Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Suresh Kulkarni

Others


4  

Suresh Kulkarni

Others


मुक्ती दूत !

मुक्ती दूत !

10 mins 1.7K 10 mins 1.7K

या विशाल पिंपळ वृक्षा खाली, जो विस्तीर्ण दगडी चौथरा बांधला आहे, तेथे आज कोणाचा तरी दशक्रिया विधी चालू असल्याचे, मी बसलोय त्या जागेवरून दिसत होते. मयताचे जवळचे नातेवाईक उद्देशहीन नजरेने तो विधी ते पहात होते. झाडापासून जवळच एक छोटी नदी वाहते. लहानश्या घाटाच्या रेखीव पायऱ्या, नदीच्या किनाऱ्या लगत उतरतात. हा नदीचा घाट अशाच विधी साठी उपयोगात येतो. घाटाच्या वरच्या बाजूस एक महादेवाचे मंदिर आहे.

मी चोचीने पंखात अडकलेली ती शुष्क काडी काढून टाकली. चोचीनेच पंखाची पिस सारखी केली. तेव्हड्यात माझे लक्ष समोर गेले. तो लिंग देह एका वृद्ध स्त्रीचा होता. मी माझ्या एकुलत्या एक डोळ्याने निरखून पहिले. तीने साधारण साठी ओलांडलेली होती. म्हणजे बऱ्यापैकी जगलेली होती. खात्यापित्या घरची असावी. तरी पण ती दुःखी दिसत होती. त्याही पेक्षा ती ज्यास्त भांबावली होती. का? विचारणे मला आगत्याचेंच होते. त्या शिवाय, त्या लिंग देहात अडकलेल्या आत्म्याची सुटका कशी होणार? काही दिवसापूर्वी देहातून निघालेला, मुक्ती साठी भटकत असलेला, अजूनही नको तितका वासनेच्या गुंत्यात अडकलेला तो लिंग देह! तिचा आत्मा वाहत असलेली ती बंधन, ते ओझे मला स्पष्ट दिसत होती!

"प्रणाम माई, खूप दुःखी दिसतेस. कसली वेदना आहे तुला? आणि इतकी का भांबावली आहेस?" मी आदराने तिला विचारले.

"बरे झाले तूच विचारलेस. काय कि मी झोपले आहे! मला जागे व्हायचे आहे, मला डोळे उघडून माझे घर पहायचे आहे! पण मला, जागचं येत नाही! मी कशी घरी जाणार?" ती म्हणाली.

म्हणजे? या वृद्धेला काय झालाय, याचीच कल्पना नाही तर! माझे आजचे काम जरा ज्यास्तच क्लिष्ट असणार असे दिसतंय.

"माई, आता तुला कुठल्याच घराची आवश्यकता नाही! आणि हो --- आत्ता तू सत्यातच आहेस, स्वप्नात नव्हेस!"

"घराची गरज नाही? का? आणि मी चांगली माझ्या पलंगावर निवांत झोपलीयय! फक्त हे स्वप्न संपतच नाही इतकेच! तू खोटं बोलतोयस!"

"नाही माई, मी कदापि खोटं बोलत नाही! तुलाच सत्याची जाणीव राहिलेली नाही. आता माझे बोलणे लक्षपूर्वक ऐक! तुझे जमिनीवरील भोग संपले आहेत. तू जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होण्याच्या मार्गावर आहेस. तुझा लौकिकार्थाने मृत्यू झालेला आहे!" मी तिला स्पष्टच जाणीव करून दिली.

"अरे, डुचक्या कावळ्या, मला काय तू खुळी समजतोस? ऐकून घेतीयय म्हणू मला बहकवू नकोस!" ती जवळपास ओरडलीच.

"नाही माई, मी म्हणतोय तेच सत्य आहे!" मी शांतपणे म्हणालो.

"मी मेलीयय अन मलाच माहित नाही? कशावरून तू सांगतोयस, ते खरं आहे?"

"तूझे असे विचारणे मला अपेक्षितच होते! तू माझ्या या एकुलत्या एक डोळ्यात पहा, तेथे तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील! "

ती माझ्या जवळ सरकली. मी माझ्या डोळ्याचे बुबळं किंचित विस्फारले. तीला आत दिसू लागले.

