Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

प्लीज येवू दे ना

प्लीज येवू दे ना

6 mins
2.5K


बाहेरच चमकदार निळसर आकाश,त्या खाली नुकताच पिंजलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग,सुनीलला विमानाच्या खिडकीतून दिसत होते. खिडकीशेजारचा विमानाचा पंखा,त्या मावळतीच्या सोनेरी सूर्य प्रकाशात तळपत्या तलवारीच्या पात्या सारखा भासत होता. 'विरोध करणाऱ्याला कापून काढीन ' असा त्याचा अविर्भाव होता. सध्यातरी तो पंखा विरळ हवेतुन जात होता. या उंचीवरून पृथ्वीची गोलाकार कड सुंदर अन रेखीव दिसत होती. त्याने घड्याळात पहिले. अजून बरोब्बर दहा तास आणि वीस मिनिटांनी हे विमान मुंबई विमानतळावर लँड होणार होते. तब्ब्ल चार वर्षांनंतर तो माय देशाच्या मातीवर पाय ठेवणार होता!

"राकेश, हे दहा तास कधी समपतात असं झालाय! आईला चार वर्षानंतर भेटणार आहे! तिने खूप कष्टाने माझे शिक्षण आणि सांभाळ केलाय. आता तिला सुखात आणि सुखातच ठेवीन! येताना तिला सोबत आणायचय ! शनिवार -रविवारी स्काईप वर पहातो बोलतो तिला,पण नाही होत समाधान. गेल्यावर घट्ट मिठीत घेईन तेव्हाच बरे वाटेल! " शेजारी बसलेल्या आपल्या मित्राला तो म्हणाला.

"हू ! खरय तू म्हणतोस ते. पण इतकं इमोशनल होऊन चालत नाही. चार वर्ष थांबलास ना ?मग,अजून आठ दहा तास कळ काढ!" राकेश डोळ्यावर काळी पट्टी ओढून झोपी गेला. बहुदा त्याला ह्या विषयावर बोलायचे नसेल. राकेशला सुनीलचा अतिभावुक स्वभाव आवडत नव्हता.

राकेशकडे एक कटाक्ष टाकून त्याने आपली नजर पुन्हा खिडकीबाहेर वळवली. प्लेन खूप संथ गतीनं जातंय असे त्याचा मनात येऊनच गेले. विमान कुठल्यातरी समुद्रावरून जात असल्याचे समोरच्या मॉनिटरवर दिसत होते. पण पांढऱ्या ढगांमुळे तो निळा सागर दिसत नव्हता.

तेव्हड्यात काहीतरी त्या पंख्याला धडकले! विमानाला लहानसा तरी जाणवण्या इतपत जर्क बसला. कोणी त्या जर्कला फारसे सिरियसली घेतले नसावे. कारण हवाई प्रवासात एयर पॉकेट मुळे असे धक्के अधून मधून बसत असतात. पण त्याला पंखाच्या खालून निघणारी एक धुराची लकेर दिसली! अभद्र शंकेने तो हादरला!

"धूर!धूर निघतोय,पंख्यातून !!"तो ओरडला. त्याला त्याची चूक कळली. या विमानात मराठी कोणाला कळणार?

"व्हात !" त्याच्या ओरडण्याने एक एयरहोस्टेस धावली.

"स्मोक ऑन विंग !!"

क्षणात त्याच्या खिडकीची काच फोडून एक वस्तू त्याच्या डोळ्यावर येऊन आपटली ! डोळ्यातून वेदनेच्या आधीच रक्ताची धार लागली होती !त्याने डाव्या डोळ्याला हाताचा तळवा दाबून धरला. तरी हाताच्या फटीतून रक्त ओघळत होते! जी वस्तू त्याच्या डोळ्यावर लागली होती ती त्याच्या मांडीवर पडली होती. त्याने उजव्या डोळ्याने ती पहिली. ती एका गरुडाची रक्ताळली चोंच होती!तोवर विमानाच्या छतातून धूर झिरपू लागला होता! ताड -ताड आवाज करत एका पाठोपाठ एक विमानाच्या सर्व खिडक्यांच्या काचा फुटल्या. विमानातील बंदिस्त हवा वेगाने बाहेर खेचली जात होती! प्रवाश्यात प्रचंड गोंधळ मजला होता. काही पॅराशूट साठी,काही ऑक्सिजन मास्क साठी धडपडत होते ! मिळेलत्या वस्तूला घट्ट पाकड्यासाठी हातघाई होत होती ! विमानाने खाली मुंडी घातली होती आणि गरगरत ते जमिनीकडे, जमीन कसली खाली समुद्र होता, कोसळत होते. दुसऱ्या क्षणी कानठळ्या बसवणारा स्फोट झाला !

