kanchan chabukswar

Others

3.5  

kanchan chabukswar

Others

पण खूप काही

पण खूप काही

4 mins
106


प्रिय आईस,


विषय काहीही नाही पण खूप काही. इथे दूर अमेरिकेत आल्यावर मला एक एक दिवसाची आठवण येते. आपण दोघांनी केलेली मजा, तू माझ्याबरोबर माझ्या एवढीच होऊन खेळलेली, काहीही चुकलं तरी समजून घेणारी, माझ्या खोड्या, माझे विचित्र खेळ, सगळ्यांना गोड हसून पांघरूण घालणारी. फार दुर आलोय मी. फार दूर. अगदी केजीतली आठवण म्हणजे, आपण दोघे एका शाळेमध्ये, दुपारी बारा वाजता, तू तुझ्या स्टाफ रूम मधून बस स्टँड च्या दिशेने नजर ठेवून, मी आलो की नाही, उतरतोय की नाही, मला बघितल्यावरच तुला तुझी काम सुचत असे.


बसमधून उतरताना आम्ही सगळी मुले," चांदनी" असे ओरडत असून. अर्थात चांदणी आमचे मित्र मैत्रीण नव्हतीच. चांदनी म्हणजे आता केजी पार्क मध्ये जाऊन घसरगुंडीवर दणादण पसरायचे. माझा क** इस्त्री केलेला पांढरा शुभ्र शर्ट काही मिनिटातच माझ्या चॉकलेटी पॅन्ट सारखा काळा कुळकुळीत होत असे. पण तू कधी काही बोलली नाहीस. कितीतरी वेळा मी तुला घसरगुंडीवरुन बघितले आहे. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य मला प्रोत्साहित करत असे. आजी नेहमी कुरकुर करे," कसले रे तुझे घाणेरडे शर्ट, खेळतोस का मातीत लोळुन येतोस?" पण आई तू कधीच काही म्हणाली नाहीस, उलट सामान आणताना वेगवेगळे साबण आणून माझे मळलेले शर्ट स्वच्छ कसे होतील हे बघत असे.


मला सगळ्यात लाज वाटली जेव्हा आपली टीचर मीटिंग होती, अर्थ टीचर आणि तू एकाच शाळेतल्या, तरीपण ती नाक मुरडून म्हणाली," तुमच्या मुलाचा शर्ट एवढा घाणेरडा का असतो, समोरून स्वच्छ आणि पाठी कडून.... तसाच बसतो ना तो पुढचे दोन-तीन तास, अशाने त्याला त्रास होईल." तू हसलीस, म्हणाली "बघते मी".


त्या दिवशी संध्याकाळी आपण दोघं बाजारात गेलो, आठवड्याचे पाच शर्ट तू विकत घेतले. मला म्हणालीस "शाळेत जाताना जुना शर्ट घालत जा, खेळून झाल्यावरती शाळेच्या मावशी बाईंकडून शर्ट बदलून मग क्लासमध्ये बसत जा." खरं म्हणजे मला वाटलं होतं की तू नक्की पाठीत धबका घालणार, कारण माझ्या मित्रमंडळींना पीटीसी झाल्यावर बराच प्रसाद मिळाला होता. पण तू मात्र नेहमीप्रमाणे माझ्या खेळण्या वरती उत्तम उपाय शोधल्यास.


आई मला अजूनही आठवते, मी तिसरीत असताना प्रोजेक्ट साठी म्हणून सामान आणायचे होते, कार्डबोर्ड कागद, कोरे कागद, डिंक, टेप. इत्यादी इत्यादी. तू मला शंभर रुपये दिलेस, आणि स्टेशनरीच्या दुकानाबाहेर उभी राहून मला एकट्यालाच सामान घ्यायला आत पाठवले. सगळे सामान घेतल्यावर ती मी हातात नेलेल्या कागद आणि पेन्सिलीने हिशोब केला, शंभर रुपये पैकी वीस रुपये परत आले होते, ते मी हाता मध्ये घट्ट धरले आणि बाहेर आलो. हिशोबाचा कागद आणि पैसे तुझ्या हातात ठेवले. दुकानदार पण मजेशीर हसत होता, आई तू त्याला हात केला आणि थँक्यू म्हंटले.

चौथीमध्ये असताना मी आणि ताई आणि मुन्नी जिमखान्यात जात असू, सुरुवातीला तू येत असे, पण नंतर आम्ही ठरवलं आपण जायचं. बसचे पैसे घेऊन आम्ही तिघेही जिमखान्यात जात असू. नंतर आमच्या लक्षात आलं होतं की जिमखान्याच्या कॅन्टीन मधला वडापाव चा वास फारच आकर्षित करत असे, बरं बाबांना म्हणायची चोरी, शेवटी आम्ही तिघांनी दोन्ही वेळेला चालत जाऊन बस चे पैसे वाचवले आणि आठवड्यातून दोन वेळा तरी वडापाव खात असू. तुझ्या लक्षात आलं होतं, एकदा ताईला पैसे देताना तू थोडे जास्तच दिलेस म्हणालीस असू दे कधी रिक्षा करावी लागली तर. आम्हाला समजलं की आज तुझ्या तर्फे वडापाव आहे.