ती तिच्या पलंगावर झोपलेली होती. झोपेत तिचा श्वास अडकू लागला! धाप लागत होती! घशाला कोरड पडत होती! घशाची आग होऊ लागली! कोठून तरी चमचाभर पाणी घशात पडावे असे प्रकर्षाने वाटू लागले! लगोलग पोटात आणि छातीत आगीचा डोंब उसळला! असह्य! पलंगाच्या उषापाशी पाण्याने भरलेला तांब्या आणि त्यावर उपडा ठेवलेला पेला होता. पण तिचे दुर्दैव, तो तिला घेता येईना! जीवाची तगमग वाढतच होती! डोळ्याच्या पापण्या उघडेनात! तिने मोठ्याने आवाज काढण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ! हे अर्धांगवायूचे दुखणे मोठे बिकट असते! आवाज करून, गाढ झोपलेल्या घरच्यांना उठवावे असे जवळपास काही नव्हते! उशीखाली एक पितळी घंटी असते, तिला एकदम आठवले. पण---- दुपारीच नातू, वाजवत वाजवत बाहेर घेऊन गेला होता! आता काय करू? तिने सर्व बळ एकवटले, जमेल तेव्हडी हवा छातीत भरून घेतली, आणि मुलाच्या नावाने टाहो फोडला! 'अक्षुSSS'!! आवाज तर निघालाच नाही, पण डोळ्यांच्या पापण्या खाड्कन उघडल्या!आणि तशाच राहिल्या! क्षणात ते गुदमरलेपण, घशाची कोरड, छातीतील आग, घाबरा झालेला जीव एकदम शांत झालं! कसलं मेल हे दळभद्री स्वप्न?! किती घाबरले होते!?

ती पुन्हा माझ्या डोळ्यात पहात होती, अधिक उछुकतेने.

आता तिला तिचा मृत देह, ती झोपली होती त्याच पलंगावर पडलेला दिसत होता. मुलगा, सून, रडत होते! लेक जावई नुकतेच आले होते. पोरीने दारातूनच गळा काढला! म्हणजे मी खरच मेले! खाड्कन डोळे उघडले तेव्हाच! इतकं सोप्प असत मरण?

ती पुन्हा पाहू लागली. तिची शेवटची आंघोळ, ताटी, तिरडी, प्रेत यात्रा, रचलेली चिता, उंच ज्वालांची रसरसलेल्या चितेत कोळसा- आणि राख होणार देह, पिठाच्या रांगोळीवर दक्षिणेकडे ठेवलेली पणती, सांत्वनासाठी लागलेली लोकांची रांग, खोटे रडणारे नातेवाईक, मेल्यावर पाहायला येणारे शेजारी! सगळंच तिला माझ्या डोळ्यात दिसत होत!

"माई, झाली का खात्री? आता सोड तो डोळे उघडण्याचा,आणि घराचा मोह! तुझाअन्नमयकोष, तुझ्याच पुत्राने जाळून, भस्म करून टाकलाय! आता तुला परत त्या अन्नावर पोसलेल्या देहात कसे जात येईल?"

ती अधोवदन झाली. तिला असलेला भ्रम निमला असावा. तिच्या लिंग देहावरचे ओझे आणि बंधने बरीच गाळून पडलेले मला दिसत होती. अन्नमय कोषाच्या आतील प्राणमय कोष हि पारदर्शक होत होता. कारण त्याचे प्रयोजन, देहा सोबत संपणार हे निश्चितच आहे! पण मनोमय कोष खूपच तप्त आणि उसळलेला होता. त्यातून तिला वेगळे करणे गरजेचे होते. सर्वात कठीण कार्यास मी हात घातला.

"माई, देह नाही, म्हणून परतीचा मार्ग बंद झालाय! आता तुझ्या साठी फक्त ऊर्ध्वगती शिल्लक आहे. येतेस त्या मार्गाने?"

"नाही! मला त्रास झाला त्याचे काय?" तिने ठामपणे नकार दिला. तिची समज काढणे जिकरीचे असले, तरी गरजेचे होते!

"माई, आता सगळं विसरायचं!"

"विसरायचं? अरे, नुसतं म्हणून येईल विसरता? नसेना का तो देह! माझ्या घायाळ आत्म्यावरल्या त्या ओल्या जखमा, सुद्धा तुला दिसत नाहीत का?" म्हातारी कळवळली.

"नाही कश्या?, मला त्या दिसताहेत! तू बोल! मी करीन ते व्रण नाहीसे! काय त्रास झालाय तुला?"

" मी अर्धांगवायूच्या दुखण्याने अंथरुणाला खिळले होते. मला वेळेवर जेवायला दिले नाही! चहा, पाणी दिले नाही! "

"का? असे का?"