०००

आज या घटनेला दहा दिवस झाले होते. बैठकीच्या खोलीत एका खुर्चीवर पांढरी चादर टाकून त्यावर सुनीलचा फोटो ठेवला होता. खुर्ची शेजारी उदासपणे सरस्वतीबाई जमिनीवर बसून होत्या! सुनीलच्या फोटो समोर सरस्वतीबाईंनी दिवा लावलेला नव्हता कि सुनीलच्या फोटोला हार घालू दिला होता !

"सुरूकाकी आता दुःख आवरत घ्या! दहा दिवस झालेत सुनीलचे विमान दुर्घटनाग्रस्त होऊन!अजून काही त्याचा शोध लागलेला नाही ! परस्थिती स्वीकारा."

"तुम्ही काहीही म्हणा!त्याचा मृतदेह सापडल्या शिवाय, तो गेलाय यावर मी विश्वास ठेवणार नाही! माझं मन सांगतंय तो जिवंत आहे !"

हेल्प लाईनवर अजून शोध कार्य सुरु असल्याचे सांगितले जात होते. विमान समुद्रात कोसळले होते. सर्व मृत देह अजून सापडले नव्हते. कोणी या भयानक अपघातातून वाचले असेल असे वाटत नव्हते. तरी शोध कार्य सुरु ठेवले होते. मृतांत सुनील नव्हता. आणि फक्त याच आशेवर तो जिवंत आहे असे सरस्वती बाईंना वाटत असावे. पण त्या 'सुनील जिवंत आहे' या समजुतीवर त्या खूप ठाम होत्या ! दिवसभर सांत्वनासाठी कोणी ना कोणी येत असे. पण रात्र मात्र जागवून काढावी लागत होती.

०००

अपरात्री केव्हातरी सरस्वतीबाईंचा फोन वाजला.

"आई ,मी सुनील!" त्यांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसेना . सुनील!

" क !! कोण ?"

"अग ,मी सुनील बोलतोय!"

" कोण सुनील का ?!!, बाळा ,कसा आहेस? अन कोठे आहेस ?"

"मी ठीक आहे. देवाच्या कृपेने आणि त्याही पेक्ष्या तुझ्या आशीर्वादाने या जीवघेण्या अपघातातून वाचलोय!"

"पण तू आहेस कोठे ?"

"हे एक समुद्रातील छोटस बेट आहे ! येथील मच्छेमाऱ्यांना मी खोल समुद्रात सापडलो म्हणे! मी बेशुद्धच होतो !दोन दिवसाखाली शुद्ध आलीय. पण बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतो. खूप लागलंय गं !"

"हो रे ! मला कळतंय रे, तुझं दुःख!"

"बर,आई, तुला एक विचारायचं आहे !"

"आता काही विचारू -बिचारू नकोस! लवकरात लवकर घरी ये !"

"हो मी येणारच आहे! पण माझा एक मित्र माझ्या सोबत या अपघातात सापडला होता अन तोही जिवंत आहे !"

"हो का ? छान झालं. कसा आहे तो ?"

"तो -- तो तसा बरा आहे. पण ---"

" पण --?"

"त्याचा डावा पाय अधू झालाय! उजवा हात मात्र कोपरा पासून कापून टाकलाय! समुद्री माशांनी त्याचा पंजा खाल्ला होता. विष भिनल होत,म्हणून तो तोडावा लागलाय! आणि एक डोळा फुटलाय!"

"अरे देवा ! किती दुर्दैव ! त्याच्या मायबापाची हि परीक्षा रे बाबा!"

"त्याच्या आईबाबांचा प्रश्न नाही!तो अनाथ आहे! आणि म्हणूच मी त्याला माझ्या सोबत आपल्या घरी घेऊन येतोय!"

"आपल्या घरी ?"

"हो ! कारण त्याला शुश्रूषेची,आणि आधाराची खूप गरज आहे !"

"नको ! तुला माहित आहे तुझ्या बापाच्या तुटपुंज्या पेन्शनीत नाही भागायचं !"

"अग ,पैशाचा प्रश्न नाही. देईल तो ! "

"तरी नको!आपलं घर लहान आहे . त्याची अडचणच होईल!"

