्त्व कमी करणे म्हणजे देश अधोगतीकडे घेऊन जाणे होय. शिक्षणाचे व्यापारीकरण करुन गरीब हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय करणे होय. शिक्षण सम्राटांनी शिक्षणाकडे पैसा कमवण्याचे साधन म्हणून न बघता देश घडविणे हे उद्दिष्ट ठेवावे. अन्यथा दूसरे मोठे पैसा देणारे साधन शोधावे. शिक्षणाच्या नावाखाली हजारो पिढ्यांचे नुकसान करू नये. त्यातून मिळणारे कोट्यावधी रुपये आपल्याला मानसिक समाधान देऊ शकणार नाही.
शिक्षकांचा वापर यंत्रासारखा करू नये. अभ्यासक्रम उद्दिष्टाधिष्टीत असावा. शिक्षणातून संस्कार, मूल्ये शिकवायला हवीत. शिक्षण विद्यार्थी व शिक्षक यांच्यात चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. त्यांच्या शारीरिक व मानसिक गोष्टी विचारात घ्याव्या. शिक्षकांचे प्रतिनिधी ह्यासाठी काहीही प्रयत्न करताना दिसत नाही. वर्षानुवर्षे असेच चालत आहे. भरमसाठ तासिका विद्यार्थी व शिक्षकांवर लादल्या जातात. विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत विचारात घेतली जात नाही. शिक्षण नीरस होत आहे.त्यातून काहीही साध्य होत नाही.
त्यात अधिक भर मालिका, चित्रपट यांची झाली आहे. त्यात शिक्षकांची व शिक्षणाची अब्रू वेशीवर टांंगली आहे. त्यात कुणीही आक्षेप घेत नाही हे देशाचे दुर्दैव समजावे काय? अनेक ठिकाणी तर शिक्षक संस्थाचालकांच्या खूप दबावाखाली असतात. त्यांना विचारांचे स्वातंत्र्य नसते. भविष्य नसते. त्यांना कुणाचेही संरक्षण नसते. अशी आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था आहे.
शिक्षणाचे व्यापारीकरण झाले आहे. त्यासाठी सरकार, समाज, संस्थाचालक, शिक्षक प्रतिनिधी, वरिष्ठ शिक्षक, पालक, विचारवंत यांची एकत्र विचारधारा असावी. गरीब विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विमा लागू करण्यात यावा. शिक्षकांचा कष्टाचा सरकारी पगार संस्थाचालकांंनी खाऊन त्यांना छळू नये. त्यांचे आर्थिक शोषण होऊ नये. शिक्षकानी आपल्या कर्तव्यात कसूर करू नये. नेमताना गुणवंत शिक्षकच नेमावे .