" कारण,---- जेवण केले, पाणी पिले तर, मल -मूत्र तयार होणार. मग ती घाण साफ करावी लागणार? ते करावे लागू नये म्हणून, मग खाणे-पिणेच बंद करून टाकलं! " तिने तिची व्यथा सांगितली. या मानवाचं जगणं कधी कधी यातनामय होवून जात. ऐकवत नाही! माझी पीस सुद्धा हिचे बोल ऐकताना ताठरली. देवाने दिलेल्या बुद्धी आणि भावनांच्या वरदानच हे जीव, कोण हीन पातळीवर येउन वापर करतात! माझ्या डोळ्यात पण ओलावा झिरपू लागला. मी लगेचच स्वतःस सावरले, असे भावना प्रधान होणे आम्हास वर्ज असते.

"माई, आता तर देहच नाही, मग सोड हि खाण्या,पिण्याची भावना!"

"कशी सोडू? मी किती सण-वार केले, पुरणा-वरणाचा स्वयंपाक, सवाष्ण-ब्राम्हण, सगळे जेवून तृप्त व्हायचे! नवऱ्या बरोबर सासूचे पण पान वाढायची! वाटायचं मला सून आल्यावर असेच मानाचे पान देईल. पण मला कधीच मिळाले नाही. तेव्हा वाटायचं आता नसेना का, सुन आल्यावर आपल्यालाही असाच गरम मेतकूट भात बसल्या जागी मिळेल! गरमा गरम पुराण पोळी ताटात येईल! कसलं काय, सून पक्की हाँटेलबाज निघाली. वात्तड पिझा आवडीनं खायची अन मला पण खावू घालायची! किचनचा भारी कंटाळा हो, तिला !"

"माई, आता व्यर्थ बोलण्यात अर्थ नाही! राहून राहून तू मागेच गुंतून पडत आहेस! कितीदा सांगू तू ती खाण्या पिण्याची हाव सोड! तुझ्या वासनातृप्ती साठी सगळं होईल, तुझ्या चौदाव्याला आणि वर्षंश्रद्धाला, आणि पितृ पक्षात, साग्रसंगीत! "

"अरे,काडी लाव त्या गोड जेवणाला!! मला नाही लागत! 'म्हातारी मेली उपाशी, अन चौदाव्याला केली लापशी!' मला नकोच ते खाणे! फक्त काय डाचतंय ते तुला सांगितले. इतकंच. "

"याहून आणिखीन काही 'डाचतंय' का? सांगून मोकळी हो!"

" मला. मला ---तीन-- दोन - तीनदा मारहाण केली!" ती आता तर रडवेली झाली होती. शिव! शिव!! उतार वयात मारहाण? किती नीचता!

"असहाय्य आजारी म्हातारीस, उपाशी-तापाशी ठेवल! मारहाण पण केली! कोणी? सुनेने?"

"नाही! तिने केली असती तर, काहीच वाटले नसते! ती तर परकीच होती! पण माझी सून बरी पाहायची!"

"मग. कोणी केला तुझा छळ!" मी आश्चर्याने विचारले.

"माझ्याच लेकीने! चार दिवस आली होती माहेरी, सासरच्यालोकाना भांडून, मला पाहायच्या निमित्याने! तिला पाहायल कि, 'वन्स तुम्ही आलाच आहेत तर, रहा पंधरा दिवस! मी पण माहेरी, येते जावून चार दिवस. आईनं मुळे कुठे हलता येत नाही ना!' म्हणत सून सटकली. आमचं कार्ट 'सोडून येतो' म्हणत बायकुच्या मागे गेलं. चार दोन दिवस लेकिन बर बघितलं. सासरच्या लोकांचा 'परत बोलावण्याचा ' निरोप येईना. मग लेकीने आपला रंग बदलला! माझं जेवण खाण बंद केलं. मला घरात ठेवून,घराला कुलूप ठोकून, सिनिमे पाहायला जायची! मी 'उ, ऊ ' करून काही सांगू पहायची, तर 'गप, पड कि उगा! का कुई कुई कारतीयास! किती सडवणार आहे, देवालाच ठाऊक? कसली मेली माय, अन कसल मेल महेरपण?' असं काही बाही, बरळायची अन मारहाण करायची! पहायला कोण होत घरात? कोणी मला भेटायला अगर पहायला आलं कि,

'आई, पानी दु का ?'

'आई, चाई दु का ?'

'सकाळ पासन काय खाल्लं न्हाईस! काई खातीस का?'

नुसत्या कोरड्या चौकशा करायची! पोटाची पोर पण वैऱ्या सारखी वागली! तुला सांगते तेव्हा पहिल्यांदा 'मेलेलं बर!' हा विचार मनात आला!"

