ओळखीतली अनोळखी
ओळखीतली अनोळखी
"चल चल मिरा तुझे आईबाबा आलेत बाहेर..तुला न्यायला..तयार झालीस ना?" महेश मिराला आवाज देत बेडरूम मध्ये आला... नेहा मिराला घट्ट मिठी मारुन बसली होती. रडत होती. मिराने आपल्याला सोडून जाऊ नये असेच तिला वाटत होते.
"नेहा सोड तिला जाऊ दे तिचे आईवडील आले आहेत. ती आपली मुलगी नाही.कधीतरी तिला जायचे होतेच ना, स्वतः च्या भावनांना आवर."
महेश मिराचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला बाहेर घेऊन जातो.तिच्या आई वडिलांना सांगतो
"ही बॅग माझी बायको नेहाने मिरासाठी दिली आहे.
काही कपडे,खेळणे, चॉकलेट, कलर्स आणि ड्रॉइंग बुक आहेत.मिराने एवढ्या कमी दिवसांत आंम्हाला खुप लळा लावला आहे.ही आमच्या कडुन छोटीशी भेट आहे."
मिराला तिचे आईवडील घेऊन निघून जातात.नेहा आपल्या रुममध्ये रडत बसली होती.
महेश तिला समजावत होता. "नेहा ती अनोळखी मुलगी होती.कधीतरी तिला जायचे होते."
"महेश ती अनोळखी मुलगी ओळखीची बनुन कधी आपली बनुन गेली.मला कळलंच नाही रे.."
आठ दिवसांपूर्वी नेहा आणि महेश मॉर्निंग वॉक ला गेले असतांन ही पाच सहा वर्षांची मिरा त्यांना भेदरलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला एकटीच बसलेली दिसली होती. रडत होती. नेहाने तिला नाव विचारले. पाणी प्यायला दिले. दोघे तिला पोलिस स्टेशन ला घेऊन गेले. जोपर्यंत मिराच्या आईवडिलांचा पत्ता मिळत नाही तोपर्यंत मिराला नेहाने आपल्या घरीच ठेवले.
लग्नाला सहा वर्षे उलटून गेले पण नेहाची कुस उजवली नव्हती. मिराला तिने आपल्या मुलीप्रमाणे प्रेम दिले.त्या अनोळखी मुलीने काही वेळापुरते का असेना पण नेहाला आईपणाचे सुख दिले होते.