"माझ्या खोलीत तो झोपेल. तुला नाही अडचण होऊ देणार!"

"अरे, तुला कळत कस नाही ! तो लंगडा,लुळा,अन आंधळा! सकाळी उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत याला मदत अन आधार लागणार! हात नाही घाला जेवू!पाय नाही द्या चालताना खांदा!आंघोळ , कपडे !शीSSS !! नाही , नाही मला नाही ते सहन होणार!"

"अग ,करीन मी सगळं मॅनेज !तू फक्त हो म्हण !"

"नाही म्हणजे नाही ! निक्षून सांगते !नको ती ब्याद माझ्या घरी ! अर्धाच माणूस! असल्या जिवंतपणा पेक्षा ----"

"आई ,असं नको म्हणूस! प्लिज येऊ देना त्याला आपल्या घरी! हो म्हण ना!"

"नाही!सोड त्याला देवाच्या भरोश्यावर!काढेल तो त्याचा मार्ग! तो आणि त्याच दैव!काही का होईना,कशाला ते विद्रुप दुखणं घरी आणायचं? "

"पण आई जाईल कोठे तो? प्लिज येऊ दे ना ?"सुनीलचा स्वर अगदी रडवेला झाला होता. पण सरस्वतीबाईनी आपला ताठरपणा सोडला नाही! त्यांनी फोन कट केला!

खुर्चीतलं सुनीलचा फोटो काढून कपाटात ठेवून दिला. खुर्चीवरची चादर पण घडी खालून ठेवून दिली. देवापुढे साखर ठेवून दिवा लावला. दोन्ही हात जोडून भक्ती भावे नमस्कार केला. आणि प्रसन्नपणे अंथरुणावर अंग टाकले.

०००

चार दिवसांनी दारावरची बेल वाजली. सरस्वतीबाई लगबगीने उठल्या. घरात जाऊन औक्षवणाचे ताट घेऊन त्यात तुपाची निरंजन लावली. सुनीलचा आला असेल! त्यांना खात्री होती. तोवर पुन्हा बेल वाजली.

"हो!हो! किती घाई? आलेच!"

त्यांनी दार उघडले. दारात पोलीस अधिकारी उभा! त्यांनी हातातले औक्षवणाचे ताट टेबलवर ठेवले.

"सरस्वतीबाई कोण ?"

"मीच!"त्या पदर सावरत म्हणाल्या.

"तुमचं कोणी एयर बस XXX मध्ये प्रवास करत होते का ?"

"हो. माझा मुलगा सुनील होता!"

"त्या विमानाचा अपघात झाला होता !"

"मला माहित आहे! टी व्ही त बातमी होती!पण माझा मुलगा जिवंत आहे!चारच दिवसांखाली तो माझ्याशी फोनवर बोललोय! आज उद्यात तो येणे अपेक्षित आहे.!आत्ता तुम्ही बेल वाजवली तेव्हा तोच आला असे मला वाटले !"

"तसे असेल तर उत्तमच आहे. पण काल रात्री एक मृतदेह ब्रिटिश बेटावरून आमच्या कडे आला आहे. तो तुमच्या पत्यावर पोहच करावा अशी सूचना आहे! मृत तरुणाने हॉस्पिटलच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे! तुम्ही पहा तो तुमचा मुलगा आहे का ? नसेल तर आम्हास आमच्या नियमा प्रमाणे त्याची विल्हेवाट लावता येईल. "

सरस्वतीबाई त्या पोलीस अधिकाऱ्यासोबत गेल्या.

०००

शवगृहाच्या कर्मचाऱ्यांनी अकरा नंबरच्या वौल्ट मधून ते शव काढून सरस्वतीबाईं समोरच्या लांबलचक टेबलवर ठेवले. आणि त्या वरची पांढरी चादर बाजूला सारली. मृतदेहाचा उजवा हात कोपरापासून कापलेला होता!डावा पाय गुढग्या पासून गायब होता! डाव्या डोळ्याची पोकळ खोबणी भयानक दिसत होती! तरी सरस्वतीबाईंनी तो मृतदेह ओळखला! तो देह सुनीचाच होता !!

सरस्वतीबाईंच्या कानात "प्लिज येऊ दे ना ?" हा सुनीलचा आर्जव घुमत राहिला. त्यांची शुद्ध हरवली!

०००


Rate this content
Log in