हे मात्र खरे आहे. आपल्याच लोकांचे हात 'पोलादी 'असतात! आणि त्यांच्याच जिभेला 'धार' इतरांन पेक्षा ज्यास्त असते! जबरदस्त आत्म्या पर्यंत जखम करून जातात! तिच्या लिंग देहावर या लेकीने केलेल्या छळाचे ओझे ज्यास्त होते!

"माई, टाक करून तिला क्षमा! आणि घे करून सुटका स्वतःची!" मी योग्य तो सल्ला दिला.

"जा! मी नाही करणार कोणालाच क्षमा! "

"तुझ्या वतीने, मी तिला शासन केले तर चालेल का?"

" तुला, जमेल? मग करच!"

"मग ठीक! ते तुझं 'द्वेषाचं' ओझं, दे मला!"

"कस?"

" म्हण, मी माझ्या अपमानाचा बदला घेण्याचा अधिकार माझ्या समोर असलेल्या काक पक्षास देत आहे! आणि मी त्या पासून अलिप्त झाली आहे!"

तिने डोळे मिटले. बहुदा, मी जे सांगितले त्याचा ती पुनोरोच्चार करत असावी.

परिणाम दिसू लागला. प्राणमय कोषाचे राहिलेले किंचित अवशेष, जे तिच्या 'सूडा'चे इंधन होते, ते आता गरज नसल्याने नष्ट झाले होते! पाहता पाहता मनोमय कोष पारदर्शक होत गेला. आणि त्याच्या आतील विज्ञानमय कोष हि ढासळून गेला. आणि राहिला तो फक्त तिचा आनंदमय कोषातील निरेच्छ पवित्र आत्मा!

"माई, आता कसे वाटतंय?"

"मला खूप बर वाटतंय. मघाशी तुझ्याशी बोलल्याने तगमग, वखवख, कमी झालियय! पिसासारखं हलकं हलकं वाटतंय! माहित नाही, पण कसलातरी खूप आनंद होतोय! देव तुझं भलं करो. तू मला दिसणारा फक्त कावळा नाहीस. कोण आहेस?"

"माई, तुला दिसतोय तसा, मी एक कावळाच आहे. तुझ्या सारख्या तगमगत्या प्राणांना सुटका आणि मार्गदर्शन करून,ऊर्ध्व दिशेस प्रवासीत करणे हे माझे दायित्व आहे. आता तू पुढील प्रवासासाठी सज्ज हो! कारण ती घटिका समीप आली आहे!"

"पण माझा बदला?"

" तो आता माझा अधिकार आहे! त्याचे ओझे माझ्या पंखावर आहे! तू त्यात आता नको अडकू!"

" मग,मी काय करू?"

मी माझ्या सेवकास खुणेनेच बोलावले. तो सामोरा आला.

"माई, बस त्या कावळ्याच्या पाठीवर! तो तुला तुझ्या इस्पित स्थळी पोहंचवील!"

"म्हणजे कोठे?"

"तुला सर्व सविस्तर सांगतो. आता तुझा आत्मा आनंदमयकोषात आहे. माझा हा सेवक तुला पृथ्वीच्या कक्षे बाहेर सोडेल! सोबत आनंदमयकोष असल्याने तुला आकाश गमनाचा आनंद जाणवेल. भरपूर घे तो आनंद! या साठीच हा कोष असतो! त्या नंतर हा सेवक परतेल. कारण त्याची तेथे हद्द संपते."

"अन, मी?"

"तेथून अंतरिक्ष सुरु होईल! तेथे दिशा नसतील, उजेड नसेल, अंधारही नसेल, काळ नसेल, वेळी नसेल, तुला गती पासून कळणार नाही! तेथे असतील, परमात्म्याचे विराट आणि विशाल शक्ती पुंज! त्यात तू कधी विलीन होऊन गेलीस हे तुला कळणार हि नाही! मुक्ती! मुक्ती!! म्हणतात ती हीच!"

ती त्या सेवकाच्या पाठीवर आरूढ झाली. सेवकाने, एक कर्णकर्कश्य चित्कार केला आणि आकाशी झेप घेतली! दक्षिण दिशा पाहून!

००००

मी बसलो होतो त्या पिंपळ वृक्षा खाली याच वृद्धेचा दिवस केला जात होता. भाताचे तीन पिंड आणि एक मुटका, हाताच्या बोटात दर्भाची वेटोळी अडकुवून तिचा मुलगा, काक स्पर्शा साठी पत्रावळ ठेवून उभा होता!

'आई, काही चुकलं असेल तर, माफ कर. लवकर स्पर्श कर!'

एका कावळ्याने आपले पंख फड्फडले!

