Shital Thombare

Others

4  

Shital Thombare

Others

शहाण्यांच्या दुनियेतील...

शहाण्यांच्या दुनियेतील...

3 mins
293


शहाण्यांच्या दुनियेतली 'ती' एक वेडी...... सोसायटीतून बाहेर पडलं की....उजव्या हाताला वाणी आळी लागते....तिथून थोडं पुढे गेलं की भाजी मार्केट.....पुढे एक जुनं किराणा मालाच दुकान....फळवाल्यांच्या गाड्या....आणि कोपरयावर बरेच दिवसांपासून बंद असलेलं एक दुकान..... त्या दुकानाच्या बाहेर पहिल्यांदाच ती मला दिसली......केसांचे झीप तोंडावर आलेले.....जवळ एक कळकट बोचकं....कित्येक दिवस आंघोळ न केल्याने अंगावर चढलेला मळकट रंग.....तोंडाची टकळी सतत चालू.... आज ती पहिल्यांदाच मला इथे दिसली .......रोजचाच माझा रस्ता.....पण इतके दिवस ही आपल्याला दिसली नाही.....मग आज अचानक इथे कुठून आली असावी बरं??.......उगाच मनात विचार येऊन गेला......पण आपल्याला काय करायच्यात नसत्या उचापती.......असं म्हणत लगेच आलेला विचार झटकून टाकला....... ती लक्षात रहावी असं तिच्यात काहिच नव्हतं..... पण आता ती मला रोजच दिसू लागली..... त्यामुळे तिला पाहत पुढे जाणं माझ्या दिनचर्येचा एक भागच बनला.....कधी उगाचच बडबड करताना.....कधी काही खायला मिळालं की ते खाताना......कधी आपल्या जवळचा फाटका धडपा अंगावर पांघरून झोपताना.... येणारा जाणारा प्रत्येकजण तिला पाहून .....नाक उडवून पुढे जायचा.....चिमुरडी पोरं तिला पाहून उगाच आईचा हात घट्ट धरत....... पण आज बाजारात ती मला ......तिच्या नेहमीच्या जागेवर नाही दिसली.....माझी नजर उगाच तिला शोधू लागली.....गेली कुठे ही?? .....रोज तर इथेच दिसते.....काही झालं तर नसेल तिला.....कोणी हाकलवून तर काढलं नसेल.....बिचारी.....आता कुठे जाईल???? मनात शंका कुशंकांच काहूर माजलं......चालता चालताच माझी नजर तिला शोधू लागली.....थोडं पुढं गेले तर किराणामालाच्या दुकाना बाहेर ......बरीच गर्दी जमा झालेली .....मी दूरूनच कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.....की हा काय प्रकार आहे..... बाजूच्या फळवाल्या कडे चौकशी केली .....तर तो म्हणाला....."आहो ताई त्या कोपरयावरच्या वेडीने ........केव्हा पासून त्या किराणावाल्याला परेशान करून सोडलय......बाहेर यायचं नावच घ्यायना बघा दुकानातून"...... मी गर्दीतून वाट काढत.....पुढे गेले....पाहते तर दुकानदार तिला दुकानातून बाहेर हकलवण्याचा प्रयत्न करतोय.....ती मात्र दुकानात ठाण मांडूनच बसलेली.....बाहेर यायचं नाव घेईना...... बाईमाणूस म्हणून दुकानदाराला तिला हाताळा धरून बाहेरही काढता येईना.....दुकानातील वाढलेल्या गर्दीने आणि तिच्या बाहेर न पडण्याच्या हट्टाने......दुकानदार जाम वैतागलेला दिसला.....धंद्याच्या टायमाला कशाला खोटी करतेस...... अस म्हणून तो तिला .......ओरडत होता..... तिच्या एकंदरीत हावभावावरून मी अंदाज बांधला......हिला भूक लागली असावी.....दुकानदारावर थोडं वैतागतच मी म्हटलं, " अरे तिला भूक लागली आहे..... खायला मागतेय ती काही तरी .....तू हकलवून काय लावतोयस....." तर तो शहाणा मलाच म्हणतोय," ओ ताई तुम्हाला एवढा पुळका येतोय.....तर तुम्हीच द्या तिला खायला....." माझ्यात अजुनही माणूसकी आहे ......हे दाखवण्यासाठी की......दुकानातल्या लोकांच्या माझ्यावर रोखलेल्या नजरा टाळण्यासाठी......मी दुकानातून एक बिस्किटचा पुडा खरेदी केला......आणि तिच्या हातावर टेकवला......तेवढीच चार लोकांत माझी कॉलर ताठ.....पण कसलं काय..... बिस्किटचा पुडा हातात पडताच.....तिने मान वर करून ही नाही पाहिलं आणि...... तिथून धूम ठोकली.....माझा हिरमोड झाला .....काय हे धन्यवाद नाही .....पण आपल्याला कोणी मदत केली.....एवढ तर पाहिलं असत..... ती बाहेर पडली ....अन मी माझी खरेदी करायला लागले.....खरेदी करून पुढे जाते ......तो ही बया पुन्हा दिसली.....रस्त्याच्या कडेला फतकल मांडून बसलेली.....सभोवताली चार- पाच कुत्र्यांचा घोळका..... मघाशी मी दिलेला बिस्किट पुडा तिच्या हातात......त्यातली बिस्किटं..... ती त्या मुक्या जनावरांना प्रेमाने भरवतेय.....ती मुकी जनावरं ही तिच्या अंगावर खेळतायत....कुणी तिचे पाय चाटतय.....कुणी उगाच अंगावर झेपावतय....तिच्या प्रेमाची जणू परतफेड करायचा प्रयत्न करतायत.... मी तिला काही क्षण पाहतच राहिले.....मला अस रस्त्यातच उभारलेल पाहून ......एक भाजीवाली म्हणाली, " अहो ताई रोजचच आहे हिच .....रोज कोणाकडे ना कोणाकडे वाद घालून ......खायला मागते.....आणि जाऊन ह्या कुत्र्यांना.....खायला घालते.....वेडी आहे ती....तुम्ही नका लक्ष देऊ..... वेडी.....लोकं हिला वेडी म्हणतायत......जिला स्वतःपेक्षा त्या मुक्या जनावरांच्या पोटाची जास्त काळजी आहे.....वेडी तर ही लोकं आहेत....जी स्वतःला शहाणी समजतायता ......आणि तिला वेडी.....खरं तर आम्हां वेड्यांच्या दुनियेत ती एकटीच शहाणी दिसली आज मला.... माणसातील माणुसकी हरवलेली असताना.....संवेदनशीलता नष्ट झालेली असताना .....आपल्यातील माणूसकीला जिवंत ठेवणारया.......त्या वेडीत आज मला खरी माणुसकी दिसली.....तिच्यापुढे आपण किती छोटे आहोत याची जाणीव झाली...... शहाण्यांच्या दुनियेतली 'ती' एक वेडी..... ( कथा आवडल्यास लाईक करा. शेयर करा..लेखिकेच्या नावासहित...)


Rate this content
Log in