 

तसाच पोहण्याच्या तलावावर जा पण वडापाव, तळणीचे तेल, घाणेरडे हात, घाणेरडी फडकी , आम्हाला समजतच नसे. त्याचा वासच इतका आकर्षक होता, मग बाबांनी ठरवले की व्यवस्थित जर पोहून झाले तरच वडापाव घेण्यात येईल.


   आई मला पानकोबी ची भाजी आवडले म्हणून दर शनिवारी मी पानावर बसल्यावर ती तू गरम गरम भाजी करून माझ्या पानात वाढत असे, आता तशी भाजी काही जमतच नाही ग, तुझ्या हातची पुरणाची पोळी, तू केलेलं लोणचं, जरी अमेरिकेत सर्वकाही मिळत असलं तरी तुझ्या हातची चव मात्र नाही. तुला आठवतं, दर शनिवारी आपण दोघं बाजारात जायचो, त्या वेळेला तर मला बोलता पण येत नव्हतं, पण मी तुला शेंगांच्या गाडीकडे, कोबीच्या गाडीकडे, खेळण्याच्या दुकानाकडे घेऊन जात असे, तू पण हसून माझा सारा हट्ट मान्य करत होती. बाजारामध्ये आधी मला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या की मगच घरच्या साठी च्या गोष्टी घेतल्या जायच्या.


अजून एक, त्या रात्री आपण आजी कडून घरी परत येत होतो, सगळ्या ट्रेन्स लेट झाल्या होत्या, आपण दोघंच, कल्याणला उतरून दादरच्या ट्रेनमध्ये बसलो, रात्रीचे बारा वाजून गेले होते, ट्रेनमध्ये जास्त कोणीच नव्हतं, तु हळूहळू तुझे दागिने काढून माझ्या जीन्सच्या पॅन्ट मध्ये आणि जीन्स च्या जाकीट मध्ये ठेवून मला डोळ्यांनीच गप्प बसायला सांगितले, तुला माहिती आई, त्या रात्री मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं, मी पण अतिशय सावध पणे घरापर्यंत तुझ्या सगळ्या चीजवस्तू सांभाळून आणल्या. कितीतरी आठवणी आहेत,


कधी मला कमी मार्क मिळाले , रडणाऱ्या मला तू खोटे खोटे सांगितलेस की तुला पण लहानपणी असेच मार्क मिळत.  इंजिनीअरिंगच्या प्रवेशाच्या वेळेला देखील तीच कथा, आपल्या देशातल्या राजकारण्यांना आणि रिझर्वेशन ला कंटाळून मला तर पहिल्या राउंडमध्ये ऍडमिशन मिळणार नाही हे तर नक्कीच होतं, तरीपण रडवेल्या झालेल्या मला समजुतीचे किती बोल सांगितलेस, ऍडमिशन नाही मिळाली म्हणून कपडे घेऊन देणारे बहुतेक तू पहिलीच आई असशील. घरी येताना नवीन निघालेले न चुरगळणारे असे शर्ट आणि पॅंट मला घेऊन दिलेस.


माझी सगळ्यात आवडणारी आपली ट्रिप म्हणजे दिल्लीची ट्रिप. तुला काम असेल मध्ये कसली तरी मीटिंग होती आणि एकटी ला जायचं होतं म्हणून तू परवानगी घेऊन मला देखील घेऊन गेलीस. तुझ्या मिटिंगच्या वेळी मला दिल्ली दर्शनाचे तिकीट काढून दिलेस आणि संध्याकाळी घ्यायच्या वेळेला चक्क तू रस्त्यावरती उभी राहिलीस.


आग्र्याचा खाल्लेलI पेठा, दिल्लीची मिठाई, आपल्या दोघांना गोड खूप आवडतं ना, आतादेखील मी जेव्हा जेव्हा अमेरिकेहून घरी परत येतो, तू तर मला एअरपोर्ट वरूनच खाऊ घालायला सुरुवात करतेस जसं काय किती वर्षाचा भुकेला.

  

चल, तू व्यवस्थित रहा, स्वतःला सांभाळ, प्रकृतीकडे लक्ष दे. बाबांना नमस्कार, ताईला आणि मुन्नीला मी जाऊन भेटणार आहे तू काळजी करू नकोस, त्या दोघी पण व्यवस्थित आहेत. चार गाड्या भरून प्रेम.

तुझा लाडका,

मिठू.


Rate this content
Log in