"खबरदार! कोणी त्या पिंडाला स्पर्श करील तर!!" मी गर्जलो, तशे सर्व कावळे, चिडीचूप बसले.

खाली नातेवाईक खोळंबले. काय इच्छा राहिली असेल बरे?

"बोला, बोला, भाऊ साहेब, पहा काही आठवतंय का? आईंची काही इच्छा! करा कबूल!" विधी सांगणार सुचवू लागला. आईला आजोबानी, म्हणजे तिच्या वडिलांनी काही शेती, ते मरताना दिली होती. त्याची कागद पत्र असतील का आईच्या ट्रँकेत? मुलगा या विचारात होता.

'आई, तुझी सेवा करता आली नाही. तुला नव्या साडीच खूप अप्रूप होत. एक साडी तुझ्या नावाने दान करीन! आता लवकर पिंडाला स्पर्श कर!'

मुलाची विनवणी वायाच गेली.

सून पुढे आली. बरे झाले माहेरी जाताना, या बयेचं पोष्टाच आणि बँकेची पासबुक माहेरी ठेवून आले ती!

'सासूबाई, नसेल हो झाली माझ्या हातून, तुमच्या लेकी सारखी सेवा. तरी घराबाराचा गाडा ओढत मीच सांभाळ ना तुम्हाला? फार नाही पण तुमच्या चार मैत्रिणींना सामोसा अन चहा देईन! आता करा बर स्पर्श! सगळेच खोळंबलेत!'

सुनेची विनवणी वाया गेली. जवळ पास कावळा फिरकेना.

"शकुताई, तुम्हीच व्हा पुढे. तुमच्यावर त्यांचा भारी जीव होता. म्हणा माझी काळजी करू नकोस!" गुरुजींनी लेकीस हात जोडायला लावले. काय बुद्धी झाली अन मी माहेरी आले होते. आईच्या पाटल्या तर काढून घेतल्यात. पण शेती अन घरात हिस्सा आहेच कि माझा! होऊ दे हे सर्व, जावू दे पै पाहुणा, मग मागू दादाला!

' आई,माझं चुकलंच. तुला त्रास नको म्हणून तुला अल्पच खाण पिणं दिल. तू फार हट्टीपणा करत होतीस, एखादी मारली असेल टपली! त्यात काय एव्हडं? मला नाही का तू मारायचीस, लहानपणी? आता सोड तो राग, कर स्पर्श! खूप भूक लागली आहे! मघाशी झाडामाग बसून एक केळ खाल्लं, पण त्यानं कितीसं भागणार?'

मला संताप अनावर झाला. काय हलकट लोक आहेत? मेल्या आत्म्याला सुद्धा खरं बोलत नाहीत! मी माझे विशाल पंख ताणून फडकावले. तीरा सारखी झाडाखाली झेप घेतली. पहिला फटका त्या पोराच्या गालफडावर दिला! त्याचा कानापासून हनुवटी पर्यंत दोन लालभडक रक्ताच्या निशाण्या काढल्या! पिंडाची पत्रावळ दोन्हो पायात धरून, जवळच्या खडकावर भिरकावून दिली. विधी सांगणारा गुरुजी 'अघटित! अघटित!!' म्हणून ओरडू लागला.

माझ्या क्रोधाचा दाह शांत होत नव्हता! म्हातारीच्या 'बदल्याचे' दायित्व क्षणा-क्षणाला अस्यय होत होते. मी माझा मोर्चा त्या कुलक्षणी पोरीकडे वळवला. माझ्या पंखाचे दोन फटके तिच्या डोळ्यावर मारले. आणि माझा डाव्यापायाचा पंज्या तिच्या टाळूवर ठेवला, त्यातून त्या 'माई'च्या 'बदलाचे' ओझे तिच्या टाळूवर सोडले! तिच्या मेंदूस माझी आज्ञा कळली! आवश्य पालन होईल!असा मला संकेत मिळाला! मी शांत झालो. माझे कार्य संपन्न झाले! मी दक्षिण ध्रुवाकडे झेप घेतली!

त्या कुलक्षणी पोरीने, मातृत्वाचा अपमान केला, स्त्री असून स्त्रीत्वाचा अपमान केला, असहाय वृद्धत्वाचा अपमान केला, तिला 'अर्धांगवायूचा' झटका येणार होता, आज पासून दहा दिवसांनी! माईस या व्याधीं दोन वर्ष झिजवले होते, पोरीस दहा वर्ष सडवणार होती हि व्याधी! हीच तर आज्ञा मी तिच्या मेंदूस दिली होती!


Rate this content
Log in